Gold-Silver Prices Continue To Fall : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सुरू असलेल्या तेजीला गेल्या आठवड्यात अचानक ब्रेक लागला. २९ जानेवारी रोजी सोन्याचा दर प्रति औंस ५,५२३ डॉलरच्या उच्चांकावर पोहोचला होता. त्यापाठोपाठ ३० जानेवारी रोजी चांदीचे दर प्रति औंस ११६ डॉलरच्या उच्चांकी गाठली होती. त्यानंतरच्या आठवड्यात मात्र दोन्ही धातूंच्या दरांत सातत्याने चढ-उतार दिसून आली. सुरुवातीला जोरदार उसळी घेतल्यानंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरणीचा कल सुरू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची निवड केल्यानंतर मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…

सध्या स्पॉट चांदीच्या दरात सुमारे १६.५ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी (५ फेब्रुवारी) सोन्याचा सरासरी दर चार हजार,९२० डॉलर प्रति औंस इतका होता. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळाल्याने बाजारावर दबाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सुवर्ण बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होण्यामागे फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदाचे कारण ठरले असले तरीही सोने-चांदीच्या दरांतील घसरण आधीपासूनच अपेक्षित असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

महागाईवर कठोर भूमिका घेणारे अर्थतज्ज्ञ म्हणून केविन वॉर्श यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे चलनविषयक धोरण अधिक कडक होण्याची शक्यता वाढली आहे. २०१० मध्ये त्यांनी फेडच्या शून्य व्याजदर धोरणावर तीव्र टीका केली होती. त्यावेळी बेरोजगारीचा दर १० टक्क्यांवर असतानाही वॉश यांनी महागाईच्या धोक्याचा इशारा दिला होता. अनेकदा वॉर्श यांची आर्थिक भूमिका सत्ताधारी प्रशासनाच्या धोरणांशी सुसंगत राहिलेली आहे. ओबामा प्रशासनाच्या काळात त्यांनी व्याजदर वाढवण्याची मागणी केली होती; पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात वॉर्श आपली भूमिका बदलली, असे द अटलांटिकच्या वृत्तात नमूद आहे.

आणखी वाचा : अमेरिकेतून ३८०० भारतीयांची हकालपट्टी; कोणकोणत्या देशांनी केलं भारतीयांना हद्दपार?

२०१८ मध्ये वॉर्श यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये महागाईवर एक लेख लिहिला होता. सध्याच्या आर्थिक आणि बाजारातील घडामोडी पाहता फेडने व्याजदर वाढवणे आणि तरलता कमी करण्याची दुहेरी कारवाई थांबवायला हवी, असे त्यांनी लेखात म्हटले होते. त्यानंतर जो बायडन प्रशासनाच्या काळात वॉर्श यांनी पुन्हा कठोर भूमिका घेतली आणि सप्टेंबर २०२४ मध्ये फेडने वेळेआधी व्याजदर कपात केल्याबद्दल टीका केली होती. यादरम्यान फेडच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत येताच त्यांनी व्याजदर कपातीची बाजूही मांडली होती. अमेरिका एआय-आधारित उत्पादकतेच्या मोठ्या उभारीच्या उंबरठ्यावर आहे. महागाई कमी करणारी ही महत्वाची शक्ती ठरणार आहे. अर्थव्यवस्था खूप वाढल्यावर आणि कामगारांना जास्त पगार मिळल्यावरच महागाई वाढते, ही जुनी संकल्पना फेडने सोडून द्यावी, असे त्यांनी २०२५ मध्ये स्पष्ट केले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी निवड करताच महागाईबाबत महत्वाचे विधान केले. त्यानंतर ३० जानेवारी रोजी सोन्याच्या भावात ९ टक्क्यांची घसरण झाली, जी १९८३ नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. त्याचवेळी अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने चांदीच्या दरांनाही फटका बसला आहे. याशिवाय इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेच्या नियोजित चर्चांमुळेही डॉलरला बळकटी मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच डॉलरची बाजू घेतली असली तरीही त्यांच्या कृती अनेकदा उलट परिणाम करणाऱ्या ठरल्या आहेत. जानेवारीमध्ये ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्याने जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. कॅनडा आणि दक्षिण कोरियावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली. या सर्व घडामोडींमुळे डॉलरची किंमत घसरल्यास सोन्याच्या किमती वाढतात हे समीकरण पुन्हा दिसून आले.

सोने आणि चांदीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. १९७१ पर्यंत जगभरातील अनेक देशांतील चलनांना सोन्याचा आधार होता. आर्थिक अस्थिरतेच्या काळात अनेक देश आजही आपल्या चलनाच्या संभाव्य घसरणीपासून संरक्षण म्हणून सोन्याचा साठा वाढवतात. चांदीच्या बाजारपेठेत तरलता कमी असल्याने तिच्या किमती तुलनेने अधिक चढ-उतार दाखवतात. तरीही महागाईपासून बचावाचे साधन म्हणून चांदीला अधिकच महत्त्व दिले जाते. २०२२ मध्ये रशिया–युक्रेनमध्ये युद्धाची ठिगणी पडल्यांतर मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यापूर्वी दरवर्षी सरासरी ४०० ते ५०० टन सोने खरेदी केले जात होते. २०२२ ते २०२४ या काळात ही खरेदी १,००० टनांच्या पुढे गेली. २०२५ मध्ये हा आकडा सुमारे ८६३.३ टनांवर आला असला तरीही तो २०२२ पूर्वीच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जात आहे.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲपला का फटकारले? नागरिकांच्या गोपनीयतेचे प्रकरण काय?

जागतिक राखीव साठ्यातील अमेरिकन डॉलरचा वाटा २००० मधील ७१ टक्क्यांवरून आज ५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे डॉलरवरील विश्वासात हळूहळू पण सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट होते. जानेवारी २०२५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावले असून फेडरल रिझर्व्हच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचा थेट फटका डॉलरला बसल्याने २०२५ मध्ये त्यात तब्बल ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या दशकातील ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळाल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यादरम्यान फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची निवड केल्यानंतर डॉलरला बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीचे दर आणखीनच अस्थिर होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.