Herbal Cigarette Side Effects and health risks research: मागील काही वर्षांपासून सिगारेटला पर्याय असलेली काही उत्पादने आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो. त्यात मुख्यत: हर्बल सिगारेटचा समावेश आहे. तंबाखू नसलेली हर्बल सिगारेट ही नैसर्गिक व आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. तसेच या सिगारेटमुळे नैराश्य, चिंता आणि तणाव दूर करण्यात मदत मिळते असा दावा केला जातो. पारंपारिक सिगारेटमध्ये तंबाखू्मध्ये असलेले निकोटिन आरोग्यासाठी सर्वात घातक मानले जाते. जर सिगारेटमध्ये तंबाखूच नसेल व ती नैसर्गिक घटकांपासून तयार झाली असेल तर ती आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही, असा समज होऊ शकतो. परंतु, नुकत्याच एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्बल सिगारेट ही तंबाखूच्या सिगारेट इतकीच घातक असल्याचे निष्पन्न झाले आहे. हर्बल सिगारेट म्हणजे नेमकं काय? तिच्या सुरक्षिततेबाबत अभ्यासातून कोणती माहिती समोर आली? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
हर्बल सिगारेट्स म्हणजे काय?
हर्बल सिगारेट्स बनवण्यासाठी तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यात लवंग, तुळस, पुदिना आणि दालचिनी यांसारख्या औषधी वनस्पती आणि सुकवलेल्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे हर्बल सिगारेट या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात. पारंपारिक सिगारेट्समध्ये गुंडाळण्यासाठी कागदाचा वापर केला जातो, तर हर्बल सिगारेट्समध्ये तेंदूच्या पानांचा वापर केला जातो. भारतात सर्वाधिक ओढली जाणारी बिडी बनवताना तेंदूची पाने जशी वापरली जातात तसाच वापर तेंदूच्या पानांचा हर्बल सिगारेटसाठी केला जातो. हर्बल सिगारेट्स या साधारणपणे बिडीपेक्षा लांब, परंतु सिगारेटपेक्षा लहान आणि पातळ असतात.
अभ्यासातून काय समोर आले?
हर्बल सिगारेटशी संबंधित अभ्यास अहवाल १७ मे रोजी ‘जर्नल ऑफ हॅझर्डस मटेरियल्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला. ‘द लर ऑफ हेल्दियर स्मोक’ असे या अभ्यासाला नाव देण्यात आले होते. हर्बल आणि तंबाखूच्या सिगारेट्समधून निघणाऱ्या धुराचा भौतिक, रासायनिक आणि ऑक्सिडेटिव्ह परिणाम कसा होतो, याचा अभ्यास करण्यात आला.
अभ्यासाचे मुख्य लेखक आणि सध्या कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये हवेच्या गुणवत्तेच्या उत्सर्जनावर पोस्ट-डॉक्टरल संशोधन करत असलेले आलोक कुमार ठाकूर यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला याबाबत माहिती दिली. अनेक हर्बल सिगारेट्सची विक्री खोकला कमी करणे, झोप सुधारणे किंवा चिंता दूर करणे यांसारखे दावे करून केली जाते. अशा सिगारेट्सच्या चाचण्या आम्ही केल्या. हर्बल सिगारेटमधून निघणाऱ्या धुराचा व त्यामुळे होणाऱ्या धोकादायक परिणामांचा अभ्यास याआधी फार थोड्या प्रमाणात झाला होता, अशी माहिती आलोक यांनी दिली.
या अभ्यासात हर्बल व तंबाखू सिगारेट्सची तुलना करण्यात आली. भारतातील सर्वाधिक खप असलेल्या तंबाखूच्या दोन ब्रँड्सच्या सिगारेट व तुळस, लवंग, दालचिनी, पुदिना, ग्रीन टी, वॉटर लिली (कमळ) व कॅमोमाइल यांच्या मिश्रणापासून बनवलेल्या चार लोकप्रिय हर्बल सिगारेट यांचा अभ्यास करण्यात आला. हर्बल सिगारेट्समधून निघणारा धूर तंबाखूच्या सिगारेट्समधून निघणाऱ्या धुराइतकाच किंवा त्याहूनही अधिक असल्याचे चाचण्यांदरम्यान आढळून आले. “हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक ग्राहक ‘निकोटीन-मुक्त’ उत्पादनांना कमी हानिकारक समजतात”, असे सह-लेखक विशाल वर्मा यांनी सांगितले. ते युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथील सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग विभागात पर्यावरण अभियांत्रिकीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
हर्बल सिगारेट आरोग्यासाठी घातक का आहे?
संशोधकांनी मानवी श्वसनप्रक्रियेची हुबेहूब नक्कल करणाऱ्या एका बंद, दोन कप्प्यांच्या उपकरणात हर्बल आणि तंबाखूजन्य सिगारेट पेटवली. त्यानंतर त्यांनी धुराचे उत्सर्जन उपकरणांमध्ये गोळा करून नमुने गोळा केले. या नमुन्यांच्या ‘ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियल’चे मोजमाप करून त्याद्वारे विषारीपणाचा अंदाज लावला. ‘ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियल’ म्हणजे एखाद्या उत्पादनाची ‘रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज’ निर्माण करण्याची क्षमता होय. हे असे घातक रेणू (मॉलेक्युल्स) असतात जे शरीरात जळजळ निर्माण करतात, फुफ्फुसाच्या उतींचे नुकसान करतात आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरणारे रक्तवाहिन्यांमधील बदल घडवून आणतात.
तंबाखूच्या सिगारेटच्या तुलनेत हर्बल सिगारेटमधून निघणाऱ्या सूक्ष्म कणांमध्ये ‘ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियल’ लक्षणीयरीत्या जास्त नोंदवले गेले. यातही पानात गुंडाळलेल्या हर्बल सिगारेट सर्वात जास्त धोकादायक ठरल्या. त्यांचे ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियल कागदात गुंडाळलेल्या सिगारेट्सपेक्षा साधारणपणे ४९ टक्के जास्त होते. तुळसयुक्त एका हर्बल सिगारेटमध्ये शिशाचे (lead) प्रमाण सर्वात जास्त असल्याचे आढळून आले. तुळसयुक्त सिगारेटची विक्री “१०० टक्के नैसर्गिक घटकांसह रसायनमुक्त व आरोग्यदायी” असा दावा करून केली जाते.
हृदय विकार व श्वसनाच्या आजारांचा धोका?
संशोधकांना असेही आढळले की, हर्बल सिगारेटच्या धुरातून ५००-नॅनोमीटरपेक्षा कमी आकाराचे सूक्ष्म कण बाहेर पडतात. जे मानवी केसाच्या जाडीच्या शंभराव्या भागापेक्षाही सूक्ष्म असतात. तंबाखूच्या धुराच्या तुलनेत हर्बल धुरात या कणांचे प्रमाण अंदाजे २० टक्के जास्त होते. हे सूक्ष्म कण हृदयविकार आणि श्वसनाच्या आजारांचे कारण ठरतात. या धुराचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी मानवी पेशींवर प्रयोग करण्यास संशोधकांनी आता सुरूवात केली आहे.
हर्बल सिगारेटमुळे हवेत मिसळतात हानिकारक घटक?
आरोग्यावरील परिणामांशिवाय, या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, या सिगारेट्स जळताना सूक्ष्म कण, कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बन्ससारखे हानिकारक घटक हवेत मिसळतात. एम्स दिल्ली येथील ‘सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिन’चे प्राध्यापक डॉ. हर्षल रमेश साळवे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले, हर्बल सिगारेट्स या पारंपरिक सिगारेट्सइतक्याच आरोग्यासाठी घातक आहेत. “सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या सिगारेट्स हानिकारक आहेत. तंबाखूच्या सिगारेट्समध्ये नेहमीच निकोटीन असते, तर पारंपारिक सिगारेट्सना पर्याय म्हणून प्रमोट केल्या जाणाऱ्या ई-सिगारेट्स किंवा हर्बल सिगारेट्सच्या इतर प्रकारांमुळे कार्बन कण तयार होऊ शकतात, जे तितकेच हानिकारक आहेत”, असे ते म्हणाले.
