Why Naravane Book Release is Delayed : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख करताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यावर तत्काळ आक्षेप घेतला. त्यांच्या मदतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू देखील मैदानात उतरले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले होते. यापार्श्वभूमीवर जनरल नरवणे यांचे पुस्तक नक्की कशावर आधारित आहे? गेल्या दोन वर्षांपासून त्याचे प्रकाशन का रखडले? संरक्षण दलातील अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबाबत कोणते नियम लागू होतात? त्याविषयीचा हा आढावा…
जनरल नरवणे यांच्या पुस्तकात नक्की काय?
जनरल नरवणे यांनी आत्मचरित्रात त्यांच्या ४० वर्षांच्या लष्करी सेवेचा अनुभव मांडला आहे. ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. जानेवारी २०२४ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. मात्र, त्यातील दोन प्रमुख विषयांवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. डिसेंबर २०२३ मध्ये पीटीआय वृत्तसंस्थेने त्यातील काही उतारे प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय लष्कराने या पुस्तकाची तपासणी (रिव्ह्यू) सुरू केली. या उताऱ्यांमध्ये २०२० साली भारत व चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख होता. त्यावेळी पूर्व लडाखमधील भागात चिनी रणगाडे भारतीय चौक्यांच्या अगदी जवळ आले होते. अत्यंत तणावाच्या क्षणी भारतीय राजकीय नेतृत्वाकडून (पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री) स्पष्ट आदेश मिळण्यास विलंब झाला आणि शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार लष्करावरच सोपवण्यात आल्याचे पुस्तकात नमूद आहे. त्याशिवाय २०२३ मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ भरती योजनेबाबत सशस्त्र दलांमध्ये झालेल्या चर्चांचा तपशीलही या पुस्तकात असल्याचे सांगितले जात आहे.
पुस्तकाचे प्रकाशन कशामुळे रखडले?
जनरल नरवणे यांचे चरित्र २०२४ मध्ये प्रकाशित होणार होते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याचे प्रकाशन रडखडले आहे. त्यामागचे कारण म्हणजे- लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून त्याची छाननी केली जात आहे. भारतीय संरक्षण दलाच्या नियमांनुसार, लष्करी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरुपात सेवेशी संबंधित बाबी प्रसारमाध्यमांना देण्यास मनाई आहे. तसेच, केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता अशा स्वरूपाचे पुस्तक किंवा कोणताही दस्तऐवज प्रकाशित करण्यासही बंदी आहे. त्याशिवाय सेवेत असलेले अधिकारी केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय राजकीय प्रश्नांशी संबंधित, सेवाविषयक बाबींवर किंवा लष्करी विषयांवर आपले मत मांडणारे व्याख्यान देऊ शकत नाहीत. नियमांनुसार, ‘सेवा माहिती’ आणि ‘सेवाविषयक बाबी’ या संज्ञांमध्ये सशस्त्र दल, संरक्षण व्यवस्था तसेच केंद्र सरकारचे परराष्ट्र संबंध यासंबंधीची माहिती व विषयांचा समावेश होतो. अधिकाऱ्यांच्या मते, सशस्त्र दलातील एखाद्या व्यक्तीने आपल्या सेवेशी संबंधित नसलेले साहित्यिक अथवा कलात्मक स्वरूपाचे पुस्तक लिहिलेले असल्यास त्यावर हे नियम लागू होत नाहीत.
निवृत्त अधिकाऱ्यांनाही नियम लागू होतात का?
निवृत्तीनंतरही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात हाताळलेली संवेदनशील किंवा गोपनीय माहिती उघड करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी पुस्तक प्रकाशित करताना कोणती प्रक्रिया पाळावी याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नियमांमध्ये नाही. यापूर्वी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकांची छाननी करताना ‘केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९७२’ मधील तरतुदींचा आधार घेतला जाऊ शकतो. जून २०२१ मध्ये ‘कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने’ या नियमांमध्ये महत्त्वाची सुधारणा केली होती. जरी सशस्त्र दल या नियमांच्या कक्षेत येत नसले, तरीही या दुरुस्त नियमांचा आधार घेण्यात जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या दुरुस्तीनुसार गुप्तचर किंवा सुरक्षेशी संबंधित संस्थांमध्ये सेवा दिलेल्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थेशी निगडित केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास मनाई आहे. दुसरीकडे, या श्रेणीत न मोडणाऱ्या निवृत्त नागरी अधिकाऱ्यांना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक नसते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वादाचे नेमके मूळ काय?
जनरल नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लडाखमधील भारत-चीन यांच्यातील संघर्ष व ‘अग्निपथ’ योजना लागू करण्याआधी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीतील मुद्दे नमदू केल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही विषय ‘राष्ट्रीय सुरक्षा’ आणि ‘परराष्ट्र संबंधांच्या’ कक्षेत येत असल्यामुळे निवृत्त असूनही त्यांच्या पुस्तकातील मजकूर लष्कर व संरक्षण मंत्रालयाकडून तपासला जात आहे, जेणेकरून कोणतीही गोपनीय माहिती उघड होणार नाही. यापूर्वी अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना लष्करी विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला असला तरीही लष्करी इतिहास व अनुभवांवर लेखन करण्याची ही परंपरा जुनी आहे.
हेही वाचा : शिक्षक भरतीच्या नियमांत बदल का? परिणाम काय होणार?
संरक्षण मंत्र्यांचा आक्षेप कशावर?
राहुल गांधी यांनी नरवणे यांनी लिहिलेले पुस्तक सभागृहात सादर करावे, असे आव्हान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. विरोधी पक्षनेते प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देऊन देशाची दिशाभूल करत आहेत. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व काल्पनिक आहेत. त्यांनी सभागृहात त्याबाबत बोलू नये, स्पष्ट भूमिका राजनाथ सिंह यांनी घेतली होती. अमित शहा यांनीही राजनाथ यांच्या युक्तिवादात सूर मिळवला. मात्र, राहुल गांधींनी आपले म्हणणे न थांबवता मनोज नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देणे चालूच ठेवले. मोदी व राजनाथ दोघेही चीनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास घाबरत आहेत. त्यांना एवढी कशाची भीती वाटते. त्यांना घाबरण्याजोगे काही नसेल तर त्यांनी नरवणेंच्या पुस्तकातील मोदी व राजनाथ यांच्याबद्दल व्यक्त केलेले मत ऐकून घ्यायला काय हरकत आहे, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती.

