प्रतिभावान खेळाडू, भक्कम देशांतर्गत स्पर्धा, ‘आयपीएल’सारखी जगातील सर्वांत श्रीमंत ट्वेन्टी-२० लीग आणि अत्याधुनिक प्रशिक्षण व्यवस्था हे सर्व असतानाही जगज्जेत्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागत आहे. पराभव खेळाचा भाग असला तरी, वारंवार त्याच चुका होत असल्याने संघ व्यवस्थापनाचे निर्णय आणि त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. भारतीय संघाची पीछेहाट सुरू असून त्याला जबाबदार कोण आणि आगामी काळात यामध्ये सुधारण्यासाठी काय करावे लागेल याचा आढावा.

विस्कळीत फलंदाजी फळी

निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात मोठे बदल केले. सर्वप्रथम जगज्जेत्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला डच्चू देण्यात आला. त्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली. संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले. यामध्ये गेल्या ‘आयपीएल’ हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली. मात्र, भारतीय संघाने डावखुऱ्या फलंदाजांना अति-महत्त्व दिले आहे. सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन हे सर्व डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना रणनीती आखणे सोपे जाते. विश्वचषकात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या संजू सॅमसनला काही सामन्यांनंतरच संघाबाहेर करण्यात आले. हा निर्णयही वादग्रस्त ठरला. मध्यक्रमातही सातत्याचा अभाव दिसत आहे.

परदेशात तांत्रिक उणिवा उघड

गेल्या वर्षापासून भारतीय संघाचे बहुतेक सामने मायदेशातच झाले. संघाने झालेली २०२६ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाही आपल्याच देशात खेळवली गेली. तसेच खेळाडूंनी अलीकडेच ‘आयपीएल’मध्ये सहभाग घेतला, जी भारतातच खेळवली जाते. उपखंडातील खेळपट्ट्यांवर चेंडूला स्विंग आणि हालचाल (मूव्हमेंट) सहसा कमी असते. खेळाडूंना अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजी करण्याची सवय झाली आहे. मात्र, आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यांवर चेंडूचा स्विंग आणि हालचाल यामुळे भारतीय फलंदाजांची चांगलीच कोंडी झाली. इंग्लंडमधील खेळपट्ट्या अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असतात. अनेक भारतीय फलंदाजांना तिथल्या परिस्थितीशी वेगाने जुळवून घेण्यात अडचणी आल्या, परिणामी संघाला अपेक्षित अशी कडवी झुंज देण्यात त्यांना अपयश आले. त्यातच इंग्लंडमधील खेळपट्ट्या बहुतेकदा वेगवान गोलंदाजांना पूरक आणि उसळी घेणाऱ्या असतात. त्यामुळे वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंचा अंदाज घेण्यात भारतीय फलंदाज यशस्वी ठरले नाहीत. ‘आयपीएल’ने भारतीय क्रिकेटला जागतिक दर्जाचे खेळाडू दिले आहेत. मात्र, ‘आयपीएल’मधील यश आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यश यामध्ये फरक आहे.

गोलंदाजांचेही अपयश

भारतीय गोलंदाजी विभागाकडूनही अपेक्षित कामगिरी झालेली नाही. विशेषत: डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाजांना वारंवार अपयश आले आहे. अचूक यॉर्कर, गतीतील बदल आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यात सातत्य नसल्याने प्रतिस्पर्धी संघ शेवटच्या काही षटकांत सामन्याचे चित्र बदलण्यात यशस्वी ठरले. त्यातच क्षेत्ररक्षणातील किरकोळ चुका संघाच्या विरोधात गेल्या. संघात हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरासारखे गोलंदाज नाहीत. त्यामुळे प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांच्यावर जबाबदारी आली. अर्शदीप वगळता त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.

प्रशिक्षक गंभीरची भूमिका काय?

सामन्याची परिस्थिती आणि खेळपट्टीला समजून न खेळल्याचा फटका भारतीय संघाला बसला असल्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी तिसऱ्या सामन्यानंतर मान्य केले. ‘‘आम्ही चांगले खेळलो नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणाऱ्या संघात बदल झाले आहेत. संघात हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमरासारखे खेळाडूही नाहीत. संघ नव्याने तयार करण्यास वेळ लागतो. १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात करत आहे. प्रिन्स यादव आपला दुसरा ट्वेन्टी-२० सामना खेळत आहे. हर्षित राणा दुखापतीतून पुनरागमन करत आहे. आपण नेहमी निकाल पाहतो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निकाल हाच महत्त्वाचा असतो,’’ असे गंभीर म्हणाले. ‘‘कधी कधी प्रतिस्पर्धी संघ आपल्याहून चांगला खेळतो. तर कधी परिस्थिती आपल्यास कळत नाही. खेळाला समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आयर्लंडनंतर आम्ही ते केले नाही. परिस्थितीनुसार आम्हाला खेळ करता आलेला नाही. मग आयर्लंड असो की इंग्लंड. परिस्थितीला समजून आम्ही खेळलो असतो, तर सलग चार लढतीत संघाला पराभूत व्हावे लागले नसते. जेव्हा तुम्ही संघाची नव्याने उभारणी करत असता, तेव्हा असे निकाल पाहण्यास मिळतात. खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठीही काही वेळ द्यावा लागतो. इंग्लंड एक चांगला संघ आहे,’’ असे गंभीर यांनी सांगितले.

सूर्यवंशी, श्रेयसबाबत व्यवस्थापनाची घाई

भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला आयर्लंड व इंग्लंडच्या दौऱ्यासाठी वगळण्यात आले. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. २०२४च्या विश्वविजयानंतर सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने देशाबाहेरही मालिका जिंकत चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात कर्णधार म्हणून निर्णायक भूमिका पार पाडणाऱ्या श्रेयसला २०२६च्या हंगामात पंजाबला ‘प्लेऑफ’ पर्यंत पोहोचवण्यात अपयश आले होते. त्यातच २०२३ नंतर ट्वेन्टी-२० संघातून बाहेर असलेल्या श्रेयसला केवळ ‘आयपीएल’च्या अनुभवावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली. सूर्यकुमार फलंदाजीमध्ये लयीत नाही, असे कारण निवड समितीने दिले. दुसरीकडे, युवा वैभव सूर्यवंशीकडे सर्वांचे लक्ष होते. ‘आयपीएल’ हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या या युवा खेळाडूला त्याच्या मेहनतीचे फळ १५व्या वर्षीच मिळाले. मात्र, आयर्लंडसारख्या संघाविरुद्ध व्यवस्थापनाने त्याला अंतिम अकरामध्ये का स्थान दिले नाही. मग इंग्लंडविरुद्ध आव्हानात्मक परिस्थितीत त्याला सॅमसनच्या जागी संधी मिळाली, पण तो प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाकडून सूर्यवंशी व श्रेयसच्या निर्णयाबाबत घाई झाल्याचे दिसून आले.