यंदा भारतात मान्सून वेळेवर दाखल होईल, असा अंदाज अनेक खासगी हवामान संस्थाकडून व्यक्त केला जात आहे. सध्या तमिळनाडू आणि केरळमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची नोंद होत असून दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षीचा मान्सून दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे, तर स्कायमेट या खासगी संस्थेने हा आकडा सुमारे ९४ टक्के असेल, असे स्पष्ट केले आहे. या दोन्ही संस्थांनी उदयास येत असलेल्या एल निनोच्या प्रभावाकडेही लक्ष वेधले आहे. साधारणपणे दरवर्षी सरकारी आणि खाजगी अशा दोन संस्थांकडून मान्सूनचा अंदाज वर्तवला जातो. अनेकदा त्यांच्या अंदाजांमध्ये तफावत दिसून येते. जरी ही तफावत केवळ काही टक्क्यांची असली, तरी तिचे परिणाम मोठे असतात. पावसाच्या प्रमाणात होणारा अल्प बदलही कृषि क्षेत्रातील संबंधित अनेक घटकांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे एकाच मान्सूनसाठी वर्तवले जाणारे हे अंदाज पूर्णपणे एकसारखे का नसतात आणि त्यातील फरकाचे महत्त्व काय असते? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, त्याविषयीचा हा आढावा…

हवामान अंदाज वेगवेगळे का असतात?

मान्सून अंदाजांमध्ये फरक पडण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे हे अंदाज तयार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. विविध संस्था समान हवामान संकेतांचा आधार घेत असल्या, तरी त्यांचे विश्लेषण करण्याची पद्धत वेगळी असते. खासगी हवामान अंदाज तज्ज्ञ ऋषीकेश आंग्रे यांच्या मते, हा फरक मुख्यतः मॉडेल्स, डेटा इनपुट्स आणि उद्दिष्टांमुळे निर्माण होतो. भारतीय हवामान विभागाकडून त्यासाठी डायनॅमिकल आणि सांख्यिकीय अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो. याउलट खाजगी संस्था प्रामुख्याने जागतिक किंवा त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या प्रगत यंत्रणांवर अवलंबून असतात. मात्र, यामागील मोठा मुद्दा म्हणजे- ज्या गोष्टीचा अंदाज वर्तवला जातो, तिचे स्वरूपच अत्यंत गुंतागुंतीचे असते. मोसमी अंदाज हे आधीच अस्तित्वात असलेल्या हवामान प्रणालीचा मागोवा घेत नाहीत. तर महासागर आणि वातावरण यांच्यातील परस्परसंलग्न प्रणाली पुढील काही महिन्यांत कशी विकसित होईल, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात. अशा दीर्घकालीन अंदाजांमध्ये काही मर्यादा असतात. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि स्कायमेट या दोन्ही संस्था भारतातील मान्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रमुख संस्था आहेत. आयएमडी ही भारत सरकारची अधिकृत संस्था असून ती राष्ट्रीय नियोजनासाठी मान्सूनचे अंदाज वर्तवते, तर स्कायमेट ही एक खाजगी संस्था असून ती प्रगत किंवा स्वतःच्या मालकीच्या यंत्रणांद्वारे हवामानाचे अंदाज देते.

मान्सूनवर परिणाम करणारे घटक कोणते?

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजी’च्या २०१९ मधील एका अभ्यासानुसार, चार ते पाच महिन्यांच्या दीर्घ कालावधीसाठी अंदाज वर्तवताना त्यांची अचूकता कमी होते. यामागे मान्सून प्रणालीतील अंतर्गत अस्थिरता आणि त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या बदलत्या स्वरूपाचा मोठा प्रभाव असतो. मान्सूनचे स्वरूप केवळ एका घटकावर अवलंबून नसते, तर ते एल निनो, इंडियन ओशन डायपोल, मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन, युरेशियातील बर्फाचे आच्छादन आणि जमिनीचे तापमान यावर आधारित असतात. विशेष म्हणजे, हे घटक वेळोवेळी बदलत राहतात. यूकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग येथील वरिष्ठ संशोधक अक्षय देओरस यांच्या मते, एल निनो हा मान्सूनवर परिणाम करणाऱ्या सर्वात प्रभावी घटकांपैकी एक आहे. मात्र, एप्रिल महिन्यात त्याची स्थिती अचूकपणे ओळखणे सोपे नसते. अनेकदा मॉडेलमध्ये हवामान सामान्य दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते एल निनोकडे झुकत असते. अशा सूक्ष्म बदलांमुळे पावसाच्या अंतिम आकड्यांमध्ये मोठी तफावत निर्माण होऊ शकते.

मान्सूनबाबतचा कोणाचा अंदाज किती अचूक?

अलीकडच्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास आयएमडी आणि स्कायमेट यापैकी कोणाचा अंदाज अधिक अचूक ठरतो, याबाबत स्पष्ट निष्कर्ष दिसून येत नाही. काही वर्षांत आयएमडीचा अंदाज वास्तवाच्या अधिक जवळ असतो, तर काहीवेळा स्कायमेटचा अंदाज अधिक अचूक ठरताना दिसून येतो. उदाहरणार्थ, २०१८ मध्ये सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडला. त्यावेळी आयएमडीने ९७ टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता, तर स्कायमेटने ९२ टक्के पाऊस होणार असल्याचे सांगितले होते. २०१९ मध्ये या दोन्ही संस्थांचे अंदाज चुकल्याचे दिसून आले. त्यावर्षी आयएमडीने ९६ टक्के आणि स्कायमेटने ९३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु प्रत्यक्षात मात्र देशभरात ११० टक्के पाऊस झाला. जेव्हा मान्सून सरासरीपेक्षा अधिक सक्रिय असतो, तेव्हा दोन्ही संस्थांचे अंदाज काहीसे कमी पडताना दिसून येतात. २०२४ मध्ये आयएमडीने १०६ टक्के आणि स्कायमेटने १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, पण प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस झाला. त्याचप्रमाणे २०२५ मध्येही आयएमडी आणि स्कायमेटने अनुक्रमे १०५ आणि १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, प्रत्यक्षात मात्र देशभरात १०८ टक्के पाऊस झाला. ही विसंगती हेच दर्शवते की, मान्सूनच्या लहरीपणाचा अचूक अंदाज घेण्याला काही मर्यादा आहेत. मान्सूनचे वर्तन सातत्याने बदलत असल्याने कोणताही अंदाज १०० टक्के अचूक ठरवणे कठीण असते.

आकडेवारीत कशी दिसून येतेय तफावत?

हवामान अंदाज आणि प्रत्यक्ष वास्तवातील दरी आता अधिक स्पष्टपणे दिसू लागली आहे. विविध अभ्यासांनुसार, उन्हाळी मान्सूनमधील अस्थिरता वाढत आहे. अतिवृष्टीच्या घटना, दीर्घकाळ कोरडे वातावरण आणि प्रादेशिक पातळीवरील तीव्र तफावत अधिक वारंवार दिसून येत आहे. उदाहरणार्थ, २०२५ मध्ये उत्तर प्रदेशात एकूण मान्सून जवळपास सामान्य राहिला आणि सरासरीपेक्षा सुमारे सहा टक्के कमी पाऊस झाला. मात्र, राज्यातील विभागनिहाय परिस्थिती खूप वेगळी होती. पश्चिम उत्तर प्रदेशात १२ टक्के जास्त पाऊस झाला, तर पूर्व उत्तर प्रदेशात १७ टक्के तूट नोंदवली गेली. राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. ही तफावत केवळ प्रदेशांमध्येच नव्हे, तर संपूर्ण हंगामातही दिसून आली. २०२४ मध्ये सौराष्ट्र आणि कच्छ भागात मान्सूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला, मात्र जून महिन्यात नंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे महिन्याच्या अखेरीस पावसाच्या तुटीची स्थिती निर्माण झाली. मात्र, हंगामाच्या पुढील काळात पुन्हा जोरदार पावसामुळे हा प्रदेश अतिरिक्त पावसाच्या श्रेणीत गेला.

मान्सून अंदाज कसा समजून घ्यावा?

मान्सूनचे वेगवेगळे आकडे पाहून सामान्य नागरिक गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. अशा वेळी नेमका कोणता अंदाज पाळावा आणि त्यातून काय अर्थ काढावा, याबाबत तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. यूकेमधील University of Reading च्या हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ संशोधक अक्षय देओरस यांच्या मते, संपूर्ण देशाच्या पावसाचा एकत्रित आकडा हा राष्ट्रीय स्तरावरील नियोजनासाठी उपयुक्त आहे. मात्र, वैयक्तिक किंवा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी राज्यनिहाय अंदाज अधिक प्रभावी ठरतात. सध्या डायनॅमिक मॉडेल्समुळे त्यांची अचूकता आता सुधारत आहे. सर्वसामान्यांसाठी हंगामातील पावसाचा एकूण आकडा किती आहे, यापेक्षा तो कसा आणि कुठे पडणार हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे साप्ताहिक हवामानाचा कल, प्रादेशिक अंदाज आणि अधिकृत हवामान इशारे यावरून त्याचा अंदाज काढणे सोपे ठरते. शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे भविष्यवाणी म्हणून न पाहता केवळ संकेत म्हणूनच पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.