US-Iran ceasefire 2026 impact on Indian citizens : इराणमधील भारतीयांनी शक्य तितक्या लवकर आपल्या मायदेशी परतावे असे आवाहन भारतीय दूतावासाने बुधवारी (९ एप्रिल) केले आहे. भारताच्या या भूमिकेनंतर पश्चिम आशियात पुन्हा संघर्षाचा वणवा पेटणार असल्याची आवई समाजमाध्यमांवर उठली. सहा आठवड्यांच्या रक्तरंजित संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करीत त्याबाबतची माहिती दिली. या घडामोडीनंतर जगभरातील अनेक देशांनी सुटकेचा श्वास सोडला. यादरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतरही भारत सरकारने इराणमधील आपल्या नागरिकांना देश सोडण्याचे आवाहन का केले? त्याविषयीचा हा आढावा…
अमेरिका-इराणमध्ये संघर्षाचा भडका
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर एकापाठोपाठ एक हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अनेक तेलवाहू जहाजे अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यान इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली न केल्यास त्यांच्या पायाभूत सुविधांवर मोठे हल्ले केले जातील, अशी धमकीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यासाठी इराणला त्यांनी मंगळवारपर्यंतची (७ फेब्रुवारी) अंतिम मुदत दिली होती. त्याआधीच दोन्ही देशांकडून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. परिणामी इंधन दरवाढीची झळ सोसणाऱ्या अनेक देशांनी सुटकेचा श्वास सोडला.
भारतीयांना इराण सोडण्याचे आवाहन
इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम झाला असला तरीही तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जाते. हीच बाब लक्षात घेता इराणमधील भारतीय दूतावासाने बुधवारी (८ एप्रिल) आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आणि अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी तातडीने मायदेशी परतावे, त्यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी सुचवलेल्या मार्गांचा वापर करावा. दूतावासाशी संपर्क न साधता भारतीयांनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय भू-सीमेकडे जाण्याचा प्रयत्न करू नये, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही तातडीच्या मदतीसाठी दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांकही जारी केले.
आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?
भारतीय दूतावासाच्या कडक सूचना
अमेरिका-इराण यांच्यात युद्धविराम होण्यापूर्वी ७ एप्रिल रोजी भारतीय दूतावासाने इराणमधील आपल्या नागरिकांना किमान ४८ तास घरातच राहण्याचा आणि संवेदनशील ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळच्या सूचनेत म्हटले होते की, इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी पुढील ४८ तास जिथे आहेत तिथेच थांबावे, वीज प्रकल्प, लष्करी ठिकाणे आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहावे, घराबाहेर पडणे टाळावे आणि महामार्गावरील प्रवासासाठी दूतावासाशी समन्वय साधावा. यादरम्यान युद्धविरामाची घोषणा होताच भारतीय दूतावासाने इराणमधील आपल्या नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढणार असल्याचा कयास अनेकांनी बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या निर्णयामागे कोणतीही भीती पसरवण्याचा हेतू नसून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत सरकारची नेमकी भूमिका काय?
परदेशातील भारतीयांची सुरक्षा हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम झाला असला तरीही त्यानंतर काय होईल याचा अंदाज काढणे कठीण आहे, त्यामुळेच परिस्थिती पुन्हा बिघडण्यापूर्वी भारतीयांना इराणमधून सुरक्षित बाहेर काढणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ‘CNN-News18’ला सांगितले. फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावानंतर जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. परिणामी अनेक भारतीय कामगार आखाती देशातच अडकून पडले आहेत. यादरम्यान तात्पुरत्या युद्धविरामानंतर हवाई वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. संघर्ष पुन्हा सुरू झाल्यास भारतीय नागरिक अडचणीत सापडू नयेत म्हणूनच त्यांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले जात आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा : लादेनचा खात्मा करणारी अमेरिकेची ‘सील टीम’ इराणमध्ये; वैमानिकाला मृत्यूच्या जबड्यातून कसे वाचवले?
अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्ध?
अमेरिका-इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाल्यानंतरही पश्चिम आशियातील परिस्थिती अद्यापही नाजूक आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या काही अटी मान्य केल्या असल्या तरीही इराणचे क्षेपणास्त्र आणि अणुऊर्जा कार्यक्रम यांसारखे कळीचे मुद्दे अद्याप सुटलेले नाहीत. युद्धविरामाची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच इराणच्या लावन बेटावरील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा हल्ला झाल्याचा दावा इराणच्या सरकारी माध्यमांनी केला. यादरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही या युद्धविरामाला अस्थिर असे संबोधले आहे. इराणने सहकार्य न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांना शुक्रवारी इस्लामाबाद येथे होणाऱ्या पहिल्या अधिकृत शांतता चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले असून, अमेरिकेतर्फे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे, त्यामुळे या घडामोडीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
