पश्चिम आशियात युद्ध सुरू असताना भारतात सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. जागतिक पातळीवर अशांतता, तणाव निर्माण झाल्यास त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो. दरम्यान, सोन्याचा भाव वाढल्याने मागणीत घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील सोन्याचे व्यापारी सोने विकताना सूट देत आहेत. सोन्याच्या प्रत्येक औंसमागे ८० डॉलरचा डिस्काउंट भारतीय व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. औंस हे अमेरिकेतील वजन मोजण्याचे एकक असून एक औंस म्हणजे २८.३४९५ ग्रॅम होय. भारतात सोन्याचा पुरेसा साठा असल्याने पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर होणार नसल्याचे म्हटले जात आहे. युद्धाच्या परिस्थितीत सोने हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. परंतु, यंदा डॉलरची स्थिती मजबूत आहे. तसेच सोन्याचे भाव देखील खूप वाढलेले आहेत. त्यामुळे त्याच्या मागणीत इतर देशांकडूनही घट झाली आहे.

सोन्याच्या किंमतीत किती बदल झाला?

पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यानंतर दुबई या युद्धाच्या विळख्यात अडकली आहे. यूएईवर अनेक ठिकाणी बॉम्बवर्षाव झाला. त्यामुळे यूएईची हवाई वाहतूक बंद करण्यात आली. दुबई हे सोने व्यापाराचे एक प्रमुख केंद्र आहे. लंडनमधील सराफा बाजारातून मोठ्या प्रमाणात सोने दुबईला पाठवले जाते. परंतु, यूएईची विमान वाहतूक बंद असल्याने लंडनमधून दुबईला सोने पाठवणे लंडनमधील सराफा व्यापाऱ्यांसाठी अवघड झाले आहे. लंडन बुलियन मार्केट असोसिएशन प्रत्येक औंसमागे ३० डॉलरची सूट देऊन सोने विकत आहे. यूएईतून भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. दरम्यान, पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातील सोन्याच्या किंमतीत फार बदल झालेला नाही. १३ मार्च रोजी एक ग्रॅम सोन्याची किंमत १५,८५५ रूपये, तर २६ फेब्रुवारी रोजी १५,८०२ रूपये होती, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या डेटामधून ही माहिती समोर आली.

सोन्याच्या मागणीत घट झाली आहे का?

भारतीय सराफा बाजारात सोन्याची आवक वाढली आहे. तसेच सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांनी आणखी सोने खरेदी करणे थांबवले आहे. याबाबत रिद्धी सिद्धी बुलियन्सचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला प्रतिक्रिया दिली. रिफायनर्स व व्यापाऱ्यांनी या आठवड्यात सोने विक्री करताना ८० डॉलरची सूट दिली. बाजारात सोन्याचा मुबलक पुरवठा होत आहे. तसेच सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याचा साठा करणे व्यापाऱ्यांनी थांबवले आहे. दरम्यान, आगामी सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारतावर परस्पर टॅरिफ लादल्यानंतर सोन्याच्या किंमतीत ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सोने महागल्याने सोने खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीने सोन्याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. सोन्याच्या मागणीत जवळपास ७५ टक्क्यांची घट झाली असून त्यामुळे २० ते ३० टक्के मार्जिनवर परिणाम झाल्याचे मुंबईतील झवेरी बाजारातील छोट्या सराफा व्यापाऱ्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. भारताकडे सध्या सोन्याचा मुबलक साठा आहे. जानेवारी महिन्यात भारताने १२.०७ अब्ज डॉलर सोन्याची आयात केली होती. त्याआधी डिसेंबर महिन्यात ४.१३ अब्ज डॉलर सोन्याची आयात करण्यात आली होती.

दुबईतील सराफा बाजाराचा भारतावर परिणाम?

दुबईतील सराफा बाजारात सोने सूट देऊन विकले जात आहे. ही सूट भारतीय सराफा बाजारासाठी लाभदायक आहे. परंतु, दुबईत सध्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दुबईतून सोने आयात करणे भारतासाठी अवघड झाले आहे. दुबईतून सोने भारतात आयात करता येत नसले तरी भारतीय सराफा बाजारावर त्याचा परिणाम झालेला नाही. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर व नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.

“भारतीय खरेदीदार व आयातदारांसाठी ही सूट (दुबईतील सोन्यावर असलेला डिस्काउंट) सकारात्मक असू शकते. सूट देऊन सोने विकले जात असल्याने भारतीय आयातदारांना आयातीचा खर्च कमी येईल. दरम्यान, भारतात या सोन्याची किंमत आयातशुल्क, लॉजिस्टिक शुल्क आणि रूपया-डॉलर यांमधील अंतर या घटकांवर अवलंबून असते.”, असे रिद्धीसिद्धी बुलियन्सचे व्यवस्थापकीय संचालक कोठारी म्हणाले.

कच्चे तेल विरूद्ध सोने

भारतात सोन्याचे दर काही कालावधीसाठी स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक पातळीवर तणाव, संघर्ष निर्माण झाल्यास सोन्याला सुरक्षित गुंतवणूक समजले जाते. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होते. परंतु. मध्य पूर्व मध्ये सध्या सुरू झालेल्या संघर्षाचा फार परिणाम सोन्यावर झाल्याचे दिसत नाही. “युद्ध परिस्थितीत सोन्याच्या किंमतीत वाढ होणे अपेक्षित असते. परंतु, या युद्धामुळे तेलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महागाईत वाढ होण्याची चिंता आहे. महागाई वाढल्यास व्याजदर वाढवले जातात. व्याजदर वाढणे सोन्यासाठी नकारात्मक आहे”, असे साऊथ एशिया अॅट मेटल्स फोकसचे प्रमुख सल्लागार चिराग शेठ म्हणाले. “शेअर बाजार कोसळल्यानंतर लोक नुकसान भरून काढण्यासाठी सोने विकतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे”, असे शेठ म्हणाले. दरम्यान, अमेरिकेत महागाई वाढल्याने जर व्याजदर वाढवण्यात आले, तर त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. हा परिणाम सोन्याच्या किंमतीवर सकारात्मक परिणाम करेल. त्यामुळे सोने येत्या काळात देखील चांगली वाटचाल करेल, असा विश्वास शेठ यांनी व्यक्त केला आहे.