Why Men Prefer Fair Bride Skin Color Prejudice India: आजही भारतीय समाजात लग्नासाठी मुलगी पाहताना तिचे शिक्षण, नोकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्वभाव यांच्याबरोबरच त्वचेच्या रंगालाही महत्त्व दिले जाते. अनेक विवाहविषयक जाहिरातींमध्ये आजही ‘गोरी’, ‘उजळ वर्णाची’ किंवा ‘फेअर कॉम्प्लेक्शन’ अशा शब्दांचा वापर केलेला आढळतो. नातेवाईकांच्या गोतावळ्यात एखाद्या मुलीच्या रंगावरून सहजच बोचरी टीका केली जाते. त्यामुळे, भारतीय पुरुषांना गोऱ्या स्त्रियांचे आकर्षण का वाटते? ही केवळ वैयक्तिक आवड आहे की, त्यामागे काही सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत, हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी भारतीय विवाहविषयक संकेतस्थळांवरील स्त्री-पुरुषांच्या अपेक्षांचा अभ्यास केला.

या संशोधनातून एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे गोऱ्या त्वचेला दिले जाणारे प्राधान्य हे केवळ शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित नसून त्याचा विवाहसंस्थेतील सामाजिक अपेक्षा आणि सौंदर्याच्या प्रचलित निकषांशीही संबंध आहे.

विवाहविषयक संकेतस्थळांवरील संशोधनात नेमके काय आढळले?

सर्व भारतीय पुरुषांना गोऱ्या स्त्रियाच आवडतात किंवा गोऱ्या त्वचेचे आकर्षण ही पुरुषांची जन्मजात प्रवृत्ती आहे, असा निष्कर्ष या संशोधनातून सिद्ध झालेला नाही. Looking for Love in All the White Places: A Study of Skin Color Preferences on Indian Matrimonial and Mate-Seeking Websites या शोध निबंधात संशोधकांनी भारतातील चार विवाहविषयक संकेतस्थळांवरील वधू-वरांच्या २०० प्रोफाइल्स आणि अपेक्षांचा सविस्तर अभ्यास केला. त्याचबरोबर या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यशस्वी विवाहांच्या २०० छायाचित्रांचाही अभ्यास करण्यात आला.

संशोधकांना पुढील चार महत्त्वाच्या बाबी आढळल्या.

१. पुरुषांकडून स्वतःपेक्षा उजळ त्वचेच्या वधूला प्राधान्य

ज्या चार विवाहविषयक संकेतस्थळांचा अभ्यास करण्यात आला, त्यात पुरुषांमध्ये स्वतःपेक्षा उजळ त्वचेच्या स्त्रीशी विवाह करण्याची पसंती ठळकपणे दिसून आली. म्हणजेच, स्वतःचा रंग सावळा असला तरी संभाव्य वधूचा रंग उजळ असावा, अशी अपेक्षा अनेक पुरुषांनी व्यक्त केली होती.

२. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांनी त्वचेच्या रंगाला अधिक महत्त्व दिले

संशोधकांना असे आढळले की, संभाव्य जोडीदाराच्या त्वचेच्या रंगाबाबत विशिष्ट अपेक्षा नोंदवण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत अधिक होते. पुरुषांनी अपेक्षित वधूचे वर्णन करताना सुंदर किंवा मोहक अशा अर्थाचे विशेषणही अधिक वापरले होते.

३. यशस्वी विवाहांच्या छायाचित्रांमध्ये वधूचा रंग तुलनेने उजळ

संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यशस्वी विवाहांच्या २०० छायाचित्रांमध्ये वधूचा रंग वराच्या तुलनेत उजळ असल्याचे संशोधकांना लक्षात आले. या छायाचित्रांमध्ये गडद त्वचेच्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व अत्यल्प होते. मात्र, ही संकेतस्थळांवर प्रसिद्ध केलेली निवडक छायाचित्रे होती.

४. विवाहविषयक संकेतस्थळे वर्णाधारित पूर्वग्रहांना बळ देऊ शकतात

संशोधकांच्या मते, विवाहविषयक संकेतस्थळांवरील त्वचेच्या रंगानुसार जोडीदार शोधण्याचे पर्याय आणि यशस्वी विवाहांच्या जाहिरातींमधील उजळ त्वचेच्या वधूंच्या प्रतिमा समाजातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या वर्णाधारित पूर्वग्रहांना बळ देऊ शकतात.

गोऱ्या त्वचेला प्राधान्य देण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

१. सौंदर्य आणि त्वचेच्या रंगाचा सामाजिक संबंध

भारतीय समाजात अनेकदा स्त्रीच्या सौंदर्याचे मूल्यमापन तिच्या त्वचेच्या रंगावरून केले जाते. लहानपणापासून गोऱ्या रंगाचे कौतुक ऐकायला मिळणे, चित्रपटांमधील सौंदर्याच्या प्रतिमा आणि विवाहाच्या जाहिरातींमधील अपेक्षा यांमुळे काही पुरुषांच्या सौंदर्यविषयक कल्पनांवर प्रभाव पडू शकतो. सामाजिक वातावरणातूनही अशा पसंती विकसित होऊ शकतात.

२. विवाहातील सामाजिक प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या अपेक्षा

भारतात विवाह हा अनेकदा केवळ दोन व्यक्तींचा निर्णय नसून त्यात कुटुंबाचाही सहभाग असतो. त्यामुळे जोडीदाराची निवड करताना वैयक्तिक आकर्षणाबरोबरच कुटुंबाच्या अपेक्षा आणि सामाजिक मान्यतेचाही विचार केला जाऊ शकतो. यासंदर्भात २०१८ मध्ये इतिशा नागर यांनी केलेला प्रयोग महत्त्वाचा आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील विवाहयोग्य मुलांच्या १०८ मातांना संभाव्य वधू किंवा वराची शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती देण्यात आली. त्यानंतर एकाच व्यक्तीची संगणकीय पद्धतीने त्वचेचा रंग बदललेली छायाचित्रे दाखवण्यात आली. उजळ त्वचेच्या व्यक्तींना गडद त्वचेच्या व्यक्तींपेक्षा अधिक अनुकूल गुणांकन मिळाले. संशोधकांनी नोंदवले की, विवाहासाठी जोडीदार निवडताना त्वचेचा रंग हा इतर गुणांच्या मूल्यमापनावरही प्रभाव टाकू शकतो (Itisha Nagar, 2018). या प्रयोगात पुरुषांच्या प्रत्यक्ष आकर्षणाचे मोजमाप केलेले नव्हते. मात्र, विवाहासाठी जोडीदार निवडताना कुटुंबातील सदस्यांच्या निर्णयांवरही त्वचेच्या रंगाचा प्रभाव पडू शकतो, हे त्यातून दिसून आले.

३. गोऱ्या त्वचेचा सामाजिक पूर्वग्रह आजही टिकून आहे का?

Social Sciences & Humanities Open (२०२६) या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात २०१० ते २०२४ या कालावधीतील भारतातील ३० वृत्तपत्रांमधील विवाहविषयक जाहिरातींचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात उजळ त्वचेला प्राधान्य देणारे उल्लेख सातत्याने आढळले. बदलत्या सामाजिक परिस्थितीतही विवाहाच्या संदर्भात गौर वर्णाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती कायम असल्याचे संशोधकांनी नोंदवले आहे (ScienceDirect). हा

वर्णाधारित पूर्वग्रह (Colorism) आणि वसाहतवादी मानसिकता

भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळापासूनच ‘गोरा रंग’ म्हणजे श्रेष्ठत्व, सत्ता आणि उच्च दर्जा, तर ‘गडद रंग’ म्हणजे निम्न दर्जा अशी एक सामाजिक धारणा निर्माण झाली. हीच मानसिकता पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित होत गेली आणि आजही विवाहसंस्थेत वर्णाधारित पूर्वग्रहांच्या रूपाने दिसून येते. त्यामुळे, काही वेळा पुरुषांमध्ये स्वतःच्या सावळ्या रंगाबद्दल न्यूनगंड असतो. ‘मी सावळा आहे, पण माझी बायको गोरी असावी’ या विचारातून ते स्वतःच्या रंगाची भरपाई (Compensate) करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून पुढील पिढीचा रंग उजळ असेल असा एक भाबडा समज असतो.

या संशोधनातून नेमके काय समजते?

विवाहविषयक संकेतस्थळांवरील संशोधनातून पुरुषांकडून स्वतःपेक्षा उजळ त्वचेच्या वधूला प्राधान्य दिले जात असल्याचे आढळले. त्याचबरोबर, संकेतस्थळांवरील यशस्वी विवाहांच्या निवडक छायाचित्रांमध्येही उजळ त्वचेच्या वधूंचे अधिक प्रतिनिधित्व दिसून आले. मात्र, पुरुषांना गोऱ्या स्त्रियांचे आकर्षण का वाटते, याचे एकच जैविक किंवा मानसशास्त्रीय कारण या अभ्यासातून सिद्ध झालेले नाही. हे संशोधन मुख्यतः विवाहाच्या संदर्भातील त्वचेच्या रंगाबाबतची पसंती आणि संकेतस्थळांवरील तिचे प्रतिनिधित्व स्पष्ट करते.