Blood Sugar Spike in Infection : एखादा व्यक्तीला सर्दी-ताप, घसादुखी किंवा संसर्गजन्य आजार झाला असेल तर काही दिवसांसाठी व्यक्तीच्या शरीराची सामान्य प्रक्रिया बदलते. अशावेळी रक्तातील साखर तपासली आणि ती नेहमीपेक्षा जास्त असली तर ‘मधुमेह तर झाला नाही ना?’ असा प्रश्न पडू शकतो. यामागे अनेक घटक कारणीभूत ठरतात, त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीचा (ग्लुकोज) थेट मधुमेहाशी संबंध जोडणे घाईचे ठरू शकते, असे डॉक्टर सांगतात.

संसर्गजन्य आजार झाला असेल तर विषाणू किंवा जीवाणूंशी लढा देण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा सक्रिय होते. यादरम्यान शरीरातील काही हार्मोन्स, चयापचय क्रिया, भूक आणि शारीरिक हालचाली यांमध्ये बदल होऊ शकतात. या बदलांमुळे शरीरात ग्लुकोजची निर्मिती आणि त्याचा होणारा वापर यावर थेट परिणाम होतो; ज्यामुळे मधुमेह नसणाऱ्या व्यक्तींमध्येही संसर्गादरम्यान रक्तातील साखर नेहमीपेक्षा जास्त दिसून येऊ शकते.

संसर्ग गंभीर पातळीवर असेल किंवा शरीरावर आजाराचा ताण असेल, तर रक्तातील साखर वाढण्याची शक्यता अधिक असते. मात्र, एखाद वेळेस साखरेची पातळी जास्त दिसून आली म्हणजे मधुमेह झालाच असा निष्कर्ष काढू नये. संसर्गजन्य आजारामुळे साखर तात्पुरती वाढू शकते आणि प्रकृती सुधारल्यानंतर ती पुन्हा नेहमीच्या पातळीवर येऊ शकते असे डॉक्टर सांगतात.

मात्र, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढली तर ती किती काळ राहू शकते आणि पुन्हा शुगर टेस्ट कधी करावी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. यामुळे आजारपणात साखरेची पातळी कशी बदलतेय याचा अंदाज लावणे सोपे होते.

इलाइट केअर क्लिनिकचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. पल्लेटी शिवकार्तिक रेड्डी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, आपल्याला जेव्हा संसर्गजन्य आजार होतो, तेव्हा आपले शरीर एका ‘फिजियोलॉजिकल स्ट्रेस’ म्हणजेच तीव्र शारीरिक ताणाखाली येते. सोप्या भाषेत सांगायचे तर आजाराशी किंवा संसर्गाशी लढा देण्यासाठी आपले शरीर अचानक एका आणीबाणीच्या स्थितीत जाते. आजाराचा सामना करण्यासाठी शरीराला नेहमीपेक्षा अधिक ऊर्जेची गरज भासते. या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी शरीरात कॉर्टिसॉल (Cortisol), ॲड्रिनॅलीन (Adrenaline) आणि ग्लुकागॉन (Glucagon) यांसारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वेगाने वाढू लागते. हे हार्मोन्स यकृताला रक्तामध्ये अधिक प्रमाणात ग्लुकोज म्हणजेच साखर सोडण्यासाठी उत्तेजित करतात, जेणेकरून शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी सतत ऊर्जा मिळत राहील.

डॉ. पल्लेटी रेड्डी यांनी पुढे नमूद केले की, या प्रक्रियेदरम्यान आणखी एक अडचण निर्माण होते. हेच स्ट्रेस हार्मोन्स शरीरातील पेशी आणि स्नायूंना इन्सुलिनचा योग्य वापर करण्यापासून रोखतात. जरी तुमचे स्वादुपिंड नेहमीप्रमाणे पुरेसे इन्सुलिन तयार करत असले, तरी शरीरातील पेशी या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत. परिणामी, स्नायू आणि इतर पेशी रक्तातील साखर शोषून घेऊ शकत नाहीत आणि ही साखर रक्तातच साचून राहते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे रक्तातील साखरेची निर्मिती वेगाने होते, मात्र तिचा वापर मंदावतो; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नेहमीपेक्षा जास्त दिसून येते. या स्थितीला ‘स्ट्रेस हायपरग्लायसेमिया’ (Stress Hyperglycaemia) म्हटले जाते. आयुष्यात कधीही मधुमेह न झालेल्या व्यक्तींमध्येही ही स्थिती दिसून येते.

संसर्गादरम्यान रक्तातील साखर किती वाढू शकते?

संसर्गामुळे रक्तातील साखरेची पातळी नेमकी किती वाढेल, याचा कोणताही एक ठरावीक आकडा किंवा मर्यादा नसते. आजाराचे स्वरूप किती गंभीर आहे, उपचारासाठी कोणती औषधे सुरू आहेत आणि संबंधित व्यक्तीचे चयापचय क्रिया कशी आहे, यावर ही पातळी अवलंबून असते. अगदी किरकोळ आजार असल्यास साखरेची पातळी किंचितशी वाढते; मात्र गंभीर स्वरूपाचा संसर्ग असल्यास ही पातळी वर जाऊ शकते.

डॉ. पल्लेटी रेड्डी यावर अधिक माहिती देताना सांगतात, “अचानक उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे रक्तातील साखर एखाद्या वेळेस जास्त दिसून आली, म्हणजे त्या व्यक्तीला मधुमेह झाल्याचे निदान होत नाही. आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर केलेल्या चाचण्यांमधून परिस्थिती स्पष्ट होऊ शकते.”

आजारपणात वाढलेली साखर तात्पुरती होती की ती शरीरातील एखाद्या गुप्त समस्येचा संकेत आहे, हे जाणून घेण्यासाठी आजारातून बरे झाल्यानंतर ‘उपाशीपोटी केली जाणारी साखरेची तपासणी’ (Fasting Glucose) आणि ‘HbA1c’ या चाचण्या मदत करतात. यामध्ये HbA1c ही चाचणी सर्वांत महत्त्वाची मानली जाते; कारण ती गेल्या २ ते ३ महिन्यांतील साखरेची सरासरी पातळी दाखवत असते आणि तात्पुरत्या आजारपणाचा या चाचणीच्या निकालावर सहसा मोठा परिणाम होत नाही, असेही डॉ. रेड्डी नमूद करतात.