Ancient India Iran History Hindush Soldiers: इराण-इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांशी संबंधित अनेक विषय चर्चेत आहेत. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे या दोन्ही देशांशी भारताचे असलेले संबंध. इराण म्हणजे प्राचीन पर्शिया. भारताप्रमाणे या प्रांताचाही इतिहास हजारो वर्षे जुना आहे. भारत आणि इराण (पर्शिया) या दोन्ही देशांची सांस्कृतिक नाळ जुळलेली आहे. हाच ऋणानुबंध स्पष्ट करणारी एक घटना २५०० वर्षांपूर्वी घडली. पर्शियन राजा झेरेक्सेसच्या सैन्यात (भारतीय) हिंदूश सैनिकांच्या तुकडीची नोंद असल्याचा संदर्भ सापडतो. या पर्शियाच्या राजासाठी हिंदुस्थानी (भारतीय) सैनिक लढल्याचा हा संदर्भ आहे. परंतु, असे का घडले असावे हे समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावणे अपरिहार्य ठरते.

प्राचीन कालखंडात पर्शिया (आजचे इराण) महत्त्वाचे का होते?

पर्शियन संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि प्रभावशाली संस्कृतींपैकी एक मानली जाते. भौगोलिकदृष्ट्या प्राचीन कालखंडात पर्शियाचे स्थान महत्त्वाचे मानले जात होते. हा भाग आशिया, युरोप आणि आफ्रिका या तीन खंडांच्या मध्यभागी स्थित होता. पूर्वेकडे भारत आणि चीन होते, तर पश्चिमेकडे ग्रीस, रोम आणि इजिप्त होते. या दोन जगांना जोडणारा भू-मार्ग पर्शियातून जात असे. चीनला युरोपशी जोडणार्‍या ‘आद्य-रेशीम मार्गावरील’ (Proto Silk Road: पूर्ण विकसित Silk Road नंतरच्या काळात दिसतो) एक मोठा आणि महत्त्वाचा भाग पर्शियन भूभागातून जात असे. त्यामुळे पूर्व-पश्चिम व्यापारी जाळ्यांतील महत्त्वाचा भूभाग अशी पर्शियाची ख्याति होती.

पर्शियाच्या दक्षिणेला पर्शियन आखात (Persian Gulf) आणि अरबी समुद्र होता. डॅरियस प्रथमने सिंधू नदीपासून तांबड्या समुद्रापर्यंत सागरी मार्ग शोधल्यामुळे भारताचा व्यापार थेट इजिप्त आणि मेसोपोटेमियाशी जोडला गेला. ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सारख्या मोक्याच्या ठिकाणांवर पर्शियाचे नियंत्रण असल्यामुळे तत्कालीन सागरी व्यापाराची सूत्रे त्यांच्या हातात होती. पर्शियाच्या उत्तरेला कॅस्पियन समुद्र आणि दक्षिणेला समुद्र असल्यामुळे त्यांना नैसर्गिक संरक्षण मिळाले होते. पश्चिमेला झाग्रोस (Zagros) पर्वतरांगांमुळे शत्रूला सहजासहजी आक्रमण करणे कठीण जात असे.

प्राचीन पर्शिया

असीरियन साम्राज्याचा प्रभाव

इराणच्या इतिहासातील स्थानिक राजसत्तेचा उदय हा इसवी सन पूर्व सातव्या शतकात झाला. तत्पूर्वी इराणवर असीरियन साम्राज्याचा प्रभाव होता. इ.स.पूर्व सुमारे ९०० ते ६०० या काळात असीरियन साम्राज्य हे पश्चिम आशियातील सर्वात शक्तिशाली आणि आक्रमक साम्राज्य होते. त्यांचा प्रभाव आजच्या इराक, सीरिया, तुर्की आणि इराणच्या काही भागांवर होता.

क्रूर युद्धनीतीसाठी प्रसिद्ध

असीरियनांचा पश्चिम इराणातील काही भाग आणि झाग्रोस (Zagros) परिसरावर प्रभाव होता. असीरियन साम्राज्य हे अत्यंत क्रूर युद्धनीतीसाठी प्रसिद्ध होते. असीरियनांच्या दडपशाहीमुळे इराणमधील मिडियन जमाती एकत्रित आल्या. त्यांनी बॅबिलोनियन्सच्या मदतीने इ.स.पू. ६१२ मध्ये असीरियन राजधानी निनवे (Nineveh) पाडली. यामुळे असीरियन साम्राज्य कोसळले आणि मिडियन राजसत्ता (Median Empire) अस्तित्त्वात आली.

…आणि पर्शियन साम्राज्य अस्तित्त्वात आले

त्यानंतर इसवी सन पूर्व ६ व्या शतकात पर्शियन साम्राज्य अस्तित्त्वात आले. पर्शियन लोक हे मिडियनांच्या अधिपत्याखाली होते. पर्शियन साम्राज्याच्या सायरसने (Cyrus the Great) पर्शियन साम्राज्याचा विस्तार केला. प्रचलित लोककथेनुसार सायरस हा मिडियन राजा अॅस्टिआजेस याचा नातू होता. सायरसच्या जन्मापूर्वी तो आपल्या आजोबांच्या मृत्युला करणीभूत ठरणार आहे अशी भविष्यवाणी झाली होती असा संदर्भ लोककथांमध्ये सापडतो.

आणि अकेमेनिड साम्राज्य सुरू झाले

सायरसने इ.स.पू. ५५० च्या सुमारास मिडियनांविरुद्ध बंड पुकारले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजाविरुद्धच्या असंतोषामुळे मिडियन सैन्यातील अनेकांनी सायरसला पाठिंबा दर्शवला होता. या अंतर्गत फाटाफुटीचा फायदा घेवून सायरसने निर्णायक विजय मिळवला आणि मिडियन साम्राज्याचा अंत केला. याच कालखंडपासून इतिहासात पर्शियन साम्राज्याचे (Achaemenid Empire) एक नवीन पर्व सुरू झाले. पुढे सायरसने लिडिया (आजचा तुर्की भाग) जिंकले. बाबिलोन (Babylon) काबीज केले. विशेष म्हणजे, सायरस फक्त जिंकणारा योद्धा नव्हता, तर सहिष्णू आणि व्यावहारिक शासक होता. बाबिलोन जिंकल्यानंतर त्याने स्थानिक लोकांच्या धर्म आणि परंपरांचा आदर केला. सायरस सिलेंडर (Cyrus Cylinder) मध्ये त्याच्या या धोरणाचा उल्लेख आढळतो.

अकेमेनिड साम्राज्य

पर्शियन साम्राज्यातील हिंदूश भाग

सायरसनंतरचे कँबिसिस दूसरा, बार्डिया किंवा गौमाता सारखे राजे तुलनेने कमी महत्त्वाचे होते. त्यानंतर आलेला याच राजघराण्यातील डॅरियस प्रथम (Darius I) हा पर्शियन साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली आणि यशस्वी सम्राट मानला जातो. त्याने सिंध प्रांतात आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. डॅरियसने आपले सैन्य सिंधू नदीच्या प्रदेशात पाठवले आणि आजचा सिंध आणि आजच्या पंजाबचा काही भाग जिंकून घेतला. पर्शियन साम्राज्याचा हा पूर्व सीमेकडील प्रांत होता. हा प्रांत पर्शियन साम्राज्यात ‘हिंदूश’ (Hindush) म्हणून ओळखला जात होता.

सर्वाधिक महसूल सिंधू प्रांतातून

सिंध जिंकण्यापूर्वी डॅरियसने स्कायलॅक्स (Scylax) नावाच्या एका खलाशाला सिंधू नदीचा मार्ग शोधण्यासाठी पाठवले होते. स्कायलॅक्सने सिंधू नदीतून प्रवास करून अरबी समुद्रापर्यंतचा मार्ग शोधला, परिणामी डॅरियसला हा प्रदेश जिंकणे सोपे झाले. पर्शियन साम्राज्यासाठी सिंध प्रांत अत्यंत महत्त्वाचा होता. हा प्रांत पर्शियन साम्राज्यातील सर्वात श्रीमंत प्रांतांपैकी एक होता. डॅरियसला येथून मोठ्या प्रमाणात कर मिळत होता. या एकाच प्रांताकडून संपूर्ण साम्राज्याला सर्वात जास्त महसूल मिळत असे. या प्रांताकडून दरवर्षी ३६० टॅलेंट गोल्ड डस्ट (Gold dust: नद्यांच्या पात्रात किंवा खडकांच्या भेगांमध्ये सोन्याचे अतिशय बारीक रेणू किंवा कण साचलेले असतात त्याला ‘गोल्ड डस्ट’ म्हणतात) कर स्वरूपात पर्शियाला पाठवली जात असे.

सिंध आणि ‘गोल्ड डस्ट’चा ऐतिहासिक संदर्भ

इतिहासकार हेरोडोटसने आपल्या नोंदीत म्हटले आहे की, डॅरियसच्या साम्राज्यातील इतर प्रांत कर (Tax) म्हणून चांदी (Silver) देत असत, पण ‘हिंदुश’ (सिंध) हा एकमेव प्रांत होता जो सोन्याची भुकटी (Gold Dust) कर म्हणून देत होता. सिंध प्रांत दरवर्षी ३६० टॅलेंट (Talents) इतकी सोन्याची भुकटी पर्शियन राजाला पाठवत असे (एक टॅलेंट म्हणजे साधारण २५ ते ३० किलो, म्हणजेच सुमारे ९,००० ते १०,००० किलो सोने- परंतु, काही अभ्यासकांनी हा आकडा अतिशयोक्त असू शकतो असे नमूद केले आहे). हे सोने सिंधू नदीच्या वरच्या पट्ट्यातून (आजचा गिलगिट-बाल्टिस्तान किंवा लडाखचा भाग असावा असे काही अभ्यासक मानतात) नद्यांच्या वाळूतून गाळून काढले जात होते.

सोन्याच्या धुळीशी संबंधित दंतकथा

या सोन्याच्या धुळीशी संबंधित एक रंजक कथा ग्रीक इतिहासकारांनी नोंदवलेली आहे. भारतातील वाळवंटात मोठ्या आकाराच्या मुंग्या जमीन पोखरून सोने बाहेर काढतात आणि स्थानिक लोक ती सोन्याची धूळ चोरून आणतात अशी कथा इतिहासकारांनी नोंदवलेली आहे. (आधुनिक संशोधकांनुसार, त्या मुंग्या म्हणजे प्रत्यक्षात मार्मोट्स (Marmots) नावाचे प्राणी असावेत जे हिमालयीन प्रदेशात बिळ खणताना सोन्याचे कण असलेली माती बाहेर टाकतात आणि स्थानिक लोक ती जमा करतात.)

झेरेक्सेस पहिला आणि हिंदूश

डॅरियस प्रथम (Darius I) नंतर त्याचा मुलगा झेरेक्सेस प्रथम (Xerxes I-इ.स.पूर्व ५) पर्शियन साम्राज्याचा सम्राट झाला. त्याने जवळपास दोन दशकं राज्य केलं. त्याच्या कारकिर्दीत पर्शियन साम्राज्य हे त्या काळातील सर्वात मोठ्या आणि संघटित साम्राज्यांपैकी एक होते. पश्चिमेला ग्रीसच्या सीमांपासून ते पूर्वेला सिंधू (Indus) नदीपर्यंत आणि दक्षिणेला इजिप्तपर्यंत पर्शियाचा विस्तार होता. झेरेक्सेस हा ग्रीक-पर्शियन युद्धांमधील (Greco-Persian Wars) त्याने केलेल्या ग्रीसवरील आक्रमणासाठी ओळखला जातो. इ.स.पू. ४८० मध्ये त्याने प्रचंड सैन्य उभारून ग्रीसवर चढाई केली; या सैन्यात विविध प्रदेशांतील सैनिक होते, त्यात हिंदूश (सिंधू प्रदेश) येथील भारतीय तुकड्यांचाही समावेश होता.

हिंदूश उल्लेख असलेले भारताबाहेरील शिलालेख

‘हिंदूश’ हा शब्द मूळ संस्कृत शब्द ‘सिंधू’ (Indus) याचे पर्शियन रूप आहे. प्राचीन पर्शियन भाषेत ‘स’ (S) चा उच्चार ‘ह’ (H) असा केला जाई. त्यामुळे ‘सिंधू’ नदीच्या पलीकडील प्रदेशाला पर्शियन लोक ‘हिंदूश’ म्हणू लागले. ‘हिंदूश’ या शब्दाचा संदर्भ अकेमेनिड काळातील पर्सेपोलिस शिलालेख (Persepolis Inscription), नक्श-ए-रुस्तम (Naqsh-e-Rustam) या पर्शियन अभिलेखांमध्ये येतो.

हिंदूश सैन्याचे ऐतिहासिक संदर्भ

पर्सेपोलिस येथील एका भिंतीवर झेरेक्सेसचा ‘दाहेवा’ (Daiva Inscription) हा प्रसिद्ध शिलालेख आहे. यात त्याने ‘हिंदुश’ (सिंधू खोऱ्याचा प्रदेश) आणि ‘गंधार’ या प्रदेशांचा उल्लेख त्याच्या नियंत्रणाखालील प्रदेश म्हणून केला आहे. पर्सेपोलिसमधील ‘अपादान’ (Apadana Reliefs) या भव्य दरबाराच्या पायऱ्यांवर विविध देशांच्या प्रतिनिधींची शिल्पचित्रे (Reliefs) आहेत. यात भारतीय प्रतिनिधींची (Hindush) चित्रे आहेत, यात त्यांनी धोतरासारखे वस्त्र नेसले आहे आणि हातात खांद्यावर वाहून नेणारी कावड किंवा भेटवस्तू आहेत (Tribute-bearers). ही चित्र सैनिकांची नसली तरी भारतीय लोक पर्शियन दरबाराचा भाग होते याचा हा दृश्य पुरावा आहे. तसेच डॅरियसच्या थडग्यावर भारतीय प्रतिनिधीने (Hindush delegate) साम्राज्याचे सिंहासन पेललेले दाखवले आहे. या चित्रातून हिंदूश हे हे पर्शियन साम्राज्याचा एक आधारस्तंभ होते हे लक्षात येते.

हेरोडोटसचा संदर्भ (Herodotus)

सर्वात स्पष्ट लष्करी संदर्भ ग्रीक इतिहासकार हेरोडोटस याने दिला आहे. त्याने झेरेक्सेसच्या ग्रीसवरील आक्रमणाचे (इ.स.पू. ४८०) वर्णन करताना पर्शियन सैन्यातील भारतीय तुकडीचे सविस्तर वर्णन केले आहे. भारतीय सैनिक सुती कपडे घालत असत (सुती कपडाचे वर्णन ‘वृक्षांपासून तयार केलेली लोकर’ असे केले आहे). त्यांच्या हातात बांबूची धनुष्ये आणि लोखंडी टोकाचे बाण होते. हेरोडोटसने असेही नमूद केले आहे की, भारतीय धनुर्धारी (Archers) हे त्यांच्या अचूक निशाण्यामुळे पर्शियन सैन्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या बांबूच्या धनुष्यांचा धाक ग्रीक सैन्यालाही होता, असे इतिहासकार मानतात.

भारतीय कारागिरांचे अभिलेखीय पुरावे

हेरोडोटसने पुढे म्हटले आहे की, झेरेक्सेसच्या पायदळात (Infantry) आणि घोडदळात (Cavalry) भारतीय सैनिक होते. इतकेच नाही तर काही भारतीय सैनिक रथांचा वापर करत असल्याचेही त्याने म्हटले आहे. याशिवाय, सम्राट डॅरियस आणि झेरेक्सेस यांनी सुसा (Susa) येथील राजवाड्याच्या बांधकामातही भारतीय कारागिरांचा आणि साहित्याचा (उदा. हस्तिदंत आणि सागवान लाकूड) वापर केल्याचे अभिलेखीय पुरावे सापडतात.

भारतीय सैनिक ग्रीसच्या रणांगणावर…

अडीच हजार वर्षांपूर्वी झेरेक्सेसच्या सैन्यात दिसणारी ‘हिंदूश’ (Hindush) ही तुकडी कोणत्याही आधुनिक राष्ट्रवादाची किंवा धर्माची प्रतिनिधी नव्हती; तर ती तत्कालीन साम्राज्यविस्ताराची एक नैसर्गिक परिणती होती. सिंधू खोऱ्याचा प्रदेश पर्शियन अकेमेनिड (Achaemenid) साम्राज्याचा अविभाज्य भाग झाल्यानंतर तिथल्या जनजीवनाचा प्रवाह साम्राज्याच्या करप्रणाली, व्यापार आणि लष्करी व्यवस्थेशी जोडला गेला. याच ऐतिहासिक प्रक्रियेमुळे भारतीय सैनिक ग्रीसच्या रणांगणावर झेरेक्सेसच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले दिसतात.

प्राचीन जगातील वास्तवाचे प्रतिबिंब

त्यामुळेच प्राचीन इतिहासाची पडताळणी करताना त्यावर आजच्या काळातील राजकीय किंवा धार्मिक संकल्पना लादणे दिशाभूल करणारे ठरू शकते. आजचा ‘हिंदू’ हा शब्द आणि त्या काळातील भौगोलिक ‘हिंदूश’ यातील सूक्ष्म पण मूलभूत फरक समजून घेतल्यास हा इतिहास अधिक स्पष्ट होतो. म्हणूनच, या प्रसंगाकडे केवळ भारत-इराण संबंधांचे ‘गौरवगीत’ म्हणून न पाहता, प्राचीन जगातील सत्तासंघर्ष, व्यापार आणि साम्राज्यांच्या गुंतागुंतीच्या वास्तवाचे एक प्रतिबिंब म्हणून पाहणे अधिक संयुक्तिक ठरेल.

संदर्भ सूची/References:

  • Briant, Pierre. From Cyrus to Alexander: A History of the Persian Empire. Winona Lake, IN: Eisenbrauns, 2002.
  • Herodotus. The Histories. Translated by Aubrey de Sélincourt. London: Penguin Classics, 2003.
  • Kuhrt, Amélie, ed. The Persian Empire: A Corpus of Sources from the Achaemenid Period. London: Routledge, 2007.