Why Indians are staying Put in Gulf Countries : उदरनिर्वाहासाठी पैसे नसतील तर भारतात गेल्यानंतरही आम्ही मरणारच आहोत, त्यापेक्षा इथेच राहून जीवाचा धोका पत्कारण्याची आमची तयारी आहे, अशी भावना दुबईत अडकलेले बिहारमधील ३७ वर्षीय कामगार दिलीप यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. गेल्या पाच आठवड्यांपासून पश्चिम आशियात पेटलेल्या युद्धाची धग अद्यापही कायम आहे. या संघर्षादरम्यान आखाती देशात अनेक भारतीय कामगार अडकून पडले आहेत. दुबई, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, कतार आणि ओमानमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. इराणकडून या देशांवर सातत्याने हल्ले होत असतानाही हे कामगार आपली नोकरी सोडून मायदेशी परतण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.
बिहारच्या सहरसा येथील दिलीप यादव दशकभरापूर्वी कामाच्या शोधात दुबईला गेले होते. तिथे त्यांना एका कंपनीत मॅकनिकल फिटर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र, पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटल्यानंतर दुबईत राहणाऱ्या अनेक भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला. भारत सरकारने त्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतली, तरीदेखील दिलीप यादव यांच्यासह बहुतांश भारतीय कामगारांनी दुबई सोडण्यास नकार दिला आहे. नोकरी सोडून रिकाम्या हाताने मायदेशी परतण्यापेक्षा कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी दुबईतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत भारतात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक भारतीय कामगार दुबई, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, कतार आणि ओमानमध्ये काम करीत आहेत. भारताच्या तुलनेत आखाती देशात काम करणाऱ्या कामगारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळते. परिणामी घराचे कर्ज, मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी अनेक भारतीय कामगार परदेशातील नोकरीला प्राधान्य देतात. मायदेशी परतल्यावर रोजगाराची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे ते परदेशातच राहून तेथील धोक्यांचा सामना करण्यास तयार असतात. दिलीप यादव यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे इराणचे क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माऱ्यापेक्षाही बेरोजगारी आणि गरिबीची भीती भारतीय कामगारांच्या मनात जास्त असल्याचे दिसून येते.
आणखी वाचा : भारतीय लष्करातील जवानांना काय झाले? तिन्ही दलात आजारांचे प्रमाण का वाढले? समितीच्या अहवालात नेमके काय?
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांतील लाखो भारतीय कामगारांच्या सुरक्षेचा आणि रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या संघर्षामुळे आखाती देशांतील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याने तिथे काम करणाऱ्या भारतीय कामगारांवर याचा मोठा परिणाम होत आहे. कामावरून कमी केले जाणे किंवा पगार वेळेवर न मिळणे अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
एका आकडेवारीनुसार, सुमारे ८५ लाखांहून अधिक भारतीय या देशांमध्ये वास्तव्यास असून, युद्धाच्या वणव्यामुळे त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या दुबईतील भारतीय कामगारांची संख्या ३० लाखांहून अधिक आहे. त्यापाठोपाठ सौदी अरेबियात २७ लाख, कुवेतमध्ये १० लाख, कतारमध्ये आठ लाख भारतीय काम करीत आहेत. यातील बहुतांश कामगार हे हॉटेल कर्मचारी, मजूर आणि चालक (ड्रायव्हर) म्हणून काम करत आहेत. वाढत्या महागाईमुळे आणि जीवघेण्या धोक्यामुळे मायदेशी परतावे की नोकरी टिकवण्यासाठी तिथेच थांबावे, असा पेच भारतीय कामगारांसमोर निर्माण झाला आहे. हरियाणातील अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक उदय चंद्रा यांच्या मते, कमी उत्पन्न असलेल्या स्थलांतरितांसाठी हे युद्ध केवळ अडथळा नाही, तर त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. तिकिटाचे वाढलेले दर आणि पुन्हा व्हिसा न मिळण्याची भीती, यामुळे हे कामगार तिथेच थांबून आहेत.
रियाधमध्ये रिटेल क्षेत्रात काम करणाऱ्या फराझ वामीक यांनी सांगितले की, सध्या आम्हाला जीवापेक्षा आमच्या नोकरीची जास्त चिंता आहे. मायदेशी परतण्याची आमची इच्छा आहे, पण एकदा इथून गेलो तर पुन्हा अशी संधी मिळेल याची खात्री नाही. जेद्दामधील ऑटोमोबाईल अभियंता मोहम्मद अहमद म्हणाले की, कुटुंबाकडून मला मायदेशी येण्यासाठी सतत फोन येत असले तरी तिथे गेल्यानंतर मी काय काम करणार? मुलांच्या शिक्षणाचे पैसे कुठून आणणार? हा प्रश्न युद्धापेक्षा मोठा आहे. धक्कादायक बाब म्हणजे युद्धाचा धोका असतानाही आखाती देशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या भारतीयांची संख्या काही कमी झाली नाही. झारखंड येथील २२ वर्षीय तरुण जगदीश याने दुबईला जाण्याची तयारी केली आहे. मला बहिणीचे लग्न करायचे आहे आणि घर बांधायचे आहे. माझ्याकडे तिथे जाण्याशिवाय पर्याय नाही. मृत्यू यायचा असेल तर तो इथेही (भारतात) येईल, असे त्याने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : इराण युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? २० दशलक्ष बॅरल तेल पुरवठा धोक्यात; १९७३ च्या महासंकटाची पुनरावृत्ती!
पश्चिम आशियातील युद्धादरम्यान काही भारतीयांनी आखाती देशात राहण्याचा निर्णय घेतला असला तरीही अनेकांनी जीवाच्या भीतीने मायदेशात धाव घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च ते ७ मार्च या अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत आखाती देशांत अडकलेले ५२,००० हून अधिक भारतीय नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतले आहेत. काही युद्धग्रस्त भागांतील हवाई क्षेत्र अंशतः खुले झाल्यानंतर ही मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. मायदेशी परतलेल्या भारतीयांनी युद्धाच्या भीषण आठवणी सांगितल्या आहेत. दुबईहून परतलेले संजीव यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, तिथे सतत सायरन वाजत होते आणि ड्रोन हल्ल्यांचे इशारे दिले जात होते. हवेतच क्षेपणास्त्रे रोखली जात असताना होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे सर्वत्र घबराट पसरली होती. आमच्यापैकी अनेकांसाठी हा अनुभव पहिलाच आणि अत्यंत धक्कादायक होता. अनेक दशकांपासून आखाती देश हे भारतीयांसाठी प्रगतीचे आणि सुरक्षिततेचे केंद्र मानले जात होते. आता मात्र युद्धाच्या भीषण परिस्थितीमुळे तिथे राहणे खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न लाखो भारतीयांना सतावत आहे.
