भारतात बँकेतील ठेवींच्या प्रमाणात मागील पाच वर्षात बदल झालेला दिसून येत आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतीय ठेवीदारांनी पैसे कमी व्याज देणाऱ्या बचत खात्यातून (सेविंग्ज बँक अकाऊंटमधून) काढून जास्त व्याज देणाऱ्या मुदत ठेवींमध्ये (टर्म डिपॉझिट) गुंतवण्यास सुरूवात केली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ मध्ये सेविंग्ज डिपॉझिट ३४.६ टक्के होते. त्यात घट होऊन मार्च २०२६ मध्ये ते २८.७ टक्के झाले आहे. यावरून व्याजदर वाढत असल्याच्या वातावरणात आता ठेवीदारांचा गुंतवणुकीचा ट्रेंडही बदलल्याचे दिसून येते. तसेच टर्म डिपॉझिटमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२२ मध्ये ५५.२ टक्के असलेले टर्म डिपॉझिट वाढून मार्च २०२६ मध्ये ६१.६ टक्के झाले आहे. ठेवीवर (डिपॉझिट) चांगला परतावा मिळावा म्हणून भारतीय ठेवीदार ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवण्यावर भर देत आहेत. आरबीआयच्या ‘ठेवींवरील वार्षिक मूलभूत सांख्यिकीय परतावा’ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

बचत खात्यांवरील (SB Accounts) व्याजदर किती?

२०२५ – २६ पासून बँकांच्या बचत खात्याचे व्याजदर घसरण्यास सुरूवात झाली आहे. बँकांनी कर्ज वाढीला बळ देण्यासाठी व संसाधने उभी करण्यासाठी FD वर आकर्षक व्याजदर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण बँकिंग प्रणालीमध्ये एकूण ठेवींच्या वाढीला गती मिळाली आहे. बँक आता बचत खात्यांवर अत्यंत कमी व्याजदर देत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बचत खात्यांवर केवळ २.५ टक्के व्याज देत आहे. गेल्या दहा वर्षांत बचत खात्यांचे व्याजदर सुमारे ६ ते ८ टक्क्यांनी घसरले आहे. SBI एक वर्षाच्या FD वर ६.२५ टक्के आणि दोन वर्षांच्या ठेवींवर ६.४५ टक्के व्याज देत आहे. HDFC बँक देखील एक वर्षाच्या FD वर ६.२५ टक्के आणि बचत खात्यांवर २.५ टक्के व्याज देत आहे. ICICI बँक देखील बचत खात्यांवर २.५ टक्के व्याज देत आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यामुळे बचत खात्यांचे व्याजदर घसरले आहेत. जानेवारी २०२५ पासून आरबीआयने रेपो दर ६.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ही एकूण १२५ बेसिस पॉईंट्सची घसरण आहे.

बचत खात्यातील पैशांच्या खरेदी क्षमतेत घट?

जेव्हा बचत खात्यावरील व्याजाचा दर किरकोळ महागाईच्या (retail inflation) दरापेक्षा कमी असतो, तेव्हा बचतीवरील खरा परतावा (real return) उणे म्हणजेच नकारात्मक असतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, बचत खात्यात असलेल्या पैशांची खरेदी क्षमता कालांतराने कमी होत चालली आहे. बँकांचे सध्याचे बचत खात्यांचे व्याजदर हे एप्रिलमधील ३.४८ टक्के या किरकोळ महागाईच्या पातळीपेक्षा जवळपास १०० बेसिस पॉईंट्सने कमी आहेत. आरबीआयच्या (RBI) आकडेवारीनुसार, १५ मे २०२६ पर्यंत बँकिंग क्षेत्रातील डिमांड डिपॉझिट्स (बचत आणि चालू खाती) ३१.६५ लाख कोटी रुपये आणि टर्म डिपॉझिट्स (मुदत ठेवी) २२५.२३ लाख कोटी रुपये होते. चालू खात्यावर (Current account) कोणताही व्याजदर मिळत नाही.

बचत खात्यातील ठेवी ग्राहकांना सहजपणे काढता येतात. त्यामुळे कोणताही दंड न भरता किंवा मुद्दलाचे नुकसान न होता कधीही पैसे काढता येतात. या उच्च तरलतेमुळे (liquidity) दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत पैसे तात्काळ मिळवण्यासाठी हा एक पसंतीचा पर्याय ठरतो. बँकांसाठी बचत ठेवी फायदेशीर ठरतात. कारण या खात्यांवर दिला जाणारा व्याजदर फिक्स किंवा टर्म डिपॉझिट्सच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असतो. परिणामी, बचत ठेवी बँकांना तुलनेने कमी खर्चात निधी गोळा करण्यास मदत करतात आणि त्याच वेळी बचत खात्यातील ठेवीदारांना त्यांच्या ठेवीतील पैसे कधीही सहजपणे काढता येतात. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, भारतातील कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये ठेवी ठेवल्या जातात. बचतदार आता पारंपारिक बचत खात्यांऐवजी मुदत ठेवींना (fixed deposits) अधिक पसंती देत आहेत. यामुळे बँकांच्या दायित्वाचे (liability) स्वरूप बदलत असून वित्तीय प्रणालीमध्ये टर्म डिपॉझिट्सची भूमिका अधिक मजबूत होत आहे.

ठेवींमध्ये कुटुंबांचा वाटा सर्वाधिक

बँकेतील ठेवींमध्ये कुटुंबांचा वाटा किंचित घटला असला तरी त्यांचा वाटा सर्वाधिक आहे. आरबीआयच्या (RBI) अहवालानुसार, मार्च २०२६ च्या अखेरीस एकूण ठेवींमध्ये कुटुंबांकडून झालेल्या ठेवींचा वाटा ५९.३ टक्के होता. दरम्यान, कुटुंबांचा कल आता FD पेक्षा म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढत आहे.

१ कोटी व ५ कोटींहून अधिकच्या मुदत ठेवी (Term Deposits) किती?

मुदत ठेवींचे जवळून विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, मोठ्या रकमेच्या ठेवींचेच वर्चस्व कायम आहे. मार्च २०२६ पर्यंत १ कोटी रुपये व त्याहून अधिक रकमेच्या ठेवींचा एकूण मुदत ठेवींमध्ये ४६.३ टक्के वाटा होता. त्यापैकी ५ कोटी रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या ठेवींचा वाटा ३४.८ टक्के इतका आहे. यावरून बँकांच्या निधीच्या स्रोतामध्ये मोठ्या ठेवीदारांचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा एकूण मुदत ठेवींमध्ये १७.८ टक्के वाटा होता.

ग्राहकांचा कल दीर्घकालीन मुदत ठेवींकडे, ज्येष्ठ नागरिकांचा वाटा स्थिर

ठेवीदारांनी मध्यम मुदतीच्या फिक्स डिपॉझिट्सना पसंती दिली आहे. मार्च २०२२ मधील ५०.४ टक्क्यांच्या तुलनेत, मार्च २०२६ मध्ये १ ते ३ वर्षांच्या मुदती असलेल्या टर्म डिपॉझिट्सचा वाटा सातत्याने वाढून ६९.८ टक्के झाला. दुसरीकडे, याच कालावधीत १ वर्षांपर्यंतची मुदत असलेल्या ठेवींचा वाटा १६.७ टक्क्यांवरून घसरून ८.८ टक्क्यांवर आला आहे. ग्राहकांचा कल दीर्घ कालावधीसाठी चांगल्या व्याजदराचा लाभ घेण्याकडे असल्याचे दिसून येते. आरबीआयने ठेवींच्या व्याजदराच्या स्वरूपात झालेल्या एका मोठ्या बदलाचीही माहिती दिली आहे. वर्षभरापूर्वीच्या २७.३ टक्क्यांच्या तुलनेत, मार्च २०२६ मध्ये ७ टक्क्यांपेक्षा कमी व्याज देणाऱ्या मुदत ठेवींचा वाटा वेगाने वाढून ६१.८ टक्के झाला आहे. दरम्यान, बँकेतील ठेवींमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा वाटा स्थिर राहिला आहे. गेल्या चार आर्थिक वर्षांत त्यांचे योगदान १९.८ टक्के ते २०.२ टक्क्यांच्या दरम्यान राहिले असून मार्च २०२६ च्या अखेरीस ते २० टक्क्यांवर होते.