Why Humans Fear Death Psychology: आपल्या ओळखीतलं कोणी गेल्यावर आपल्याही मनात स्वतःच्या मृत्यूचा विचार येतो. आपणही एक दिवस या जगात नसणार तेव्हा आपल्या आठवणी, नाती, स्वप्न आणि अस्तित्वाचं काय होईल? शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता संपते आणि हळूहळू शरीरातील प्रत्येक अवयव बंद होत जाऊन, मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू अटळ आहे, हे माहीत असूनही माणूस त्याचा सहजगत्या स्वीकार करू शकत नाही. आपण नवजात बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करतो, लग्नबंधनातून निर्माण होणाऱ्या नव्या नात्यांविषयी बोलतो, आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींची स्वप्न बघतो, ती जगतो; पण मृत्यूविषयी बोलणं अनेकदा टाळतो. माणसाला मृत्यूची भीती नेमकी कशामुळे वाटते? शरीराचा अंत होण्याची, प्रियजनांपासून दूर जाण्याची की स्वतःचं अस्तित्वच संपून जाण्याची? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. 

मृत्यूची भीती; शरीराच्या अंताची की अस्तित्वाची?

मृत्यूला कोणालाही चुकलेला नाही. आज न उद्या आपल्याला मृत्यूला सामोरं जायचं आहे. मात्र, आपण या परिस्थितीला कसं सामोरे जातो हे अधिक महत्त्वाचं आहे. असं काय आहे मृत्यूमध्ये की जे आपण त्याला एवढं घाबरून राहतो? 

मृत्यूची भीती या संज्ञेला ‘थॅनॅटोफोबिया’ हे नाव प्राचीन ग्रीक शब्द ‘थानाटोस’- जे मृत्यूच्या देवतेचं नाव आहे आणि फोबोस म्हणजे भीती. वैद्यकीय संदर्भात या संकल्पनेला ‘डेथ आँक्साइटी’ असंही संबोधलं जातं. ही भीती केवळ स्वतःचा मृत्यू होण्यापुरती मर्यादित नसते; तर मृत्यूनंतर आपलं अस्तित्व संपेल का, प्रियजनांपासून कायमचं दूर व्हावं लागेल का किंवा आयुष्यातील अपूर्ण राहिलेली स्वप्नं अपूर्णच राहतील का, अशा अनेक प्रश्नांमधून ती निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे मृत्यूची भीती प्रत्येकामध्ये कमी-अधिक प्रमाणात असू शकते; पण जेव्हा ही भीती तीव्र होऊन व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू लागतं, तेव्हा ती चिंतेची बाब ठरू शकते. 

‘थॅनॅटोफोबिया’ ही संज्ञा वापरता येते; मात्र ‘मेडिकल न्यूज टुडे’च्या लेखानुसार ती स्वतंत्र मानसिक विकार म्हणून ‘Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders’ मध्ये वर्गीकृत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मृत्यूची भीती वाटते म्हणून तिला ‘थॅनॅटोफोबिया’ आहे, असं गृहीत धरून चालणार नाही. 

अमेरिकन तत्त्ववेत्ता बेंजामिन फ्रँकलिन यांच्या मते, “या जगात मृत्यू आणि कर (taxes) या दोन गोष्टींशिवाय दुसरं काहीही निश्चित नाही.” त्यामुळे मृत्यूविषयीच्या विचारांनी आणि चिंतेने कधी कधी मनाचा ताबा घेतला, तर त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही. 

मृत्यूची जाणीव असूनही त्याची कल्पना मनाला अस्वस्थ का करते?

मृत्यू हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे याची जाणीव माणसाला असते. तरीही स्वतःच्या मृत्यूचा विचार करताना मन अस्वस्थ होतं. त्यामागे मानवी मेंदूची एक मूलभूत प्रवृत्ती कारणीभूत असते. मेंदूचं प्रमुख कार्य म्हणजे शरीराचं संरक्षण करणं आणि संभाव्य धोक्यांचा इशारा देणं. त्यामुळे जगण्याला धोका निर्माण करणाऱ्या परिस्थितींबाबत मेंदू सतर्क राहतो. मात्र मृत्यूची कल्पना ही जगण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीशी थेट संघर्ष करणारी आहे. आपण इतरांचा मृत्यू पाहू शकतो, ती घटना कालांतराने पचवूसुद्धा शकतो; पण स्वतःच्या अस्तित्वाचा अंत कसा पेलायचा, याची कल्पना करणंही आपल्याला जीवावर येतं. कारण- मृत्यूनंतर या भूतलावर आपलं असं काय उरेल याची काही खात्री नाही. कदाचित याच अनिश्चिततेमुळे मृत्यूची जाणीव असूनही त्याचा स्वीकार करणं मानवी मनाला अवघड जातं. 

मृत्यूच्या भीतीवर मात करण्यासाठी मनाचा संघर्ष

मृत्यूच्या भीतीचा मानवी विचार आणि वर्तनावर कसा परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी मानसशास्त्रात ‘टेरर मॅनेजमेंट थिअरी’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. १९८० च्या दशकात मानसशास्त्रज्ञ जेफ ग्रीनबर्ग, शेल्डन सोलोमन व टॉम पिस्झिन्स्की यांनी या सिद्धांताचा विकास केला. या सिद्धांतानुसार, माणसाला स्वतःच्या मृत्यूची जाणीव असते; पण त्याच वेळी जगण्याची तीव्र इच्छाही असते. या दोन परस्परविरोधी भावनांमधून निर्माण होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी माणूस आपल्या श्रद्धा, सांस्कृतिक मूल्यं, सामाजिक ओळख आणि जीवनातील ध्येयांचा आधार घेतो. उदाहरणार्थ – धर्मावरील श्रद्धा मृत्यूनंतरच्या अस्तित्वाची आशा देऊ शकते; तर कुटुंब, समाज आणि आपल्या कामातून निर्माण होणारी ओळख आपलं जीवन अर्थपूर्ण असल्याची भावना देऊ शकते. अशा प्रकारे मृत्यूची भीती पूर्णपणे नाहीशी होत नसली, तरी तिच्याशी सामना करण्यासाठी माणूस स्वतःभोवती मानसिक आधार व्यवस्था उभी करतो.

नाती धर्म आणि श्रद्धा; मृत्यूच्या भीतीला कसे आकार देतात?

मृत्यूच्या विचारानं मन अस्वस्थ झालं की, माणूस अनेकदा आपल्या जवळच्या माणसांचा आधार शोधतो. कुटुंब, मित्रपरिवार आणि जोडीदारासोबत असलेले भावनिक बंध आपल्याला सुरक्षिततेची आणि आपलेपणाची जाणीव करून देतात. आयुष्य क्षणभंगुर असलं तरी आपण कोणाच्या तरी आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहोत, ही भावना जगण्याला अर्थ देते. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात्मक आढाव्यात ७३ अभ्यासांचा विचार करण्यात आला. त्यातून जवळच्या नात्यांचा मृत्यूविषयक चिंतेशी सामना करण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतो, असं आढळलं.

धर्म आणि श्रद्धाही मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडवतात. मृत्यूनंतरचं जीवन, पुनर्जन्म, आत्म्याचं अस्तित्व किंवा मोक्ष यांसारख्या संकल्पना मृत्यूला केवळ शेवट न मानता, एका वेगळ्या प्रवासाचा भाग म्हणून पाहण्याची चौकट मिळवून देतात. धार्मिक विधी, अंत्यसंस्कारांच्या परंपरा आणि सामूहिक प्रार्थना यांमधून दुःख व्यक्त करण्यासाठी आणि त्यातून सावरण्यासाठी सामाजिक आधार मिळतो. मात्र, मृत्यूची भीती जितकी जास्त तितकी धार्मिक श्रद्धा अधिक, असं सरसकट म्हणता येत नाही. धर्म आणि मृत्यूची भीती यांच्यातील संबंध गुंतागुंतीचा असून उपलब्ध संशोधनात त्याचा थेट आणि ठोस संबंध नेहमीच दिसून येत नाही. 

मृत्यूची भीती कधी गंभीर वळण घेते?

मृत्यूची भीती असणं ही काही असामान्य गोष्ट नाही. मात्र, जेव्हा ही भीती वारंवार मन अस्वस्थ करते, तेव्हा तिचा परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर होऊ शकतो. उदाहरणार्थ- स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूविषयी विचार करणं, आजारपणाची भीती असणं, मृत्यूशी संबंधित बातम्या किंवा प्रसंग टाळणं, झोप न लागणं किंवा सतत अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं काही व्यक्तींमध्ये दिसू शकतात. अशा वेळी मृत्यूविषयक चिंता ही केवळ एखादी क्षणिक भावना न राहता, मानसिक त्रासाचा भाग बनू शकते.  

२०२४ मध्ये Clinical Psychology Review मध्ये प्रसिद्ध झालेल्या मेटा-विश्लेषणात १०४ संशोधन लेखांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून मृत्यूविषयक चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये संबंध असल्याचं आढळलं. मात्र, मृत्यूची भीतीच मानसिक आजारांना कारणीभूत ठरते, असं ठामपणे यावरून म्हणता येणार नाही. ही भीती दैनंदिन जीवन, झोप किंवा नातेसंबंधांवर परिणाम करू लागल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घेणं महत्त्वाचं ठरतं. 

वय वाढतं तसं मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो का?

प्रत्येक व्यक्तीचा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो. लहान असताना मृत्यूची संकल्पना अनेकदा अस्पष्ट असते. वाढत्या वयात या संकल्पनेची स्पष्टता आणि त्याचं गांभीर्य अधिक जाणवतं. तरुण वयात शिक्षण, करिअर, नाती आणि भविष्यातील स्वप्नांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे मृत्यूचा विचार अनेकदा दूरची गोष्ट वाटू शकतो. याउलट, वय वाढताना जवळच्या व्यक्तींचं निधन, स्वतःच्या आरोग्यात होणारे बदल आणि आयुष्याच्या मर्यादांची जाणीव यांमुळे मृत्यूविषयीचे विचार अधिक जवळचे वाटू शकतात.

मात्र, वय वाढलं की, मृत्यूची भीती आपोआप वाढते किंवा कमी होते, असं ठामपणे सांगता येत नाही. काही ज्येष्ठ व्यक्ती मृत्यूकडे आयुष्याच्या नैसर्गिक टप्प्याप्रमाणे पाहतात, तर काहींना आजारपण, एकटेपणा किंवा प्रियजनांपासून दूर जाण्याची भीती अधिक असू शकते. व्यक्तीचे अनुभव, आरोग्य, सामाजिक आधार, जीवनातील समाधान व श्रद्धा या सगळ्यांचा तिच्या दृष्टिकोनावर परिणाम होतो. त्यामुळे मृत्यूची भीती ही केवळ वयाशी जोडलेली नसून व्यक्तीच्या संपूर्ण जीवनानुभवाशी संबंधित असते.

मृत्यूचा स्वीकार करता येतो का?

आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असणं आणि त्याचा स्वीकार करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मृत्यूचा स्वीकार म्हणजे भीती पूर्णपणे नाहीशी होणं नव्हे, तर आयुष्य मर्यादित आहे याची जाणीव ठेवून आपला ‘आज’ मनसोक्त जगणं महत्त्वाचं आहे. मृत्यूविषयी मोकळेपणानं बोलल्यानं त्याबद्दलचा संकोच आणि भीती कमी होण्यास मदत होऊ शकते. यापलीकडे मृत्यूकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा त्याकडे सकारात्मकतेनं पाहणं उत्तम! 

माणसाला मृत्यूची भीती वाटते कारण- त्याला जगायचं असतं. त्यामुळे मृत्यू कधी येईल, यापेक्षा तो येण्यापूर्वी आपण आपलं आयुष्य कसं जगत आहोत, हा प्रश्न लक्षात घेणं अधिक महत्त्वाचा ठरतो.