Hindu Buddhist ministers in Bangladesh government बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने (बीएनपी) बहुमत मिळवले आहे. दीड वर्षाच्या हंगामी सरकारनंतर बांगलादेशमध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे. १७ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियाई देशात हा मोठा राजकीय बदल मानला जात आहे. ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’चे नेते तारिक रहमान यांनी मंगळवारी (१७ फेब्रुवारी) बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर बांगलादेश नॅशनल पार्टीच्या ४० हून अधिक मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात एका हिंदू आणि एका बौद्ध नेत्याचाही समावेश करण्यात आला आहे. हा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. हिंदू आणि बौद्ध नेत्यांचा समावेश महत्त्वाचा का मानला जात आहे? समजून घेऊयात…

तारिक रहमान बांगलादेशच्या पंतप्रधानपदी

‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’चे नेते तारिक रहमान यांनी मंगळवारी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. रहमान हे बांगलादेशचे दिवंगत अध्यक्ष झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र आहेत. लंडनमध्ये १७ वर्षे विजनवासात राहिल्यानंतर डिसेंबर महिन्यात ते बांगलादेशात परत आले. बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून रहमान यांचा पहिलाच कार्यकाळ आहे. अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी रहमान यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तसेच अध्यक्ष शहाबुद्दीन यांनी २५ मंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांनाही शपथ दिली. त्यामध्ये हिंदू धर्मीय ‘बीएनपी’चे उपाध्यक्ष निताई रॉय चौधरी, तर बौद्ध धर्मीय दीपेन देवान यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला भारत-पाकिस्तानसह विविध शेजारी देशांतील नेते उपस्थित होते.

बांगलादेश सरकारमध्ये दोन अल्पसंख्याक मंत्री

रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये निताई रॉय चौधरी यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बीएनपीमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायाचा ते एक प्रमुख चेहरा आहेत. त्यांचा जन्म मागुरा जिल्ह्यातील मोहम्मदपूर येथील हातबारिया गावात ७ जानेवारी १९४९ रोजी झाला. चौधरी हे एक अनुभवी राजकारणी व वकील आहेत. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बांगलादेश निवडणुकीत त्यांनी मागुरा-२ मतदारसंघातून जमात-ए-इस्लामीचे उमेदवार मुस्तरशिद बिल्ला यांचा पराभव करून विजय मिळवला.

निवडणुकीत विजयी झालेल्या अल्पसंख्याक समुदायातील केवळ चार उमेदवारांपैकी चौधरी एक होते. हे सर्व विजयी उमेदवार बीएनपीचेच होते. चौधरी हे पक्षाचे महत्त्वाचे उपाध्यक्ष असून, ते बीएनपीच्या सर्वोच्च नेतृत्वाचे ज्येष्ठ सल्लागार व रणनीतीकारदेखील आहेत. यापूर्वी त्यांनी एच. एम. ईर्शाद सरकारमध्ये युवा व क्रीडामंत्री (१९९०) म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच त्यांनी शिक्षण आणि कायदा विभागात राज्यमंत्रिपदही भूषवले आहे.

दीपेन देवान हे बौद्ध बहुसंख्य असलेल्या ‘चाकमा’ वांशिक अल्पसंख्याक गटातील आहेत. त्यांनी चितगाव हिल ट्रॅक्ट्स व्यवहारमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी रांगामाटी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार पोहेल चाकमा यांचा पराभव केला. देवान हे पहिल्यांदाच खासदार व मंत्री झाले आहेत.

मंत्रिमंडळातील त्यांचा समावेश महत्त्वाचा का?

बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान बांगलादेशात निर्णायक बहुमताने सत्तेवर आले आहेत. त्यांच्या पक्षाने एकूण २९९ संसदीय जागांपैकी २०९ जागा जिंकल्या आहेत; तर त्यांच्या मित्रपक्षांनी तीन जागा मिळवल्या आहेत. बीएनपीने २० वर्षांनंतर बांगलादेशात सरकार स्थापन केले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यापासून हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रहमान यांनी आपल्या मंत्रिमंडळात दोन अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल’च्या मते, हसीना सरकार पाडल्यापासून जातीय हिंसाचाराच्या दोम हजारहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये जवळ जवळ ६१ हत्या, महिलांवरील हिंसाचाराच्या २८ घटना (जसे की बलात्कार आणि सामूहिक बलात्कार), प्रार्थनास्थळांची तोडफोड, लूटमार व जाळपोळीच्या ९५ घटनांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, दोन अल्पसंख्याक समुदायांतील नेत्यांची नियुक्ती करून बीएनपीने सर्वसमावेशकतेचा संदेश दिला आहे.

अल्पसंख्याक गटांचा असा आरोप आहे की, राजकीय अस्थिरता आणि कमकुवत कायदा व सुव्यवस्थेमुळे हल्लेखोरांचे बळ वाढते. अल्पसंख्याकांना सरकारमध्ये स्थान देऊन, रहमान यांनी देश-विदेशात एक प्रकारचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ‘मनीकंट्रोल’च्या वृत्तात म्हटले आहे. ब्रिटनमधून सुमारे १८ वर्षांनंतर डिसेंबरच्या अखेरीस बांगलादेशात परतलेले बीएनपी नेते रहमान म्हणाले आहेत की, धार्मिक आणि प्रादेशिक भेद बाजूला सारून बांगलादेश हे सर्व समुदायांसाठी एक सुरक्षित घर असावे.

ढाकाच्या पूर्वचल भागात एका जाहीर सभेत बंगाली भाषेत भाषण करताना रहमान म्हणाले होते, “त्याशिवाय आपल्याकडे इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन व हिंदू धर्मीय लोक आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला एक सुरक्षित बांगलादेश घडवायचा आहे.” गेल्या आठवड्यात आपल्या विजयोत्सवाच्या भाषणात त्यांनी नमूद केले, “हा विजय बांगलादेशचा आहे, लोकशाहीचा आहे. हा विजय लोकशाहीची आकांक्षा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी बलिदान देणाऱ्या लोकांचा आहे.”