विश्लेषण: जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी का चर्चेत आला आहे? काय घडलं होतं तेव्हा?|Why has Jayant Patil's statement made the morning swearing in discussion? What happened then? | Loksatta

विश्लेषण: जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी का चर्चेत आला आहे? काय घडलं होतं तेव्हा?

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर घडलेला हा पहाटेचा शपथविधी ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडलेली एक वादळी घटना होती

What Jayant patil Said?
जयंत पाटील यांच्या दाव्यानंतर नेमकं काय काय घडलं?

२०१९ ची विधानसभा निवडणूक आणि निकालानंतर घडलेल्या घडामोडी या महाराष्ट्राचा राजकीय इतिहास कधीही विसरणार नाही. याच इतिहासातलं एक पान अजूनही सगळ्यांना आजही चकीत करणारं ठरतं. बरोबर महाविकास आघाडी होणार या चर्चा सुरू झालेल्या असतानाच २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे सरकार ७२ तासच टिकलं. पण हा प्रयोग महाराष्ट्र विसरलेला नाही. सध्या हा शपथविधी पुन्हा चर्चेत आला आहे. याचं कारण आहेत जयंत पाटील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा शपथविधी म्हणजे शरद पवारांचीच खेळी होती असं म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

जयंत पाटील यांनी काय म्हटलं ?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा जो पहाटेचा शपथविधी झाला तो शपथविधी म्हणजे शरद पवारांची खेळी असू शकते. मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नवह्ता. त्या अनुषंगाने शरद पवारांनी केलेली ही खेळी असू शकते. त्यामुळे त्या गोष्टीला जास्त काही महत्त्व आहे असं वाटत नाही. त्यावेळी अजित पवार यांनी काय वक्तव्यं केली होती त्यांना आज महत्त्व नाही. कारण त्यानंतर अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. शिवसेनेचे आमदार फुटले म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली हे नाकारता येणार नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आला आहे. पहाटेचा शपथविधी हा सगळ्यांसाठीच धक्का होता. कारण असं काही घडेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे सुरूवातीला तर शरद पवारांनी आम्हाला जनमताचा कौल मान्य आहे आणि आम्ही विरोधात बसणार अशी भूमिका घेतली होती.

पहाटेचा शपथविधी कसा झाला? आधी काय घडलं होतं?

२३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली होती. या शपथविधीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवली होती. हा शपथविधी होण्याच्या एक दिवस आधी रात्री काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत सरकार कसं आणायचं? याची खलबतं सुरू होती. त्या बैठकीत शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील असे दिग्गज उपस्थित होते. या बैठकीतून अजितदादा तडकाफडकी निघून गेले होते. त्यानंतर हा शपथविधी झाला. मात्र शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना पुढच्या २४ तासांमध्ये माघारी आणण्यात यश मिळवलं.

आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं

यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. हे सरकार अडीच वर्षे चाललं. त्यानंतर २१ जून २०२२ ला शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर अवघ्या दोन दिवसांनी शिवसेनेलाच सुरुंग लागला. कारण एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि सुरूवातीला १७ आमदार त्यांच्यासोबत नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ही संख्या ४० वर गेली.अर्थातच महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि कोसळलं.

जयंत पाटील यांनी जे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केलं त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं मात्र यामुळे राजकारण ढवळलं गेलं असून आता त्यावर विविध प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या शपथविधीचीही चर्चा होते आहे. मात्र हा सगळा घटनाक्रम अतिशय रंजक होता यात काहीही शंका नाही. आता या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं आहे?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जयंत पाटील हे अडीच वर्षांनी का सांगत आहेत? शरद पवार यांनी शकुनीमामांचा खेळ केला असं जयंत पाटील यांना सांगायचं आहे का? जर शरद पवारांना या पहाटेच्या शपथविधीची कल्पना नसेल तर जयंत पाटील हे त्यांना विरोधी पक्षनेता हे पद न मिळाल्याने ते असं बोलत आहेत का? जर जयंत पाटील खरं बोलत असतील तर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून हे महाभारत रचलं का? शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आक्षेप घेतला होता का? जर शरद पवारांनी आक्षेप घेतला होता तर तो नेमका का घेतला होता? हे प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केले आहेत. याबाबत शरद पवार यांनी अजून काही उत्तर दिलेलं नाही. शरद पवारांनी यावर बोलावं अशी अपेक्षाही बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती अशा चर्चा सुरू झाल्या आहेत पण या चर्चा महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी सुरू झाल्या आहेत असा आरोप अजितदादांनी केला आहे. तसंच या सगळ्या प्रकाराविषयी मी काहीही बोलणार नाही हे आधीच मी माध्यमांना स्पष्ट केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार बसलं होतं. या गोष्टीला आता बराच काळ लोटला आता त्यावर काही बोलणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं आहे?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या पहाटेच्या शपथविधीवरून ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे एकतर देवेंद्र फडणवीस सांगू शकतात किंवा अजित पवार सांगू शकतात. त्यापलिकडे या विषयावर काय बोलणार? एवढंच काय माझं तर पूर्वीपासून मत आहे की शरद पवार हे भाजपाचीच साथ देतात. त्यामुळे जर जयंत पाटील यांनी जे सांगितलं त्यात मला धक्कादायक वगैरे असं काहीही वाटलं नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांना २६ जानेवारीच्या दिवशी जेव्हा जयंत पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्यावर विचारलं असता त्यांनी यावर काहीही न बोलता महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केल्याने अशा विविध प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र शरद पवार यांनी ११ सप्टेंबर २०२१ ला या पहाटेच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला असता एका मराठी युट्यूब चॅनलला प्रतिक्रिया दिली होती.

२१ सप्टेंबर २०२१ ला पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हणाले होते शरद पवार?

शिवसेना आणि भाजपा यांच्यातलं अंतर आम्हाला तेव्हा (२०१९ च्या निवडणूक निकालानंतर) आम्हाला दिसत होतं. एकीकडे शिवसेनेशी आणि काँग्रेसशी आमची बोलणी सुरू होती. त्यावेळीच एक निरोप आला की भाजपाही सोबत यायला तयार आहे. जवळपास दीड महिना उलटला तरीही सरकार स्थापन होत नाही हे पाहून अनेक आमदार निराश झाले होते. आम्हाला काही जण सांगत होते काही करून सरकार स्थापन करा, भाजपाही तयार आहे त्यांचाही विचार करा असंही काही जणांनी सुचवलं होतं. मात्र भाजपाला दूर ठेवायचं असल्याने आम्ही हा विचार मान्य केला नाही. त्यानंतर पहाटे जो शपथविधी झाला तो पाहून मला धक्काच बसला होता. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.

शरद पवार यांनी २०२१ मध्ये केलेलं हे वक्तव्य लक्षात घेतलं तर त्यांना या शपथविधीबाबत काही माहित नव्हतं. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनाही वक्तव्य केल्यानंतर सारवासारव करावी लागली आहे. मी जे बोललो त्याचा वेगळा अर्थ काढला गेला असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे. मात्र या सगळ्यामुळे पहाटेचा शपथविधी हा चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 22:40 IST
Next Story
विश्लेषण: शेअर मार्केट आणखी झाले सोपे! समजून घ्या काय आहे ‘टी+१ सेटलमेंट’