India Pakistan Independence Day August 14 August 15: भारत दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो; तर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्टला असतो. ब्रिटिश भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७ (Indian Independence Act, 1947) अंतर्गत या दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाले होते. या ॲक्टमध्ये ‘appointed day’ म्हणजे सत्तांतराचा अधिकृत दिवस १५ ऑगस्ट १९४७ असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरी भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आणि पाकिस्तानचा १४ ऑगस्ट का? शिवाय स्वातंत्र्यदिनासाठी १५ ऑगस्ट ही तारीखच का निवडण्यात आली? हेच जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
१५ ऑगस्ट ही तारीख कशी ठरली?
१९४७ साली मार्च महिन्यात लॉर्ड लुई माउंटबॅटन यांची भारताचे शेवटचे व्हाइसरॉय म्हणून निवड झाली. ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या सरकारने भारतातील सत्ता भारतीयांच्या हाती सोपवण्यासाठी सुरुवातीला जून १९४८ पर्यंतची मुदत ठेवली होती. परंतु भारतात आल्यानंतर माउंटबॅटन यांच्या लक्षात आले की, परिस्थिती अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने बिघडत आहे. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील मतभेदांमुळे अंतरिम सरकार प्रभावीपणे काम करू शकत नव्हते. पाकिस्तानची मागणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली होती तसेच अनेक भागांत सांप्रदायिक हिंसाचार उसळत होता. त्यामुळे माउंटबॅटन यांनी सत्ता हस्तांतरण जवळजवळ दहा महिने आधी म्हणजे १९४७ सालीच ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लापिएर यांनी माउंटबॅटन यांच्याशी केलेल्या दीर्घ मुलाखतींवर आधारित ‘Mountbatten and the Partition of India: March 22-August 15, 1947’ या पुस्तकात माउंटबॅटन सांगतात की, जून १९४८ पर्यंत वाट पाहिली असती तर तत्कालीन राजकीय व्यवस्था पूर्णपणे कोसळण्याचा धोका होता. म्हणून स्पष्ट आणि जवळची तारीख जाहीर करणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटले.
१५ ऑगस्ट वैयक्तिक आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाची
माउंटबॅटन यांनी स्वतः सांगितले होते की, ही तारीख त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाची होती. १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या सम्राटाने मित्रराष्ट्रांच्या शरणागतीच्या अटी स्वीकारल्याची घोषणा झाली. त्याचाच परिणाम म्हणून आशियातील दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला निर्णायक वळण मिळाले. माउंटबॅटन दुसऱ्या महायुद्धात Supreme Allied Commander (साऊथ ईस्ट एशिया कमांड) होते. त्यामुळे १५ ऑगस्ट ही तारीख त्यांच्या लष्करी कारकिर्दीशीही संबंधित होती. त्यांनी नंतर सांगितले की, “मला एक तारीख सांगावीच लागणार होती. मी १५ ऑगस्ट निवडली…जपानच्या शरणागतीच्या वर्धापनदिनामुळे ती माझ्यासाठी महत्त्वाची तारीख होती.”
येथे एक महत्त्वाची ऐतिहासिक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. जपानने मित्रराष्ट्रांच्या शरणागतीच्या अटी स्वीकारल्याची घोषणा १५ ऑगस्ट १९४५ रोजी झाली असली तरी जपानने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी २ सप्टेंबर १९४५ रोजी केली; तर दक्षिण-पूर्व आशियातील जपानी सैन्याची सिंगापूरमधील औपचारिक शरणागती १२ सप्टेंबर १९४५ रोजी झाली.

सगळ्या घडामोडी विलक्षण वेगाने झाल्या. ब्रिटिश संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये ‘Indian Independence Bill’ ४ जुलै १९४७ रोजी मांडण्यात आले. अवघ्या दोन आठवड्यांत त्याला संसदेची मंजुरी मिळाली. इंडियन इंडिपेन्डन्स ॲक्टचे १८ जुलै १९४७ रोजी कायद्यात परिवर्तन झाले. या कायद्याच्या पहिल्याच कलमात १५ ऑगस्ट १९४७ पासून भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) ही दोन स्वतंत्र ‘Dominions’ (स्वायत्त अधिराज्ये किंवा ब्रिटिश राष्ट्रकुलातील स्वशासित राज्ये) अस्तित्वात येतील, असे नमूद करण्यात आले. म्हणजे कायदेशीर दृष्ट्या दोन्ही ‘Dominions’ साठी निर्णायक तारीख १५ ऑगस्ट १९४७ हीच होती.
माउंटबॅटन यांनी इतकी घाई का केली?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या संविधानसभेत बोलताना माउंटबॅटन यांनी सांगितले की, ब्रिटिश सरकारने सुरुवातीला जून १९४८ची अंतिम मुदत दिली होती; परंतु, भारतात आल्यावर सांप्रदायिक तणाव आणि हिंसाचाराचे प्रमाण पाहून इतका काळ थांबणे धोकादायक ठरेल, असा निष्कर्ष त्यांनी काढल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा युक्तिवाद असा होता की, एकदा फाळणीचे तत्त्व स्वीकारले गेल्यानंतर प्रत्यक्ष फाळणी आणि सत्तांतर शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे सर्व पक्षांच्या हिताचे होते.

मात्र नंतरच्या इतिहासलेखनात या निर्णयावर मोठी टीकाही झाली. यास्मिन खान, इयान टॅलबट, स्टॅन्ली वोल्पर्ट यांच्यासह अनेक इतिहासकारांनी सत्तांतर आणि फाळणीच्या अतिशय संकुचित कालावधीमुळे प्रशासन, पोलीस, लष्कर, निर्वासितांचे व्यवस्थापन आणि सीमा आखणीसाठी आवश्यक तयारी अपुरी राहिल्याचे दाखवून दिले आहे. परंतु येथे एक सूक्ष्म मुद्दा महत्त्वाचा आहे, “ब्रिटिशांनी काही महिने अधिक घेतले असते तर फाळणीतील रक्तपात निश्चितपणे टळला असता” असे ठामपणे सिद्ध करता येत नाही. हिंसाचाराची कारणे अनेक आणि खोल होती. मात्र अधिक नियोजनासाठी उपलब्ध वेळ फारच कमी होता, यावर इतिहासकारांमध्ये मोठ्या प्रमाणात सहमती आढळते.
मग पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्टला का?
कायद्यानुसार पाकिस्तानही १५ ऑगस्ट १९४७ रोजीच अस्तित्वात आलेल्या दोन ‘Dominions’ पैकी एक होता. याला भारतीय स्वातंत्र्य कायद्याचा स्पष्ट आधार आहे. पाकिस्तानमधील सत्तांतराचा औपचारिक समारंभ मात्र १४ ऑगस्ट १९४७ रोजी कराची येथे पार पडला. माउंटबॅटन त्यासाठी कराचीत उपस्थित होते. त्यानंतर त्यांना दिल्लीला परतायचे होते, कारण १५ ऑगस्टपासून ते स्वतंत्र भारताचे पहिले Governor-General होणार होते. त्यामुळे कराचीतील समारंभ १४ ऑगस्टला घेण्यात आला. मात्र, माउंटबॅटन एकाच दिवशी कराची आणि दिल्लीला जाऊ शकत नव्हते; म्हणूनच पाकिस्तानने १४ ऑगस्ट हाच कायमचा स्वातंत्र्यदिन मानला, एवढेच स्पष्टीकरण खरे मानणे योग्य नाही. पाकिस्तानच्या सुरुवातीच्या दस्तऐवजांमध्येही १५ ऑगस्टला महत्त्व देण्यात आलेले दिसते. मोहम्मद अली जिना यांनी स्वातंत्र्याच्या वेळी प्रसारित केलेल्या संदेशातही १५ ऑगस्टचा उल्लेख पाकिस्तानच्या स्वतंत्र, सार्वभौम राज्याच्या जन्मदिनाच्या संदर्भात केला होता, असे ऐतिहासिक नोंदी दर्शवतात. नंतर मात्र पाकिस्तानने १४ ऑगस्ट हा अधिकृत राष्ट्रीय स्वातंत्र्यदिन म्हणून रूढ केला आणि १९४८पासून १४ ऑगस्टच्या उत्सवाची परंपरा दृढ झाली.

२७ रमजानचा संबंध होता का?
पाकिस्तानमध्ये आणखी एक लोकप्रिय स्पष्टीकरण सांगितले जाते. स्वातंत्र्याचा काळ इस्लामी कालगणनेनुसार रमजानच्या २७व्या रात्रीच्या आसपास आला होता आणि त्यामुळे १४ ऑगस्टला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. या दाव्यात सांस्कृतिक संदर्भ असला तरी तो पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख ठरवण्याचे निर्विवाद अधिकृत किंवा कायदेशीर कारण असल्याचा ठोस पुरावा नाही. म्हणून रमजान असल्यामुळेच १४ ऑगस्ट निवडला असे निश्चितपणे म्हणणे टाळलेले बरे.
