मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करताना भारतीय प्रवासी नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसतात. परंतु, इतर सार्वजनिक वाहतुकीचा उदाहरणार्थ बस, रेल्वेचा वापर करताना प्रवासी नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. मेट्रो स्टेशन, विमानतळावर भारतीय प्रवासी नियमांचे पालन करताना आढळून येतात. परंतु, इतर वाहतूक व्यवस्थांचा वापर करताना मात्र नियमांचे प्रवाशांकडून अनेकदा उल्लंघन होते. भारतीय प्रवाशांच्या वर्तणुकीतील फरकाची कारणे आर्थिक पाहणी अहवालातून सांगण्यात आली आहेत. नियमांमध्ये स्पष्टता, नियमांचे उल्लंघन केल्यास योग्य कारवाई व वाहतूक व्यवस्थेची सुटसुटीत रचना असेल तर प्रवाशांमध्ये वाहतूक व्यवस्था ही त्यांच्या एकट्यासाठी नसून ती सगळ्यांसाठी आहे, अशी भावना निर्माण होते.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी ती व्यवस्था प्रवाशांना सहज सोप्या पद्धतीने वापरता येईल अशी असणे आवश्यक असते. भारतीय नागरिकांची वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक (Public Transport) व्यवस्थेचा वापर करताना तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना वेगवेगळी वर्तणूक का असते ? मेट्रो स्टेशनवर शिस्तीत लाइनमध्ये उभे राहून मेट्रोत प्रवेश करणे, मेट्रो स्टेशनवरील नियमांचे पालन करणे, तसेच विमानतळावर लाइनमध्ये उभे राहणे, पासपोर्ट कार्यालयातही नियमांचे पालन करणे, पण सार्वजनिक बस व रेल्वेत चढताना मात्र भारतीय प्रवाशांकडून ओढाताण, चढाओढ व आरडाओरडा का केला जातो ? आर्थिक पाहणी अहवाल २०२५-२६ मध्ये भारतीय प्रवाशांमध्ये आढळणाऱ्या या ‘सामान्य’ वर्तणुकीची पाच कारणे सांगण्यात आली आहेत. मेट्रो स्टेशनमध्ये प्रचंड गर्दी असली तरी नियमांचे पालन का केले जाते ? याबाबतची पाच कारणे –

पहिले कारण : नियमांमधील स्पष्टता

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना प्रवाशाचे वर्तन कसे असावे, याबाबत प्रवाशाला स्पष्टता असली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी विशिष्ट प्रकारची सोय असली पाहिजे. मेट्रो, बस किंवा रेल्वे स्थानकात कुठे वळायचे याबाबत प्रवाशाला सहज समजेल अशा भाषेत दिशादर्शक फलक असावेत. लाइनमध्ये उभे कुठे राहायचे ते स्थानकावर आखून द्यायला हवे. ही व्यवस्था मुख्यत: मेट्रो स्थानकांमध्ये दिसून येते. त्यामुळे मेट्रोत प्रवासी सहजपणे नियमांचे पालन करताना दिसतात.

एखाद्या स्थानकावर जर एक व्यवस्था ठरवून दिलेली असेल तर तिचे पालन केले जाते. प्रवासी त्या व्यवस्थेचे पालन करतात. परंतु, व्यवस्थेत जर स्पष्टता नसेल तर मात्र प्रवाशांचा गोंधळ होतो. त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सगळ्याचा प्रवाशांना गोंधळाला सामोरे जावे लागते.

दुसरे कारण : नियमांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा शिक्षा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना जर एखाद्या नियमाचे उल्लंघन प्रवाशाने केले तर त्याच्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी अपेक्षा भारतीय प्रवाशांना असते. मेट्रो स्थानकात स्टाफ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो, प्रवाशाला नियमाचे उल्लंघन केल्यास दंड ठोठावला जातो. तसेच मेट्रोत सुरक्षा व्यवस्था चोख असते. त्यामुळे मेट्रो स्थानके ही तेथील प्रशासनाच्या पूर्णपणे अखत्यारित असतात.

मेट्रो स्थानकात कोणताही प्रवासी असो नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला दंड भरावा लागतो. तडजोड करता येत नाही, इतर वाहतूक व्यवस्थेत नियमांशी तेथील कर्मचारी, अधिकारीच तडजोड करताना आढळून येतात. त्यामुळे इतर प्रवाशांमध्ये व्यवस्थेबद्दल एक प्रकारे अविश्वास निर्माण होतो.

तिसरे कारण : वेळेला महत्व

रेल्वे दर एक किंवा दोन मिनिटाला येते, याबाबत जर प्रवाशांना आधीच माहिती असेल तर प्रवासी गोंधळ करत नाहीत. स्थानकातील नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. लाइनमध्ये उभे राहून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतात. परंतु, जर रेल्वे उशीराने येत असेल, वेळेचे कोणतेही पालन होत नसेल तर मात्र प्रवाशी लाइन तोडतात. लाइनमध्ये उभे असल्यास धक्काबुक्की सारखे प्रकार आढळून येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वेळेला महत्व आहे.

चौथे कारण : इतर प्रवाशांकडे पाहून नियमांचे पालन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थिरता असेल तर नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांकडे पाहून इतर प्रवासी चांगले वर्तन ठेवतात. जेव्हा रांगेत उभे असलेले लोक दिसतात, तेव्हा इतर प्रवासीदेखील रांगेत उभे राहतात. इतर प्रवाशांची वर्तणूक पाहून सगळ्याच प्रवाशांचे वर्तन सुधारते. एखाद्या प्रवाशाने नियमांचे उल्लंघन केले तर इतर प्रवासी त्याला खडसावतात. याचा अर्थ फक्त प्रशासनाचेच नियम मोडणाऱ्या प्रवाशावर लक्ष नसते, तर इतर प्रवाशांनादेखील नियम मोडणारे प्रवासी खटकतात. विशेषत: मेट्रोमध्ये हे आढळून येते.

पाचवे कारण : मेट्रो स्थानकामधील व्यवस्थितपणा

सार्वजनिक ठिकाणांची पडझड, खराब व्यवस्था आणि इतर लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतील तर इतर नागरिक देखील त्या सार्वजनिक ठिकाणांचा सन्मान करत नाहीत. त्यांची काळजी घेत नाहीत. मेट्रो स्थानकांना व्यवस्थितपणे मेन्टेन केले जाते. त्यामुळे प्रवासीदेखील मेट्रो स्थानक व मेट्रो ट्रेनमध्ये काळजीपूर्वक वर्तन ठेवतात. ज्यावेळेस एखादी व्यवस्था सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्पष्टपणे आखून दिलेली नसते, त्यावेळी प्रवासी नियमांचे उल्लंघन करून गोंधळ निर्माण करतात. ही पाच कारणे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहेत.