Heat Stroke Death Rate Higher in Men remains Women : भारतात उष्माघातामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीतून उघड झाली, पण असे का? त्याविषयी…
गेल्या आठवडाभरापासून उत्तर आणि मध्य भारताला होरपळून काढणाऱ्या उष्णतेच्या लाटेपासून अखेर नागरिकांना दिलासा मिळाला. बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मे महिन्याच्या सुरुवातीलाच उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तापमानाचा कडाका वाढला होता. यादरम्यान उत्तर प्रदेशातील बांदा येथे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या या कडाक्यात उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली. त्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक होते, असे एका आकडेवारीतून समोर आले.
उष्माघात म्हणजे नेमके काय?
शरीराचे तापमान अतिप्रमाणात वाढल्याने निर्माण होणाऱ्या वैद्यकीय समस्येला उष्माघात असे म्हटले जाते. ही एक वैद्यकीय आणीबाणी असून त्यावर वेळेत उपचार न घेतल्यास संबंधित रुग्णाला उलट्या किंवा मळमळ होणे, फिट्स येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि शरीराचे अवयव निकामी होण्याचाही धोका असतो. जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढली आहे. २००० ते २०१९ या कालावधीत दरवर्षी जगभरातील सुमारे चार लाख ८९ हजार नागरिकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे अभ्यासातून समोर आले. त्यापैकी ४५ टक्के मृत्यू आशियात, तर ३६ टक्के मृत्यू युरोपमध्ये नोंदवले गेले. भारतातही उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि दीर्घकाळ राहू लागल्याने दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने मृत्यू होत आहे.
उष्माघातामुळे मृत्यूचे प्रमाण किती?
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये देशात उष्माघातामुळे एक हजार ८३२ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या दोन दशकांतील हा सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी २०१५ मध्ये उष्माघातामुळे एक हजार ९०८ जणांचा मृत्यू झाला होता. करोना महामारीच्या काळात या मृत्यूंच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. २०२१ मध्ये उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ३७४ इतका होता. त्यानंतर मात्र त्यात आणखीनच वाढ होत गेली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी मार्च ते जूनदरम्यान भारतात ७ हजारांहून अधिक संशयित उष्माघाताची प्रकरणे आणि १४ मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, या कालावधीतील अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना संबोधित करताना उष्माघातापासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुरुषांना उष्माघाताचा धोका जास्त का आहे?
देशात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असून पुरुषांना याचा अधिक धोका असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवालानुसार, २०२४ मध्ये सर्व वयोगटांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे उष्माघातामुळे अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये ३० ते ४४ वयोगटातील ५२५ पुरुषांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला, तर ४५ ते ५९ वयोगटात हा आकडा ५७७ इतका होता. या दोन्ही वयोगटांत महिलांच्या मृत्यूची संख्या पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होती. त्याशिवाय १८ ते २९ वयोगटातही १५२ पुरुषांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला, तर महिलांच्या मृत्यूंची संख्या २३ इतकी नोंदवली गेली. तज्ज्ञांच्या मते, पुरुष दीर्घकाळ बाहेर काम करत असल्याने त्यांना उष्णतेचा अधिक फटका बसतो. बांधकाम क्षेत्र, मजुरी, गिग वर्कर्स, कारखाने आणि शेती यांसारख्या कडक उन्हात कराव्या लागणाऱ्या क्षेत्रांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.
महिलांना उष्माघाताचा धोका कमी का असतो?
मुंबईतील ग्लेनईगल्स रुग्णालयातील अंतर्गत औषध विभागाच्या सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पुरुषांमध्ये स्नायूंचे प्रमाण आणि शरीराची अंतर्गत ऊर्जा खर्च होण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे शारीरिक श्रम करताना त्यांच्या शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. जरी पुरुषांना घाम जास्त येत असला, तरी दमट किंवा दमट हवामानात घाम सुकत नसल्याने शरीराला थंडावा मिळत नाही. याउलट महिलांमध्ये त्वचेतील रक्तवाहिन्यांचा विस्तार तुलनेने अधिक प्रभावी असल्याने त्यांच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत त्यांना उष्माघाताचा धोका कमी असतो. पुरुषांमध्ये सुरुवातीला दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची आणि त्रास सहन करत काम करत राहण्याची मानसिकता जास्त असते, ज्यामुळे त्यांना होणाऱ्या उष्माघाताची परिस्थिती अधिक गंभीर बनते.
उष्माघाताबाबत तज्ज्ञांचा इशारा काय?
ठाण्यातील कीम्स रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुंदर कृष्णन यांच्या मते, ऐतिहासिकदृष्ट्या पुरुषांमध्ये अतिश्रम किंवा व्यायामामुळे उष्माघाताचे प्रमाण जास्त राहिले आहे. विशेषतः मेहनतीची कामे, लष्करी प्रशिक्षण आणि क्रीडा क्षेत्रांतील पुरुषांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. उष्माघाताचा धोका पुरुषांमध्ये अधिक दिसून येत असला तरी त्यामागे केवळ जैविक कारणे नसून कामाच्या पद्धतीही कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. थकवा जाणवत असतानाही काम सुरूच ठेवणे किंवा सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करणे ही प्रवृत्ती महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळते. मात्र, उष्माघाताचा धोका हा परिस्थितीनुसार बदलणारा असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. तीव्र तापमानाचा फटका विशेषतः वृद्ध महिलांनाही मोठ्या प्रमाणात बसतो; कारण वाढत्या वयासोबत शरीराची उष्णता सहन करण्याची त्याची क्षमता कमी होते. मद्यपान, धूम्रपान, जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन, अपुरी झोप आणि कमी पाणी पिणे यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते. तसेच दुपारच्या तीव्र उन्हात व्यायाम खेळ किंवा जिम करणे शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण करू शकते, त्यामुळे उष्माघाताचा धोका हा केवळ लिंगावर अवलंबून नसून वातावरणातील उष्णता, शारीरिक श्रम, शरीराची क्षमता, वय आणि जीवनशैली अशा अनेक घटकांवर अवलंबून असतो, असेही डॉ. सुंदर यांनी नमूद केले.
