गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना गंभीर आजारांविरुद्धची एक नैसर्गिक आणि मजबूत ढाल मानले जात होते. नियमित व्यायाम करणारे, वजन नियंत्रणात ठेवणारे आणि कोणतीही व्यसन न करणारे तरुण आरोग्याच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अनेकांना समज होता. आता मात्र भारतातील शहरी भागांमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांना अत्यंत चिंताजनक बदल पाहायला मिळत आहे. विशी आणि तिशीतील तरुण वरकरणी पूर्णपणे तंदुरुस्त दिसत असले तरी त्यांच्या शरीराच्या अंतर्गत भागात ‘सायलेंट किलर’ आजार वेगाने बळावत असल्याचे समोर आले आहे. याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी या आरोग्य संकटामागील कारणे आणि चुकीच्या सवयी उघड केल्या आहेत, त्याविषयी…

बदलती जीवनशैली आणि आरोग्याचे संकट

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. वायुप्रदूषण घातक ठरत असल्याने नागरिकांना आरोग्याची नियमित तपासणी करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पूर्वी २० ते ३० या वयोगटातील निरोगी तरुण आरोग्याच्या दृष्टीने पूर्णपणे तंदुरुस्त मानले जात होते. आता मात्र त्यांना अशा आजारांचे निदान होत आहे, जे पूर्वी केवळ वृद्धांमध्येच प्रामुख्याने आढळायचे. यामध्ये हृदयरोग, फॅटी लिव्हर, मधुमेह, हार्मोन्सचे असंतुलन, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावामुळे उद्भवणाऱ्या गंभीर आरोग्याच्या समस्यांचा समावेश आहे. हार्ले ऑफ लंडन इंडियाचे जनरल फिजिशियन डॉ. योगेश नैन सांगतात की, आजकालच्या तरुणांमध्ये सध्या सर्वात मोठा गैरसमज हा आहे की, ते वरवरच्या दिसण्यालाच संपूर्ण आरोग्य मानतात. शरीर सुदृढ दिसणे किंवा सक्रिय जीवनशैली असणे म्हणजे अंतर्गत आरोग्याच्या धोक्यांपासून पूर्ण संरक्षण मिळतेच असे नाही.

तरुणामध्ये गंभीर आजारांचे प्रमाण का वाढलंय?

बदलत्या शहरी जीवनशैलीमुळे आरोग्याच्या दीर्घकालीन समस्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे समोर आले आहे. दैनंदिन कामाचा ताण, शैक्षणिक दबाव, आर्थिक चिंता आणि समाजमाध्यमांवरील सततच्या तुलनात्मक सवयींमुळे शरीर दीर्घकाळ तणावाखाली राहते. त्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्याचवेळी बैठी जीवनशैली हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य आणि चयापचय प्रक्रियेला कमकुवत करत आहे. तासनतास एकाच जागी बसून काम करणे, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे आणि कमी हालचाली करणे, यामुळे अनेक निरोगी तरुण नियमित व्यायाम करूनही प्रत्यक्षात शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय राहत आहेत. हार्ले ऑफ लंडन इंडियाच्या होलिस्टिक मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. रिधी सोनी यांच्या मते, भारतातील बदलत्या खाद्यसंस्कृतीने तरुण पिढीच्या पोषण पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकले आहे. शहरी भागातील तरुण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे स्वतःला गंभीर आजारांच्या खाईत ढकलत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, जोपर्यंत शरीराचे नुकसान होत नाही, तोपर्यंत बहुतेक तरुणांना या चुकीच्या सवयींची अजिबात जाणीव होत नाही.

गंभीर आजारांबाबत आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

घरगुती पारंपरिक जेवणापासून दूर जात ऑनलाइन मिळणारे अति-प्रक्रिया केलेल्या अन्नाकडे वाढलेला कल हे या आरोग्य संकटामागील महत्वाचे कारण मानले जात आहे. डॉ. रिधी सोनी सांगतात की, अनेकजण अस्सल पोषण देणाऱ्या साध्या आणि हंगामी आहाराऐवजी जाहिरातांच्या बळावर विकल्या जाणाऱ्या अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाला पसंती देतात, जे खऱ्या अर्थाने पोषणापेक्षा शरीराला अत्यंत घातक ठरू शकते. त्याचवेळी सकाळचा नाश्ता न करणे, रात्री उशिरा जेवणे किंवा नियमित जेवणाऐवजी पॅकेज्ड ‘हेल्दी’ उत्पादने खाणे या सवयी आता सामान्य होत चालल्या आहेत. परिणामी आजच्या तरुण पिढीला सुरुवातीच्या टप्प्यातच जुनाट आजार, फॅटी लिव्हर, हार्मोन्सचे असंतुलन आणि पचनसंस्थेचे विकार यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

आजारांसाठी कोणत्या चुकीच्या सवयी कारणीभूत?

तज्ज्ञांच्या मते, सध्या आरोग्यदायी पर्याय म्हणून बाजारात विकल्या जाणाऱ्या पॅकेज्ड उत्पादनांवर वाढते अवलंबित्व ही चिंतेची बाब बनली आहे. डॉ. सोनी यांनी सांगितले की, क्लीन किंवा हेल्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक पॅकेज्ड पदार्थांवर अतिप्रक्रिया केलेली असते. त्यातील घटकांचा दीर्घकाळ शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर आणि आतड्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्या म्हणाल्या की, लोक काय खातात यापेक्षा ते कसे खातात याची मला चिंता वाटते. घाईघाईत जेवणे, तणावाखाली खाणे, मोबाईल किंवा स्क्रीनकडे लक्ष ठेवून जेवणे आणि प्रक्रिया केलेल्या सोयीस्कर खाद्यपदार्थांवर अवलंबून राहणे या सवयींमुळे कोणतीही वरवरची लक्षणे दिसण्यापूर्वीच पचनक्रिया आतून पूर्णपणे बिघडून जाते.

झोपेचा अभाव, ताण आणि आजाराचे वाढते संकट

तज्ज्ञांच्या मते, अपुरी झोप ही जीवनशैलीमुळे बिघडण्यास सर्वाधिक कारणीभूत मानली जाते. रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय, मोबाईल सतत रील्स पाहणे आणि अनियमित दिनचर्या यामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडत आहे. त्यातच तीव्र मानसिक तणाव आणि अपुरी झोप एकत्र आल्यास लठ्ठपणा, मधुमेह, अस्वस्थता आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढत आहे. याशिवाय, आनुवंशिक कारणांमुळेही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनू शकते. अनेक तरुणांना आधीपासूनच मधुमेह किंवा हृदयविकाराची सुप्त लक्षणे असू शकतात, जी सततचा तणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे वेगाने बळावण्याची शक्यता असते. त्याचवेळी, चिंता, मानसिक थकवा आणि नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्य समस्यांचाही शारीरिक आजारांशी वाढता संबंध दिसून येत आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर एकत्रितपणे परिणाम करणारे दुष्टचक्र तयार होत आहे.

प्रतिबंधात्मक आरोग्य चाचण्या का महत्त्वाच्या?

तज्ज्ञांच्या मते, या समस्यांवर दैनंदिन जीवनात शाश्वत आणि चांगल्या सवयींकडे परतणे हाच उपाय आहे. डॉ. योगेश नैन यांनी या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित शारीरिक हालचाल, तणाव नियंत्रण आणि कुटुंबातील आजारांचा इतिहास जाणून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दरम्यान, डॉ. सोनी यांच्या मते, तरुणांनी आपल्या आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आपण दररोज घेत असलेला आहार एकतर सर्वात शक्तिशाली औषध किंवा संथ विषही ठरू शकते. जुनाट आजार टाळायचे असतील तर शहरी भागात राहणाऱ्या व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. सोनी यांनी दिला आहे.