हिंदू धर्मात उत्सवाला खूप महत्त्व आहे. मग तो हिंदू भारतामधला असो किंवा जगातील इतर देशामधला. उत्सवप्रियता हा हिंदूचा स्थायीभाव आहे. इंडोनेशियासारख्या मुस्लीमबहुल देशातील हिंदू लोक जिवंत ज्वालामुखीचा पर्वत चढून एक उत्सव साजरा करतात. इंडोनेशियाच्या जावा प्रांतामधील ब्रोमो टेंगर सेमेरु नॅशनल पार्कमध्ये असलेल्या जिवंत ज्वालामुखीजवळ माऊंट ब्रोमो हा पर्वत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या पर्वतावर हजारो हिंदू लोक साकडे घालण्यासाठी जमा होत असतात. अनेक शतकांपासून उंच पर्वतावर येऊन 'यज्ञ कसादा' उत्सव साजरा करण्याची ही परंपरा जोपासली जात आहे. पर्वतावर येऊन हिंदू भाविक धगधगत्या ज्वालामुखीला जिवंत प्राणी, फळे, पिके अर्पण करतात. माऊंट ब्रोमोशी हिंदूंचे नाते सोमवारी हजारो हिंदू भाविकांनी माऊंट ब्रोमोच्या पर्वतावर चढण्यास सुरुवात केली. त्यांच्या पाठीवर शेळ्या, कोंबड्या आणि भाजीपाला बांधलेला होता. प्रत्येक वर्षी टेंगर जमातीचे लोक आजूबाजूच्या परिसरातून ज्वालामुखीच्या पायथ्याशी जमतात. तिथून माऊंट ब्रोमोचा पर्वत सर करण्यास सुरुवात केली जाते. पर्वताचे शिखर सूर्योदय पाहण्यासाठी अतिशय प्रसिद्ध मानले जाते. जावाच्या पूर्व प्रांतातील टेंगरिजी जमात आणि इतर स्थानिक हिंदू भाविक देवाला खूश करण्यासाठी त्यांच्यासोबत आणलेल्या वस्तू नैवेद्य म्हणून ज्वालामुखीला अर्पण करतात. पारंपरिक टेंगर दिनदर्शिकेप्रमाणे कसादा महिन्याच्या १४ व्या दिवशी या उत्सवाची सुरुवात करण्यात येते. मायइंडियामायग्लोरी डॉट कॉम या वेबसाइटच्या माहितीनुसार ज्वालामुखीच्या शिखरावर श्री गणेशाची एक प्राचीन मूर्ती स्थित आहे. टेंगरिजी हिंदू या गणेशमूर्तीची मनोभावे पूजा करतात. श्रीगणेश अनेक शतकांपासून त्यांचे रक्षण करत आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. माऊंट ब्रोमोच्या आसपास असेल्या टेंगर क्षेत्रातील जवळपास ४८ गावांमध्ये तीन लाख हिंदू लोक राहतात, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे. हे वाचा >> Photos : ७०० वर्षांपासून ज्वालामुखीवर विराजमान असलेल्या ‘Volcano गणेशा’ची गोष्ट; विस्फोटांदरम्यानही होते पूजा माऊंट ब्रोमो या पर्वताचे नाव हिंदू देवता ब्रह्मा यांच्या नावावरून पडले असल्याचे मानले जाते. जावा प्रांतामधील ब्रोमो टेंगर सेमेरु नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक जुलै २०१९ रोजी झाला होता. यामुळे आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नैवेद्य वाहिला ४० वर्षीय शेतकरी स्लॅमेट यांनी देवाला अर्पण करण्यासाठी एक छोटे वासरू स्वतःसोबत आणले होते. 'एएफपी' या वृत्तसंस्थेशी बोलत असताना त्यांनी सांगितले, "आमच्या घरी खूप पशुधन आहे. हे वासरू त्यापैकीच एक आहे. देवानेच सर्व दिले, त्यामुळे देवाला काही तरी अर्पण करावे, म्हणून मी हे वासरू सोबत आणले आहे. देवाने आम्हाला खूप काही दिले आहे, त्यामुळे आता आम्ही देवाला पुन्हा या गोष्टी अर्पण करत आहोत. जेणेकरून आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा यायला मिळेल." स्लॅमेट यांनी पर्वतावर गेल्यानंतर प्रार्थना करून सदर वासरू ज्वालामुखीमध्ये अर्पण न करता गावकऱ्यांना दान दिले, त्यामुळे वासराचा बळी जाण्यापासून वाचला. टेंगर जमातीचे नसलेले अनेक ग्रामस्थदेखील उत्सवाच्या काळात या पर्वतावर येतात आणि बांबूला जाळी लावून टेंगर जमातीचे लोक फेकत असलेल्या वस्तू झेलण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून या वस्तू वाया जाणार नाहीत. शेतकरी असलेल्या जोको प्रियांटो यांनी स्वतःसोबत शेतात पिकवलेल्या फळ-भाज्या आणल्या होत्या. ज्वालामुखीच्या धगधगत्या कुंडात या वस्तू त्यांनी अर्पण केल्या. प्रियांटो म्हणाले की, माझ्या प्रार्थनेनंतर आता देवाकडून मला आशीर्वाद मिळेल, अशी आशा वाटते. इंडोनेशियामध्ये १२० पैकी अधिक जिवंत ज्वालामुखी आहेत. तर इतर शंभराहून अधिक ज्वालामुखी नामशेष झाले आहेत. ज्वालामुखीला पुजण्याची प्रथा कशी सुरू झाली? सोमवारी (दि. ५ जून) ज्वालामुखीजवळ झालेला उत्सव करोना महामारीनंतर पहिल्यांदाच होत होता. मागच्या वर्षी यंत्रणेने अतिशय कमी भाविकांना या ठिकाणी येण्यास परवानगी दिली होती. ज्वालामुखी पर्वतावर होणारा हा उत्सव १५ व्या शतकापासून साजरा केला जात असल्याची दंतकथा येथे आहे. मजापहित साम्राज्यात ही प्रथा सुरू झाली. हिंदू-बुद्धिस्ट संस्कृतीचा मिलाप असलेले हे साम्राज्य दक्षिणपूर्व आशिया खंडात त्या वेळी पसरलेले होते. अशी आख्यायिका आहे की, राजकुमारी रोरो अँटेग आणि तिच्या पतीला अनेक वर्षं मूलबाळ होत नव्हते. या दाम्पत्याने देवाकडे मूल होण्याची याचना केली. त्यांच्या प्रार्थनेला यश मिळाले आणि त्यांना २५ मुले होतील, असे वरदान मिळाले. पण यासाठी दाम्पत्याने त्यांच्या सर्वात लहान मुलाला माऊंट ब्रोमोमध्ये अर्पण करावे, अशी अट ठेवण्यात आली. टेंगल लोकांच्या भल्यासाठी दाम्पत्याच्या मुलाने स्वतःहून ज्वालामुखीमध्ये उडी घेतली, अशी दंतकथा सांगितली जाते.