Why do humans have chins?: मानवी शरीराची ठेवण ही इतर सजीवांपेक्षा निश्चितच वेगळी आहे. माकडांशी साधर्म्य असलं तरी फरकही स्पष्टच दिसून येतो. एखाद्या मशिनीमधील यंत्रणा जितकी प्रभावी ठरावी तितकीच प्रभावी मानवी शरीरातील यंत्रणा आहे. माणसाच्या शरीरातील सूक्ष्म पेशींपासून ते हात-पाय, डोळे, यकृत आणि मेंदूपर्यंत वेगवेगळे अवयव चार अब्ज वर्षांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात टप्प्याटप्प्याने घडत गेले. तरीही मानवी शरीराची रचना याच स्वरूपात विकसित का झाली? हा प्रश्न आजही अभ्यासकांना कोड्यात टाकणारा आहे.

माणसाला ठळक दिसणारी हनुवटी का आहे? किंवा शरीराच्या वजनाची तुलना केली तर मानवी अंडकोष गोरिलाच्या अंडकोषांपेक्षा तिप्पट मोठे आहेत, तर चिंपांझीच्या अंडकोषांच्या केवळ पाचव्या भागाएवढेच का असतात? असे एक ना अनेक प्रश्न आजही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.

उत्क्रांतीची वळणावळणाची कथा

या भूतलावर असणारी प्रत्येक प्रजाती नेमकी कशी घडत गेली हे आपल्याला उत्क्रांतीच्या इतिहासातून समजते. आज दिसणाऱ्या जटिल प्रजाती अगदी साध्या सजीवांपासून, हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने घडत गेल्या. ही प्रक्रिया एका सरळ रेषेत न होता लाखो वर्षांच्या कालावधीत विविध वळणं घेत पुढे सरकली. ‘जीवनवृक्ष’ (evolutionary tree of life) ही संकल्पना याच प्रक्रियेचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे झाडाच्या खोडापासून अनेक फांद्या फुटतात, तसंच एका सामायिक पूर्वजापासून वेगवेगळ्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या.

प्रत्येक टप्प्यावर अधिक गुण जोडले गेले

या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आधीच्या गुणधर्मांवर नवे, अधिक गुण जोडले गेले. उदाहरणार्थ, मानव हा आधी प्राणी आहे, त्यानंतर पृष्ठवंशी प्राणी (Vertebrate) म्हणून त्याच्यात मणका असलेला कणा विकसित झाला, पुढे सस्तन प्राणी म्हणून उबदार रक्त, केस आणि स्तनग्रंथी यांसारखी वैशिष्ट्ये विकसित झाली. अखेरीस प्रायमेट्समध्ये सामील होत हात, डोळे व मोठा मेंदू विकसित झाला. त्यामुळे सजीव उत्क्रांती वेगवेगळ्या टप्प्यांवर झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला उत्क्रांतीचा वळणावळणाचा, पण सुसंगत प्रवास समजून घ्यायला मदत करते.

जीवनवृक्ष काय सांगतो? मानवी शरीरातील अवयव कोणत्या क्रमाने विकसित झाले?

म्हणजेच, उत्क्रांतीच्या ‘जीवनवृक्षा’वर दिसणारी प्रत्येक शाखा एखाद्या विशिष्ट सजीवगटाचं प्रतिनिधित्व करते आणि त्या गटात सामील असलेल्या सर्व प्रजातींमध्ये काही मूलभूत शारीरिक वैशिष्ट्ये समान असतात. आपण ज्या- ज्या प्रजातींबरोबर एखादी शाखा सामायिक करतो, त्या टप्प्यावर आपल्या शरीरात कोणते अवयव किंवा रचनात्मक गुण आधीपासून अस्तित्वात होते, हे समजते. उदाहरणार्थ, शरीराची मूलभूत रचना आणि अन्न पचवण्याची व्यवस्था ही अगदी आधी, प्राणी म्हणून आपण अस्तित्वात आलो तेव्हा विकसित झाली. त्यानंतर खूप काळाने पाठीचा मणका आणि हात-पाय तयार झाले, जे पृष्ठवंशी प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे, दूध तयार करणाऱ्या ग्रंथी आणि केस ही सस्तन प्राणी झाल्यावरची वैशिष्ट्ये आहेत, तर नखे ही आणखी पुढील टप्प्यावर, प्रायमेट्समध्ये सामील झाल्यावर विकसित झाली.

उत्परिवर्तनात्मक उत्क्रांती म्हणजे काय? ‘जीवनवृक्ष’ कसा गोंधळ निर्माण करतो?

उत्क्रांतीचा ‘जीवनवृक्ष’ वापरून शरीरातील एखादा भाग का विकसित झाला, हा प्रश्न स्वतंत्रपणे अभ्यासता येतो. मात्र ही पद्धत तेव्हाच खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते, जेव्हा एखादं वैशिष्ट्य ‘जीवनवृक्ष’च्या वेगवेगळ्या शाखांवर वेगवेगळ्या काळात स्वतंत्रपणे तयार झालेलं दिसतं. अशा प्रकारे पुन्हा-पुन्हा घडणाऱ्या उत्क्रांतीला उत्परिवर्तनात्मक उत्क्रांती (convergent evolution) असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया जीवशास्त्रज्ञांसाठी अनेकदा गोंधळात टाकणारी ठरते, कारण दिसायला सारखी असलेली प्रजाती प्रत्यक्षात दूरची नातेवाईक असू शकते. उदाहरणार्थ, स्वॅलोज (swallows) आणि स्विफ्ट्स (swifts) हे पक्षी पूर्वी जवळचे नातेवाईक, म्हणजेच बहिणी प्रजाती (sister species) मानले जात होते. मात्र डीएनए अभ्यास आणि सांगाड्यांच्या तुलनात्मक अभ्यासातून आता स्पष्ट झालं आहे की, स्वॅलोज हे स्विफ्ट्सपेक्षा घुबडांशी अधिक जवळचं नातं सांगतात.

उत्क्रांतीत आकाराला महत्त्व असतं

उत्परिवर्तनात्मक (convergent) उत्क्रांतीकडे आपण नैसर्गिक प्रयोगासारखं पाहिलं, तर ती फार उपयोगी ठरते. प्रायमेट्समध्ये अंडकोषांचा आकार याचं हे एक ठळक उदाहरण आहे. अबिसिनियन काळा-पांढरा कोलोबस माकड आणि बोनेट माकाक या दोन माकडांचे प्रौढ नर आकाराने जवळपास सारखेच असतात. तरीही, चिंपांझी, मानव आणि गोरिलांप्रमाणेच, दिसायला सारख्या वाटणाऱ्या या माकडांमध्ये अंडकोषांच्या आकारात मोठा फरक आढळतो. कोलोबस माकडाचे अंडकोष फक्त सुमारे ३ ग्रॅम वजनाचे असतात, तर माकाक प्रजातीमध्ये हे वजन थेट ४८ ग्रॅमपर्यंत जाते. या फरकासाठी अनेक कारणं सांगता येतील. उदाहरणार्थ, मोठे अंडकोष हे मोराच्या पिसाऱ्यासारखे केवळ आकर्षणासाठी असावेत, असंही वाटू शकतं. पण सर्वात जास्त पटणारं कारण म्हणजे या प्रजातींची प्रजनन पद्धत, जी अंडकोषांच्या आकारावर थेट परिणाम करते.

कोलोबस आणि माकाक माकडांची प्रजनन पद्धत

नर कोलोबस माकड मादींच्या एका हरमपर्यंत पोहोचण्यासाठी तीव्र आणि आक्रमक स्पर्धा करतो आणि एकदा हा हरम मिळाला की, त्या माद्या केवळ त्याच नराशीच संयोग (मैथुन) करतात. याच्या अगदी उलट चित्र माकाक माकडांमध्ये दिसतं. माकाक माकडे साधारण तीस सदस्यांच्या शांत, मिश्र कळपांमध्ये राहतात आणि त्यांची प्रजनन पद्धत वेगळी आहे. इथे संयोग एका नरापुरता मर्यादित नसतो; जवळजवळ प्रत्येक नर अनेक माद्यांशी संयोग करतो आणि प्रत्येक मादीही अनेक नरांशी संयोग करते. म्हणजेच, या कळपात बहुपत्नी (polygamy) आणि बहुपुरुषी (polyandry) संयोग एकाच वेळी आढळतो.

अंडकोषांचा आकार आणि लैंगिक वर्तन: गोरिला, चिंपांझी आणि डॉल्फिन्स काय सांगतात?

लहान अंडकोष असलेला, चांदीसारख्या पाठीवरच्या केसांमुळे ओळखला जाणारा (सिल्व्हरबॅक) नर गोरिला माद्यांच्या एका हरमवर पूर्ण नियंत्रण ठेवतो आणि त्या माद्या केवळ त्याच नराशी संयोग करतात. याच्या उलट, मोठे अंडकोष असलेले चिंपांझी आणि बोनोबो यांचं लैंगिक वर्तन खूपच मुक्त स्वरूपाचं असतं, जिथे अनेक नर आणि माद्या एकमेकांशी संयोग करतात. डॉल्फिन्सच्या बाबतीत तर हा प्रकार आणखी टोकाचा दिसतो. कदाचित सर्व सस्तन प्राण्यांमध्ये डॉल्फिन्सचे अंडकोष सर्वात मोठे असतात.

Huuman-evolution-tree
मानवी उत्क्रांतीचा वृक्ष

डॉल्फिन्सच्या एकूण शरीरवजनाच्या सुमारे ४ टक्के वजन फक्त अंडकोषांचं असतं. तुलना म्हणून पाहिलं तर, माणसांमध्ये अंडकोषांचं वजन शरीरवजनाच्या फारच नगण्य भागाएवढं असतं; माणसांमध्ये डॉल्फिनएवढंच प्रमाण असतं, तर अंडकोष सुमारे ३ किलो वजनाचे असते. नैसर्गिक अवस्थेत डॉल्फिन्सचं लैंगिक वर्तन अभ्यासणं जरी अवघड असलं, तरी स्पिनर डॉल्फिन्सच्या बाबतीत चित्र बऱ्यापैकी स्पष्ट आहे. हे डॉल्फिन्स ‘वझल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक संयोगाच्या घटनांमध्ये सहभागी होतात, जिथे अनेक नर आणि माद्या एकाच वेळी संयोग करतात.

पण मग मानवी हनुवटीचं काय?

मानवी हनुवटी नेमकी कशासाठी विकसित झाली, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. अंडकोषांप्रमाणेच, हनुवटीच्या उत्क्रांतीचं ठोस कारण आजही निश्चित सांगता आलेलं नाही, त्यामुळे तिच्या उगमाबाबत अनेक मते मांडली गेली आहेत. काहींच्या मते, आदिमानवाच्या काळात लढाई किंवा संघर्षाच्या वेळी जबडा अधिक मजबूत राहावा म्हणून हनुवटी विकसित झाली असावी. काही शास्त्रज्ञ असंही मानतात की पुरुषी दाढी अधिक उठून दिसावी, तिचं सौंदर्य अधोरेखित व्हावं, यासाठी हनुवटी उपयोगी ठरली असावी. तर इतर काही तर्कांनुसार स्वयंपाकाचा शोध लागल्यानंतर अन्न मऊ झालं, जबड्याची ताकद हळूहळू कमी झाली आणि त्या मागे सरकणाऱ्या जबड्यामुळे चेहऱ्यावर उरलेला, कदाचित कार्यरहित, उंचवटा म्हणजेच हनुवटी असावी.

मात्र गंमत अशी की, इतर कोणत्याही सस्तन प्राण्यात… अगदी आपल्या सर्वात जवळच्या नातेवाईकांमध्ये, निएंडरथल्समध्येही हनुवटी आढळत नाही. हनुवटी ही केवळ होमो सेपियन्सचीच वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. त्यामुळे तिच्या उत्क्रांतीमागे नेमकं कारण काय असावं, याबाबत आपण अनेक शक्यता मांडू शकतो. पण ही रचना वेगवेगळ्या प्रजातींमध्ये स्वतंत्रपणे विकसित झालेली नसल्यामुळे, म्हणजेच उत्परिवर्तनात्मक उत्क्रांतीचा आधार नसल्यामुळे, त्या कल्पनांची शास्त्रीय चाचणी घेण्याचा ठोस मार्ग आपल्याकडे नाही. त्यामुळे मानवी शरीर आणि स्वभावातील काही गोष्टी कदाचित कायमच पूर्णपणे न उलगडणाऱ्या गूढ स्वरूपातच राहतील.