प्रागैतिहासिक काळापासून मानवी मेंदू आकुंचन पावत आला आहे, असे काही अभ्यासांनुसार समोर येत असतानाच दोन दशकांत असे पुरावे सादर झाले की, त्यातून मानवाचा बुद्ध्यांक वाढल्याचे उघड झाले. मग मेंदू लहान होत असताना बुद्धिमत्ता कशी वाढते, याविषयी.

मेंदूच्या आकाराबाबत शास्त्रज्ञांचे

लाइव्ह सायन्स या संकेत स्थळाने मेंदूच्या आकाराचा बुद्धिमत्तेशी काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी विविध देशांतील शास्त्रज्ञांशी संपर्क साधला. यावेळी डार्टमाउथ महाविद्यालयातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक जेरेमी डिसिल्वा यांनी सांगितले की, सर्वप्रथम हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मेंदूचा मोठा आकार म्हणजे उच्च बुद्धिमत्ता असेलच असे नाही. मानवांमध्ये बुद्धिमत्तेच्या मापनाशी मेंदूच्या आकाराचा संबंध खूपच कमी असतो, असे सांगताना त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे उदाहरण दिले. आइन्स्टाइन यांचा मेंदू खूपच लहान होता, तरी ते ‘आइन्स्टाइन’ होते, असे त्यांनी सांगितले.

आइन्स्टाइनच्या बाबतीत असे दिसते की त्यांच्या मेंदूच्या अनेक भागांमधील विलक्षण घड्यांच्या रचनेमुळे त्यांच्या प्रतिभेचे स्पष्टीकरण मिळू शकते. यावर काही वादविवाद असले तरी, अभ्यासातून बुद्धिमत्ता आणि मेंदूचा आकार यांच्यात फारसा किंवा कोणताही संबंध नसल्याचे दिसून येते. इतर शास्त्रज्ञांनीही असेच निष्कर्ष नोंदवले.

दरम्यान डिसिल्वा यांनी असेही स्पष्ट केले की, सध्या उपलब्ध असलेली माहिती अलीकडच्या काळात मेंदूच्या आकारात घट होण्याचा एक स्पष्ट, जागतिक कल दर्शवत आहे. त्यांनी युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या ५,००० हून अधिक कवट्यांचा अभ्यास केला. यापैकी अनेक कवट्या या होलोसीन काळातील होत्या. मेंदू विज्ञानात डॉक्टरेट पदवी मिळवलेले तसेच मेंदूच्या आकुंचनाच्या विषयावर अनेक शोधनिबंध सादर केलेले जेफ स्टिबेल यांच्या मते तापमानवाढीच्या काळात आधुनिक मानवांच्या मेंदूच्या आकारात १० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

स्टिबेल यांनी डिसिल्वा यांच्या संशोधनात भाग घेत जगभरातील सुमारे ८०० कवटींतील मेंदूच्या आकाराचे विश्लेषण करून अधिक माहिती गोळा केली. स्टिबेल यांच्या प्रमाणेच ऑस्ट्रेलियातील ॲडलेड विद्यापीठातील मानववंशशास्त्रीय आणि तुलनात्मक शरीररचनाशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक मॅसीज हेनेबर्ग यांनादेखील त्यांच्या संशोधनात होलोसीन युगाच्या संपूर्ण काळात मानवी मेंदूचा आकार त्याच्या मूळ आकारमानाच्या सुमारे १० टक्क्याने, म्हणजेच सरासरी सुमारे १५० मिलीलिटरने कमी झाल्याचे आढळून आले.

दुसरीकडे, लास वेगास येथील नेवाडा विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक ब्रायन विल्मोअर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात मानवी मेंदू आकुंचन पावत असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. विल्मोअर यांनी स्पष्ट केले की, त्यांना मानवाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाल्यानंतरच्या काळात मेंदूत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाल्याचा पुरावा दिसला नाही.

युरोपीयन नागरिकांचा मेंदूचा सर्वाधिक अभ्यास?

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक जॉन हॉक्स यांनी गेल्या १५,००० वर्षांमध्ये काही मानवी समूहांमधील मेंदूचा आकार कमी झाल्याचे सांगितले. मात्र त्याच वेळी या प्रक्रियेत गुंतागुंत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हॉक्स यांच्या मते मेंदूच्या आकाराच्या अभ्यासात युरोपीय वंशाच्या पुरुषांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे विविध लोकसंख्येमध्ये जागतिक कल आहे की नाही, हे ठरवणे कठीण होत होते. याउलट औद्योगिकीकरण होत असलेल्या देशांमध्ये १५० वर्षांत मेंदूचा आकार पुन्हा वाढू लागल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी मेंदूच्या आकारातील बदलाला शरीराचे पोषण मुख्य कारण असल्याची शक्यता वर्तवली.

मानवी मेंदू लहान का होत आहे?

मेंदू आकुंचन का पावत आहे, याबद्दल शास्त्रज्ञांनी काही कल्पना मांडल्या आहेत. त्यापैकी एक शेतीच्या प्रारंभाशी संबंधित कल्पना मॅसीज हेनेबर्ग यांनी मांडली. त्यांच्या मते होलोसीन काळात मानवांनी हळूहळू अन्न उत्पादन सुरू केल्यामुळे त्यांना मोठ्या समुदायांमध्ये राहणे शक्य झाले. याचा परिणाम म्हणून मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि शक्तिशाली भक्षकांपासून कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी सुरुवातीला मानवाकडे असलेली प्रचंड शारीरिक शक्ती कमी आवश्यक झाली. त्यामुळे शारीरिक बदल होत गेले. त्यावेळी केवळ आपला मेंदूच नाही, तर आपले शरीरदेखील आकुंचन पावल्याचे हेनेबर्ग यांनी सांगितले. त्यांच्यानुसार हिमयुगाच्या शेवटी पुरुषांची उंची सरासरी १.७५ मीटर (५.७४ फूट) होती, तर मध्य-होलोसीन काळातील कृषिप्रधान समुदायांमध्ये ती सरासरी १.६५ मीटर (५.४१ फूट) होती.

दरम्यान, जाॅन हाॅक्स यांच्या मते जगाच्या काही भागांमध्ये अलीकडे मानवाची उंची पुन्हा वाढत असून त्याचप्रमाणे मेंदूचा आकारही पुन्हा वाढत असावा. मेंदूच्या आकुंचन पावण्यामागे हिमयुगाच्या समाप्तीनंतर झालेली तापमानवाढदेखील एक घटक असू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जेफ स्टिबेल यांनी बर्गमनचा नियम आणि ॲलनचा नियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैविक तत्त्वांचा आधार घेत उष्ण हवामानात उष्णता बाहेर टाकण्यासाठी शरीर आणि अवयव अधिक सडपातळ होत असल्याचे नमूद केले. तर काही शास्त्रज्ञांनी मानवाने महत्त्वाची कामे करण्यास सुरुवात केल्याने तसेच एकमेकांशी अधिक माहितीची देवाणघेवाण केल्यामुळे मानवाच्या बुद्धिमत्तेत बदल झाल्याचे सांगितले.

मुंग्या, गांधीलमाशी यांचा मानवी मेंदूशी संबंध?

जेरेमी डिसिल्वा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासाचा दाखला दिला. यामध्ये मुंग्या, गांधीलमाशी यांसारख्या समूहाने राहणाऱ्या कीटकांमध्ये संख्येतील वाढ, त्यानंतर समूहातील जीवांचे विशिष्ट भूमिकांमध्ये झालेले विशेषीकरण आणि सामूहिक बुद्धिमत्तेची वाढ याचे साधर्म्य मानवाशी जोडले. मुंग्या आणि गांधीलमाशी यांच्यात जे बदल दिसून आले तसेच बदल मानवामध्ये झाल्याचे त्यांनी मांडले. यातूनच मेंदूचा आकार कमी होण्यास हातभार लागला असावा, असा निष्कर्ष मांडण्यात आला. स्टिबेल यांनी मानव सध्या स्वत:च्या बुद्धिमत्तेवर अवलंबून राहण्याऐवजी, सांस्कृतिक आणि तांत्रिक जाळ्यांवर अवलंबून राहत असल्याचे म्हटले आहे.

dharmesh.shinde@expressindia.com