Indian students are reluctant to leave Iran अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणाव वाढला आहे. अमेरिका आगामी काळात इराणवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचे आवाहन केले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या शक्यतेमुळे भारत सरकारने विद्यार्थी आणि इतर भारतीय नागरिकांना इराण सोडण्याचा सल्ला (ॲडव्हायझरी) दिला आहे. मात्र, अनेक विद्यार्थी देश सोडण्यास नकार देत आहेत आणि हा आपल्या आयुष्याचा प्रश्न असल्याचे सांगत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी जम्मू-काश्मीरमधील असून त्यांनी इराणमधील विविध विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांची मागणी काय? संघर्षाच्या काळातही विद्यार्थी इराणमध्ये का थांबले आहेत? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

विद्यार्थ्यांचे म्हणणे काय?

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सुरक्षेच्या दृष्टीने देश सोडणे हा योग्य पर्याय आहे. मात्र, मार्चच्या सुरुवातीला होणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षांना मुकल्यास त्यांच्या पदवीला उशीर होऊ शकतो आणि पदवीच्या व्यावसायिक मान्यतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यांच्या मते, विद्यापीठांनी अद्याप परीक्षा पुढे ढकललेल्या नाहीत. पुढच्या महिन्यात होणाऱ्या परीक्षा आणि सरकारची ही ॲडव्हायझरी एकाच वेळी आल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

इराणमधील भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यास का कचरत आहेत?

इराणमधील भारतीय विद्यार्थी दुहेरी पेचात अडकले आहेत. त्यांच्या चिंतेचे मुख्य कारण म्हणजे ५ मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षा. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ‘बेसिक सायन्सेस’ (ओलूम-ए-पाये) आणि ‘प्री-इंटरर्नशिप’ या दोन्ही परीक्षा इराणच्या वैद्यकीय शिक्षण पद्धतीत अत्यंत महत्त्वाच्या सरकारी परीक्षा आहेत. या परीक्षांचे निकालच हे ठरवतात की विद्यार्थी प्री-क्लिनिकल अभ्यासातून क्लिनिकल ट्रेनिंग आणि हॉस्पिटल पोस्टिंगसाठी पात्र आहेत की नाही. या परीक्षा वर्षातून फक्त दोनदा घेतल्या जातात, त्यामुळे या परीक्षेला मुकणे म्हणजे शैक्षणिक वर्षातील सहा महिन्यांचे नुकसान करणे असेल. त्यामुळे साडेपाच वर्षांच्या वैद्यकीय पदवी पूर्ण होण्यास मोठा विलंब होऊ शकतो.

इराणमधील बिलाल भट या भारतीय विद्यार्थ्याने ‘एएनआय’या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, “आमच्या परीक्षा ५ आणि २८ मार्चला आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सूचनेनुसार आम्हाला त्वरित देश सोडण्यास सांगण्यात आले आहे, पण ही आमची सर्वात महत्त्वाची परीक्षा असल्याने आम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. येथे परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि प्रत्येकजण युद्धाचा विचार करत आहे. आम्हाला देश सोडायचा आहे, पण परीक्षांमुळे ते शक्य नाही.”

काही दिवसांपूर्वी इराणमधून भारतात परतलेला फैजान नबी हा विद्यार्थी तेथील सुरक्षेबद्दल काळजीत होता. मात्र, त्यालादेखील आपल्या शैक्षणिक भविष्याची चिंता सतावत आहे. नबीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, “वाढत्या तणावामुळे मी काही दिवसांपूर्वीच परतलो, पण सध्या विद्यापीठांमध्ये सेमिस्टर परीक्षा सुरू आहेत. तसेच ‘ओलूम-ए-पाये’ आणि प्री-इंटरर्नशिप यांसारख्या देशपातळीवरील महत्त्वाच्या परीक्षा आहेत; त्या चुकल्या तर सहा महिन्यांचे अभ्यासाचे नुकसान होईल.”

मुसाईद नावाच्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, “इराणमध्ये अंतर्गत परिस्थिती ठीक आहे, मात्र बाह्य परिस्थिती खूप वाईट आहे. आगामी काळात युद्ध होईल आणि परिस्थिती बिघडेल असे बोलले जात आहे. आम्ही भारतीय दूतावासाला विनंती करतो की, त्यांनी आमच्या विद्यापीठाशी आणि इराणच्या मंत्रालयाशी बोलून परीक्षा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा.”
इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये शिकणाऱ्या मोहम्मद अझीमनेही हीच चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, “आमच्या परीक्षा मार्चमध्ये आहेत. आम्ही आता देश सोडला तर आमचे करिअर उद्ध्वस्त होईल. सरकारने विद्यापीठांशी संपर्क साधून परीक्षा पुढे ढकलण्याचे आश्वासन मिळवून द्यावे, त्यानंतरच आम्ही सुरक्षितपणे मायदेशी परतू शकू.”

विद्यार्थी पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी का करत आहेत?

सरकारच्या सूचनेनंतर काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारने इराणी प्रशासनाशी चर्चा करावी आणि परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे; यामुळे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्यांना तात्पुरते मायदेशी परतता येईल.

‘ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन’च्या जम्मू-काश्मीर युनिटने पंतप्रधानांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे. “इराणमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि दूतावासाने तेथील विद्यापीठांशी समन्वय साधून भारतीय विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात. विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर स्थलांतर सुनिश्चित करावे,” असे या पत्रात म्हटले आहे. ‘ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन’च्या जम्मू-काश्मीर युनिटचे अध्यक्ष मोहम्मद मोमीन खान म्हणाले, “काही विद्यार्थी आधीच भारतात आले आहेत, त्यांच्यासाठी आता परीक्षेसाठी परत जाणे शक्य नाही. पालकांमध्येही मोठी भीती आहे आणि त्यामुळेच आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.”

इराणमध्ये किती भारतीय विद्यार्थी?

‘मनीकंट्रोल’ने लोकसभा आणि राज्यसभेच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असून, त्यानुसार २०२४ मध्ये सुमारे २,००० भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी इराणची निवड केली होती. सध्या साधारण १,००० ते १,५०० भारतीय विद्यार्थी तिथे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचा अंदाज आहे. २०२२ च्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे २,०५० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये प्रामुख्याने तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, शहीद बेहेश्ती युनिव्हर्सिटी आणि इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, यातील मोठी संख्या काश्मिरी विद्यार्थ्यांची आहे. काश्मीरमधील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी तेहरानला जातात, तर काही विद्यार्थी ‘कोम’ आणि ‘मशाद’ यांसारख्या शहरांमध्ये इस्लामिक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जातात. मात्र, अमेरिकेच्या लष्करी कारवाईची टांगती तलवार असल्याने अनेक विद्यार्थी आता भारतात परतले आहेत.

वैद्यकीय शिक्षणासाठी इराणची निवड का?

तज्ज्ञांनी इराणची निवड करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, हे विद्यार्थी अनेक कारणांमुळे वैद्यकीय शिक्षणासाठी इराणची निवड करतात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील मर्यादित वैद्यकीय जागांसाठी असणारी स्पर्धा. उदहारण द्यायचे झाल्यास, भारतात जवळजवळ २३ लाख विद्यार्थी NEET-UG परीक्षेला बसतात. ही संख्या संपूर्ण भारतातील १.१ लाख एमबीबीएस जागांसाठी विचारात घेतल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विदेशात जाण्याचा पर्याय निवडावा लागतो. त्याव्यतिरिक्त सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये फक्त ५५,००० जागा आहेत. या महाविद्यालयांमधील शिकवणी फी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्यात आहे. खाजगी विद्यापीठांमधील उर्वरित जागांसाठी शिकवणी फी खूप जास्त आहे आणि बहुतेक कुटुंबांना ते परवडत नाही.

इराणची निवड करण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेथील अभ्यासक्रमांची परवडणारी शिकवणी फी. तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इस्फहान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेससारख्या विद्यापीठांमधील शिकवणी फी युरोप किंवा अमेरिकेतील विद्यापीठांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. इराणमध्ये राहण्याचा खर्चदेखील परवडणारा आहे. इराण अनेक शिष्यवृत्तीही देते, त्यामुळे भारतीय विद्यार्थी इराणकडे आकर्षित होतात. खर्चाव्यतिरिक्त आधुनिक पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम आणि लवकर मिळणारे क्लिनिकल एक्सपोजर यांसारख्या घटकांमुळे भारतीय विद्यार्थी इराणमधील वैद्यकीय विद्यापीठांकडे आकर्षित होत आहेत.