Why Rainfall will Below Normal in India This Season : ४ जून रोजी केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) अधिकृत आगमन झाले. त्यानंतर ८ जूनला दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, पावसाला सुरुवात होण्याआधीच भारतीय हवामान खात्याने आपल्या अंदाजात पुन्हा बदल केला. त्यानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के इतका हंगामी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष बाब म्हणजे, यावर्षीच्या सुरुवातीला हवामान विभागाने देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. यादरम्यान नव्या अंदाजात दोन टक्के कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. त्याविषयी…

भारतीय हवामान विभागाने काय सांगितले?

देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के इतका हंगामी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी आम्ही हा अंदाज ९२ टक्के वर्तवला होता; परंतु आता तो ९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे देशात एकूणच सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या या घोषणेनंतर दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पाऊस म्हणजे नेमके काय? प्रत्येक राज्यात नेहमीपेक्षा १० टक्के कमी पाऊस पडणार का? सामान्यपेक्षा कमी मान्सून म्हणजे दुष्काळाची स्थिती निर्माण होणार का? असे विविध प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत. तज्ज्ञांच्या मते, या सर्व प्रश्नांचे उत्तर थोडक्यात नाही असे आहे.

पावसाचा अंदाज कसा समजून घ्यावा?

भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी त्याचा अर्थ प्रत्येक भागात १० टक्के कमी पाऊस पडेल असा होत नाही. देशभरातील सरासरी पावसाचा अंदाज हा राष्ट्रीय स्तरावरील एकत्रित आकडा असतो. त्यामुळे काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी कमी पाऊस होण्याची शक्यता असते. याबाबत स्वतंत्र हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले की, बहुतेक शेतकऱ्यांना आपल्या परिसरात नेहमीप्रमाणेच पाऊस पडेल अशी अपेक्षा असते. मात्र स्थानिक हवामानातील बदल आणि प्रादेशिक घटकांचा विचार करणे गरजेचे आहे. हे घटक अंदाजापेक्षा पावसाचे प्रमाण कमी किंवा अधिक करू शकतात.

हवामान खात्याचा नेमका इशारा काय?

ते पुढे म्हणाले की, भारत हा विविध सूक्ष्म हवामान वैशिष्ट्यांनी समृद्ध असा विशाल देश आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात मोठे स्थानिक फरक दिसून येणे स्वाभाविक आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालातही यंदाच्या मान्सूनबाबतचा अंदाज स्पष्टपणे दिसून येतो. ईशान्य भारतात सामान्य पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मध्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय खरीप पिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मान्सून कोअर झोनमध्येही पर्जन्यमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या दृष्टीने यंदाचा मान्सून विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

‘तुटीचा पाऊस’ म्हणजे नेमके काय?

हवामान खात्याने पावसाचे वर्गीकरण करण्यासाठी ठरवलेल्या श्रेणी समजून घेणे थोडे गुंतागुंतीचे ठरते. आयएमडीच्या निकषांनुसार, दीर्षकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के दरम्यान होणारा पाऊस ‘सामान्य’ मानला जातो, तर ९० ते ९५ टक्के दरम्यानचा पाऊस ‘सामान्यपेक्षा कमी’ या श्रेणीत येतो. त्याशिवाय ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास तो ‘तुटीचा’ मानला जातो. यंदाचा ९० टक्क्यांचा अंदाज हा नेमका ‘सरासरीपेक्षा कमी’ आणि ‘अपुरा पाऊस’ या दोन्ही श्रेणींच्या सीमारेषेवर आहे. यंदाचा नैर्ऋत्य मान्सून ‘तुटीचा’ ठरण्याची ६० टक्के शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. म्हणजेच पावसाचा मुख्य अंदाज जरी सरासरीच्या ९० टक्के असला, तरी यंदाचा हंगामी पाऊस ९० टक्क्यांच्या उंबरठ्याखाली घसरून तुटीच्या श्रेणीत जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी स्पष्ट केले की, सामान्यपेक्षा कमी पाऊस म्हणजे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असेल, मात्र त्याचा फार मोठा परिणाम होईलच असे नाही. यापूर्वीही भारताने कमी पावसाचे मान्सून अनुभवले असून त्यातून थेट देशव्यापी दुष्काळ निर्माण झालेला नाही.

हवामान तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला?

मान्सूनचा प्रत्यक्ष परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामध्ये पावसाची तूट नेमक्या कोणत्या भागात आहे, संपूर्ण हंगामात पाऊस कसा आणि किती पडतो, धरणांमधील पाणीसाठा आणि स्थानिक पातळीवरील पाण्याची उपलब्धता यासारख्या अनेक घटकांचा समावेश होतो. राष्ट्रीय स्तरावर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असले तरी अनेक प्रदेशांमध्ये पुरेसा पाऊस पडू शकतो. याउलट, जर पाऊस काही मोजक्याच आणि अतिवृष्टीच्या स्वरूपात झाला, तर त्यामुळे वेगळ्याच प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. याच कारणामुळे हवामान तज्ज्ञ केवळ एकाच हंगामी अंदाजाला जास्त महत्त्व न देण्याचा सल्ला देतात. नैऋत्य मोसमी पाऊस हा चार महिन्यांचा असतो आणि या प्रदीर्घ कालावधीत हवामानाच्या परिस्थितीत मोठे बदल होऊ शकतात. मान्सूनचा हंगाम जसा पुढे सरकतो, तसे समुद्राचे तापमान, वातावरणीय चक्र आणि प्रादेशिक हवामान यंत्रणा सातत्याने बदलत असतात.

पावसाचा मासिक व साप्ताहिक अंदाज महत्त्वाचा

दरम्यान, हवामान विभागाने येत्या दोन ते तीन दिवसात मोसमी पावसाचे वारे आणखी पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात पुढील काळात पावसाचा जोर कमी होण्याची, तापमान वाढण्याची आणि मोसमी पावसाच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी हा निर्णायक काळ आहे आणि अशावेळी मोसमी पावसाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पेरणी झाली आणि मग त्यानंतर पाऊस थांबला आणि तापमानात वाढ झाली, तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो, असेही हवामान संशोधकांचे म्हणणे आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले की, आयएमडीचे हंगामी अंदाज, मासिक आढावा आणि पावसाच्या मोठ्या घडामोडींबाबत सातत्याने अपडेट राहिल्यास हवामानाचा नेमका अंदाज येण्यास मदत होते. साप्ताहिक पावसाच्या अहवालावरून मान्सून ‘सक्रिय टप्प्यात’ प्रवेश करत आहे की नाही हे स्पष्ट होते. सक्रिय टप्प्यात पाऊस सर्वदूर कोसळतो; तर मान्सूनच्या विश्रांतीच्या टप्प्यात तो तात्पुरता कमकुवत होतो. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे अल्पमुदतीचे अंदाज अनेकदा संपूर्ण हंगामाच्या अंदाजापेक्षा जास्त उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरतात, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.