History of Hindi language origin and Indo-Aryan roots: राजशिबिरातच केवळ हिंदीच वापरली जात होती, असा काहीसा समज असल्यामुळे हिंदी ही भाषा केवळ मुघल छावण्यांमध्ये जन्माला आली असे वर्णन केले जाते. हे वाक्य ऐकायला आकर्षक वाटत असले तरी ऐतिहासिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. हिंदीचा इतिहास अधिक प्राचीन, अत्यंत व्यापक आणि अनेक पदर असलेला आहे. त्यामुळे, हिंदीचा विकास कसा झाला हे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ मुघल साम्राज्याकडे न पाहता उत्तर भारतातील जुन्या इंडो-आर्यन मुळांकडे आणि दख्खनने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेकडेही लक्ष दिले पाहिजे.
मुघल भारतात येण्यापूर्वीच हिंदीचा पाया रचला गेला होता.
या भाषेचे व्याकरण आणि मूळ संरचना संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि त्यानंतर उत्तर भारतातील सुरुवातीच्या बोलीभाषांच्या प्राचीन साखळीतून विकसित झालेले आहे. गंगा-यमुना दोआबमधील बोलीभाषा, विशेषतः दिल्ली आणि वायव्य प्रांताच्या आसपासच्या भागातील बोली, हळूहळू विकसित झाली. याच बोलीचे नामकरण विद्वानांनी ‘खडी बोली’ आणि ‘हिंदवी’ असे केले. मुघल साम्राज्याची स्थापना होण्यापूर्वी अनेक शतके या बोलीभाषा अस्तित्वात होत्या.
हिंदीचे व्याकरण आजही ‘इंडो-आर्यन’ का राहिले आहे?
या सर्व प्रक्रियेत दिल्ली सल्तनत आणि मुघल कालखंडाने उत्तर भारतामध्ये एका समान बोलीभाषेचा प्रसार वेगाने केला. पर्शियन (फारसी) भाषिक राज्यकर्ते, तुर्कीए आणि अफगाण सैनिक, भारतीय सैन्यभरतीतील जवान, व्यापारी आणि सुफी संत या सर्वांनाच संवादासाठी एका समान भाषेची गरज होती. बाजारपेठा, छावण्या आणि शहरांमध्ये उत्तर भारतातील स्थानिक बोलीभाषांचा पर्शियन आणि अरबी शब्दसंग्रहाशी मिलाफ झाला. यातूनच ‘हिंदुस्तानी’ या लवचिक भाषेचा जन्म झाला, ही भाषा दैनंदिन जीवनात संवादाचे प्रमुख साधन ठरली.
परंतु, केवळ शब्दसंग्रह म्हणजे व्याकरण नव्हे. हिंदी भाषेचे व्याकरण आजही भक्कमपणे ‘इंडो-आर्यन’ (भारतीय-आर्य) परंपरेचेच राहिले आहे. भाषेतील वाक्यरचना, सर्वनामे, लिंगाचे नियम आणि क्रियापदांची रूपे हे सर्व प्राचीन भारतीय परंपरांमधून आले आहेत. उदाहरणार्थ: ‘राम ने खाना खाया’ (रामाने जेवण केले) किंवा ‘सीता घर गयी’ (सीता घरी गेली). येथे भूतकाळात वापरला जाणारा ‘ने’ हा प्रत्यय आणि ‘गयी’ मधील लिंगानुसार बदलणारे क्रियापद, हे इंडो-आर्यन व्याकरणाचे स्पष्ट निदर्शक आहेत. व्याकरणाचा हा मूळ सांगाडा संस्कृत-प्राकृत वारशातून आलेला आहे; तो पर्शियन, अरबी किंवा तुर्की भाषांतून आलेला नाही.
हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण भाषेत अनेकदा शब्द सहजपणे उसने घेतले जातात, परंतु, व्याकरण सहजासहजी बदलत नाही.
दख्खनचे योगदान
इथे दख्खनविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. हिंदीच्या विकासाबाबतीत दख्खनच्या भूमिकेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. दिल्ली सल्तनत आणि त्यानंतर बहमनी व दख्खन सल्तनतीच्या काळात राजकीय सत्ता दक्षिणेकडे सरकली. त्यामुळे उत्तर भारतातील ‘हिंदवी’ बोली सैनिक, व्यापारी, कवी आणि सुफी संतांबरोबर दख्खनच्या पठारावर पोहोचली. तिथे या भाषेचा मराठी, तेलगू, कन्नड आणि इतर प्रादेशिक भाषांशी संबंध आला. या संपर्कातूनच ‘दख्खनी’ (Dakhni/Deccani) या हिंदुस्तानी भाषेच्या एका सुरुवातीच्या आणि समृद्ध रूपाचा जन्म झाला.
विरोधाभास असा की, हिंदुस्तानी भाषा उत्तर भारतात प्रमुख साहित्यिक भाषा होण्यापूर्वीच, ती दख्खनमध्ये (दक्षिणेत) बहरास आली होती. विजापूर आणि गोवळकोंडा येथील राजदरबारांनी दख्खनी भाषेतील कविता, प्रेमकथा आणि सुफी साहित्याला राजाश्रय दिला होता. अनेक अर्थांनी, दख्खननेच हिंदुस्तानी भाषेला तिची पहिली मोठी साहित्यिक ओळख मिळवून दिली. याच ठिकाणी दख्खनचे योगदान ऐतिहासिकदृष्ट्या निर्णायक ठरते.
दख्खनने या भाषेचे उच्चार, शैली आणि शब्दसंग्रहावर आपला प्रभाव पाडला. आजही हैदराबादी बोलीभाषेत ऐकू येणारे शब्द आणि वाक्प्रचार या स्मृती जतन करून आहेत. परंतु इथेही, भाषेचा व्याकरणाचा सांगाडा ‘इंडो-आर्यन’च राहिला. दख्खनने या भाषेला अधिक समृद्ध केले, परंतु, तिच्या मूळ संरचनेत कोणताही बदल केला नाही.
हिंदीचे व्याकरण तिच्या उगमस्थानाची गाथा सांगते
पूर्व भारतातील भाषांबाबतही हेच म्हणता येईल. बंगाली, आसामी आणि ओडिया या भाषा ‘इंडो-आर्यन’ परिवारातीलच आहेत, तरीही त्यांच्या व्याकरणाची समज (sensibilities) बरीच वेगळी आहे. उदाहरणार्थ, हिंदीच्या व्याकरणामध्ये ज्या प्रकारे लिंगभेद (gender) पाळले जातात, तसे बंगाली भाषेत पाळले जात नाही. हिंदी आजही क्रियापदे आणि विशेषणांमध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपे स्पष्टपणे वेगळी दर्शवते. यावरून असे दिसून येते की, प्रमाण हिंदीने पूर्व भारतातील भाषिक व्याकरणाचे नमुने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी हा भेद लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हिंदीचे शब्द ‘संपर्काची’ गाथा सांगतात, तर हिंदीचे व्याकरण तिच्या ‘उगमस्थानाची’ गाथा सांगते. तिचे शब्द पर्शियन राजदरबार, मुघल सैन्ये, दख्खनच्या बाजारपेठा आणि बहुभाषक शहरी जीवनाचे दर्शन घडवतात. परंतु, तिचे व्याकरण आजही उत्तर भारतातील त्या प्राचीन भाषिक परंपरेकडेच अंगुलिनिर्देश करते.
हिंदी ही एक ‘इंडो-आर्यन’ भाषा म्हणून समजून घेणेच सयुक्तिक ठरेल
आधुनिक प्रमाण हिंदीचा उदय खूप उशिरा, म्हणजे एकोणिसाव्या शतकात, ब्रिटीश राजवट आणि राष्ट्रवादाच्या उत्थानादरम्यान झाला. हे ‘हिंदुस्तानी’ भाषेचे अधिक ‘संस्कृतनिष्ठ’ रूप होते, ही भाषा देवनागरी लिपीत लिहिली गेली. याच काळात ती उर्दूहून वेगळी ओळखली जाऊ लागली; कारण उर्दूने पर्शियन शब्दसंग्रह आणि फारसी-अरबी लिपी अधिक प्रमाणात जपली होती. त्यामुळे, हिंदीची उत्क्रांती ही केवळ एका साम्राज्याची किंवा एका प्रदेशाची गाथा नाही. तर ती उत्तर भारतातील एका प्राचीन भाषेची गाथा आहे, जिने राजदरबार, लष्करी छावण्या आणि बाजारपेठांमधून प्रवास केला, जी दख्खनमध्ये अधिक परिष्कृत झाली आणि विविध संपर्कांमुळे समृद्ध झाली; तरीही तिने आपला मूळ व्याकरणाचा कणा कायम राखला. याच कारणामुळे, हिंदी ही मुघलांची भाषा म्हणून नाही, तर भारतीय उपखंडातील शतकानुशतकांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून घडलेली एक ‘इंडो-आर्यन’ भाषा म्हणून समजून घेणे सर्वात योग्य ठरते.
विषयशी संबंधित प्रश्न
- हिंदी भाषेला मुघलकालीन भाषा न मानता, शतकानुशतके भारतीय उपखंडात झालेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून आकाराला आलेली एक ‘इंडो-आर्यन’ भाषा मानणे अधिक सयुक्तिक का ठरते?
- भाषेत अनेकदा शब्द उसने घेतले जातात, परंतु व्याकरण मात्र सहजासहजी बदलत नाही. हिंदी भाषेच्या उत्क्रांतीच्या संदर्भात याचे विश्लेषण करा.
- हिंदुस्तानी भाषा उत्तर भारतात एक प्रमुख साहित्यिक भाषा होण्यापूर्वीच, ती दख्खनमध्ये (दक्षिण भारत) बहरास आली होती. हिंदुस्तानीला तिची पहिली मोठी साहित्यिक ओळख मिळवून देण्यात दख्खनच्या योगदानावर चर्चा करा.
- हिंदीचे शब्द तिच्या ‘संपर्काची’ गाथा सांगतात, तर हिंदीचे व्याकरण तिच्या ‘मुळाची’ (उत्पत्तीची) गाथा सांगते; यावर चर्चा करा.
