सुवर्ण बाजारात सातत्याने नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या सोन्या-चांदीच्या दराला अखेरीस ब्रेक लागला. आठवडाभरात मौल्यवान धातूंच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रति औंस ५,१३० डॉलर्सपर्यंत खाली आला. त्यापाठोपाठ चांदीच्या दरातही पुन्हा घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यामध्ये युद्धाचा वणवा पेटला असताना अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदीला पसंती दिली. तरीदेखील जागतिक बाजारात मौल्यवान धातूंचे दर नेमके कशामुळे कोसळले? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. त्याविषयीचा हा आढावा…
सोने-चांदीचा भाव का घसरला?
जागतिक पातळीवर युद्धाचे सावट निर्माण झाल्यास शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळते. परिणामी सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या दरातही मोठी वाढ होते. सध्या अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षाचा सहावा दिवस असूनही जागतिक बाजारपेठेत वेगळेच चित्र दिसत आहे. अमेरिकन डॉलरला मिळालेली बळकटी आणि ट्रेझरी बाँडच्या वाढत्या उत्पन्नामुळे मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाल्याचे मत सराफ तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केवळ सोने-चांदीच नव्हे, तर प्लॅटिनम आणि तांब्याच्या किमतींवरही मोठा दबाव दिसून येत आहे.
तांब्याच्या किमतीतही मोठी घसरण
शुक्रवारी जागतिक बाजारात तांब्याच्या किमतीत सर्वाधिक १.७७ टक्क्याची घसरण होऊन, ते ५.८० डॉलर्सवर आले; तर प्लॅटिनमचा भाव ०.१९ टक्क्याने घसरून २,१४९.९० डॉलर्सवर स्थिरावल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोन्याच्या घसरणीचे सर्वांत मुख्य कारण म्हणजे अमेरिकन डॉलर इंडेक्स ०.३५ टक्क्याने वाढून ९९.१० वर पोहोचला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, यूएस डॉलर इंडेक्समध्ये साधारणत: ०.१ टक्क्याची वाढ झाल्यास सोन्याच्या किमतीत प्रति औंस ८ ते १२ डॉलरपर्यंत घसरण होण्याची शक्यता असते; परंतु शनिवारी डॉलरला मिळालेल्या ऐतिहासिक बळकटीमुळे सोन्याच्या दरावर मोठा दबाव आला. त्यातच अमेरिकन १० वर्षांच्या ट्रेझरी बाँड्सचा परतावा वाढून ४.११ टक्क्यांवर पोहोचल्याने पिवळ्या धातूचा दर प्रति औंस २८ ते ४२ डॉलर्सनी घसरला.
आणखी वाचा : इराणचा मित्रदेश असूनही रशिया युद्धात का उतरला नाही? काय आहेत कारणं?
घसरणीमागची नेमकी कारणे कोणती?
अमेरिकन ट्रेझरी बाँड्सचा परतावा वाढल्यानंतर अनेक गुंतवणूकदार सोने-चांदीची विक्री करून बाँड्सच्या खरेदीला प्राधान्य देतात. परिणामी मौल्यवान धातूंच्या दरात घसरण होण्याची मोठी शक्यता निर्माण होते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेजवळ इराणची युद्धनौका बुडवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदी खरेदीकडे वळणार, असा कयास बांधला जात होता. तरीदेखील गुंतवणूकदारांनी भीतीपोटी सोने खरेदी करण्याऐवजी डॉलर आणि ट्रेझरी बाँड्सला अधिक पसंती दिली. इराणकडून गुप्तचर यंत्रणांमार्फत चर्चेचे संकेत मिळत असल्याच्या बातम्यांमुळे (ज्याचा तेहरानने नंतर इन्कार केला) युद्धाचा तणाव निवळेल, अशी आशा गुंतवणूकदारांना वाटत आहे.
ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांचाही परिणाम?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले टॅरिफ तेथील सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आपल्या धोरणात बदल करावा लागला आहे. अमेरिकन सरकारने जागतिक आयातीवर आता १५ टक्के तात्पुरता टॅरिफ लागू करण्याची योजना जाहीर केली आहे. यापूर्वी लागू असलेला १० टक्के टॅरिफचा नियम काही अंशी रद्द झाल्यानंतर ही नवी योजना समोर आली आहे. या धोरणामुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता वाढण्याची शक्यता असल्याने कमोडिटी बाजारावरही दबाव वाढला आहे. परिणामी सराफा बाजारातील मौल्यवान धातूंची विक्री वाढली असून, सोने-चांदीचे दर सातत्याने घसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा भाव ५,१३० डॉलर्सच आसपास असून, तो अजूनही उच्चांकी पातळीवरच आहे.
सोने-चांदीचे भाव आणखीनच घसरणार?
तज्ज्ञांच्या मते, सोन्याची ही घसरण तात्पुरती असून, दीर्घकालीन कल अजूनही सकारात्मक आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी विक्रमी दराने सोन्याची खरेदी सुरू केली आहे. सध्या सोन्यासाठी प्रति औंस ५,१६३ डॉलर्सचा भाव हा महत्त्वाचा आधार आहे. जर ही पातळी ओलांडल्यास सोन्याचे दर पुन्हा ५,४७० डॉलर्स आणि त्यानंतर ५,५९८ डॉलर्स या विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणखी चिघळल्यास सोन्याची मागणी पुन्हा वाढू शकते; पण तणाव निवळल्यास किंवा अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदराच्या कपातीस विलंब केल्यास डॉलरला चांगली बळकटी मिळून सोने-चांदीच्या किमतीत घसरण होऊ शकते.
हेही वाचा : इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे काय? त्यांना सुरक्षित मायदेशी कसे आणले जाणार?
महाराष्ट्रात सोने-चांदीचे भाव काय?
सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्या-चांदीच्या घसरणीला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अखेरीस ब्रेक लागला. महाराष्ट्रातील जळगाव शहरातल्या सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी सकाळी सोन्याच्या दरात भाव प्रति तोळा दोन हजार १६३ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅमसाठी एक लाख ६६ हजार १३९ रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळाली. गुरुवारी १० हजार ३०० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७५ हजार रुपयांपर्यंत घसरले होते. तर, शुक्रवारी पुन्हा १०३० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७३ हजार ९८० रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी तब्बल ४,१२० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७८ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
