आंध्र प्रदेशच्या दोन आमदारांनी त्यांच्याच सरकारवर फोन टॅप केल्याचा आरोप का केला? | Why have two Andhra Pradesh MLAs accused their own govt of tapping their phones | Loksatta

विश्लेषण: आंध्र प्रदेशच्या दोन आमदारांनी त्यांच्याच सरकारवर फोन टॅप केल्याचा आरोप का केला?

वायएसआर काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्याच सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप लावून खळबळ उडवून दिली आहे.

Andhra Pradesh MLAs phone tapping
वायएसआर काँग्रेसच्या दोन आमदारांनी स्वपक्षाविरोधात बंड केले आहे.

आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी YSR काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराने आपल्याच सरकारवर गंभीर आरोप करत राजीनामा दिला आहे. आमचे सरकार आमचाच फोन टॅप करत आहे, असा खळबळजनक आरोप आमदाराने केला. नेल्लोर जिल्ह्यातील आमदार श्रीधर रेड्डी यांनी या कारणावरुन १ फेब्रुवारी रोजी पक्षाचा राजीनामा दिला. तर तिरुपती जिल्ह्यातील वेंकटगिरीचे आमदार अनम रामनारायण रेड्डी यांनीही पक्षावर फोन टॅपिंगचा आरोप लावला आहे. त्यांचे आणि जवळच्या सहकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे दोघांचेही म्हणणे आहे. “पक्षाने आणि सरकारने माझ्यावर संशय घेतल्यामुळे मला दुःख वाटत आहे”, असे श्रीधर रेड्डी म्हणाले आहेत. तर रामनारायण रेड्डी यांनी म्हटले की, माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, याची कल्पना मला मागेच आली होती. माझे दोन्ही मोबाइल आणि माझ्या सहाय्यकाच्या फोनवर पाळत होती. त्यामुळे मी कुटुंबियांशी व्हॉट्सअप कॉलवर बोलायचो. श्रीधर रेड्डी यांनी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी रामनारायण हे आपला विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.

आमदारांची सरकारवर नाराजी कशासाठी?

आमदार श्रीधर रेड्डी म्हणाले की, मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांबाबत आणि नेल्लोर जिल्ह्याच्या पक्ष संघटनेतील गटबाजीबाबत नेहमीच आवाज उचलत आलो आहे. त्यामुळे पक्षाकडून मला लक्ष्य केले जात असावे. तसेच पक्षातील अनेक नेते माझ्यापाठी म्हणायचे की, मी जर पक्षात आनंदी नसेल तर मी पक्ष सोडला पाहीजे. तर रामनारायण रेड्डी यांनी देखील अशाच प्रकारची तक्रार केली. पक्षातील गटबाजीविरोधात बोलल्यामुळे मी टीकेचा धनी झालो. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थात निवडून आलेले लोकप्रतिनिधी मला आता कार्यक्रमांना किंवा उद्घाटनांना बोलवत नाहीत.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळेही नाराजी

YSRCP पक्षामधील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नाराज आमदार हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज होते. श्रीधर रेड्डी यांना जून २०१९ मध्ये जेव्हा सरकार आले, तेव्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये मंत्रिमंडळाच्या फेरबदलात संधी मिळेल, असेही वाटले होते. मात्र दोन्ही वेळा त्यांच्या पदरी निराशा आली. तर रामनारायण रेड्डी हे २०१२ ते २०१४ या काळात काँग्रेसमध्ये असताना आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री होते. त्यांनी २०१८ मध्ये वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. जी फोल ठरली.

वायएसआर काँग्रेसची यावर प्रतिक्रिया काय?

वायएसआर काँग्रेसचे प्रदेश समन्वयक आणि माजी आमदार बलिनेनी श्रीनिवास रेड्डी यांनी श्रीधर रेड्डी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, श्रीधर रेड्डी यांना तेलगू देसम पक्षात (TDP) प्रवेश करायचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षात कसा अन्याय केला जातो, हे दाखवून त्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे. तसेच श्रीधर रेड्डी यांना २०१४ आणि २०१९ साली मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दोनदा तिकीट दिले. तसेच नेहमीच त्यांना पाठिंबा दिला आहे. जर त्यांना तेलगू देसम पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांनी कारणे सांगण्याची गरज नाही. तसेच पक्षावर टीका करण्याचेही कारण नाही. उलट त्यांनी २०१४ ची निवडणूक तेलगू देसम कडून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे, याचा अर्थ त्यांचे टीडीपी प्रमूख एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोलणे झालेले आहे.

सरकारनेही आरोप फेटाळले

फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाल्यानंतर राज्य सरकारनेही याची दखल घेतली आहे. सरकारच्या सार्वजनिक कामकाज समितीचे सल्लागार सज्जला रामकृष्ण रेड्डी यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशमध्ये कुणाचेही फोन टॅप करण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे अतिशय कणखर आणि लोकप्रिय नेते आहेत. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. तसेच नेल्लोर जिल्ह्यातील आमदार असलेले कृषिमंत्री गोवर्धन रेड्डी म्हणाले की, आमच्या सरकारला कुणाचाही फोन टॅप करण्याची आवश्यकता नाही. आम्ही बहुमताच्या जोरावर सत्तेत आलो आहोत. हे आरोप खोटे आहेत. मी जिल्ह्यातला नेता असून श्रीधर रेड्डी माझ्याशी का नाही बोलले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:27 IST
Next Story
विश्लेषण : अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’ का गुंडाळला?