Why Iran doesn’t have nuclear weapons: दोन आठवडे झाले अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर संयुक्त हल्ले केले जात आहे. उभय देशांच्या लष्करी कारवाईत इराणला प्रचंड नुकसानाचा सामना करावा लागत आहे. इराणचा अणु कार्यक्रम कायमचा मोडीत काढणे, त्यांच्याकडील क्षेपणास्त्र नष्ट करणे आणि इराणमध्ये सत्तापालट करणे हे या हल्ल्यामागील काही मुख्य उद्देश आहेत. अमेरिका आणि इस्रायकडून इराणला गुडघ्यावर आणण्याची भाषा केली जात आहे. पण, एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो तो म्हणजे, इराण एवढ्या वर्षात अण्वस्त्रधारी देश का होऊ शकला नाही?
अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला का केला? (Why US-Israel Attacked Iran)
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणवर संयुक्त हल्ला करण्यामागे महत्वाची पाच कारणे असल्याचे सांगितले जाते.
१) इराणचा अणु कार्यक्रम कायमचा मोडीत काढणे – डोनाल्ड ट्रम्प आणि बिन्यामिन नेतान्याहू यांच्या मते इराणकडे अण्वस्त्र असणे जागतिक शांतता आणि विशेषत: इस्रायलच्या अस्तित्वासाठी मोठा धोका आहे. त्यामुळे इराणचा अणु कार्यक्रम कायमचा मोडीत काढणे या हल्ल्यामागील मुख्य उद्देश आहे.
२) इराणची क्षेपणास्त्र नष्ट करणे – इराण प्रगत क्षेपणास्त्र विकसित करत असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे, या हल्ल्यातून इराणची क्षेपणास्त्र नष्ट करणे हा आणखी एक उद्देश आहे.
३) सत्तापालट – अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये या हल्ल्याच्या माध्यमातून सत्तापालट करु पाहत आहे. इराणी जनतेने सरकारविरुद्ध उभे राहून सत्ता हाती घ्यावी असे आवाहन ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी केले आहे.
४) प्रादेशिक गटांवर अंकुश ठेवणे – इराणला पठिंबा असलेल्या प्रादेशिक गटांवर अंकुश ठेवण्याचा अमेरिका आणि इस्रायलचा प्रयत्न आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, गाझामध्ये हमास आणि येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा इराणला पाठिंबा असल्याचा दावा केला जातो. येथून इराणला मिळणारी मदत रोखून या गटांचे जाळे उद्धवस्त करण्याचा अमेरिका आणि इस्रायचा उद्देश आहे.
५) प्रतिबंधात्मक पाऊल – अमेरिका – इस्रायलने इराणविरोधात केलेला हल्ला म्हणजे प्रतिंबंधात्मक पाऊल असल्याचे या विषयातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
इराणला अद्याप अण्वस्त्र का विकसित करता आले नाही? (Iran Nuclear Program History)
इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दबाव तसेच आर्थिक आणि तांत्रिक अडचणींची गुंतागुंत आहे. इराणला ‘ब्रेकआउट’ क्षमतेपर्यंत (अण्वस्त्र बनवण्यासाठी आवश्यक असलेला टप्पा) पोहोचण्यापासून रोखण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
१) आंतरराष्ट्रीय दबाव
संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधाचा इराणला मोठा फटका बसला होता. यामुळे इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या प्रयत्नानांना अडथळा निर्माण होत गेला. २०१५ मध्ये संयुक्त व्यापक कृती आराखड्यांतर्गत (JCPOA) इराणने युरेनियम संवर्धनावर कडक मर्यादा घालण्याचे मान्य केले. तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला (IAEA) तपासणीची परवानगी दिली. यानंतर इराणवर लादण्यात आलेले काही निर्बंध शिथिल करुन दिलासा देण्यात आला.
२) अनेक अडथळे आणि कट-कारस्थान
२०१० मध्ये इराणच्या नतान्झ येथील १००० सेंट्रीफ्यूज सायबर हल्ला करुन नष्ट करण्यात आले. हा हल्ला अमेरिका आणि इस्रायलनेच केल्याचा आरोप केला जातो. इराणच्या अणु कार्यक्रमाचे मुख्य शास्त्रज्ञ मोहसेन फखरीजादेह यांची २०२० मध्ये हत्या करण्यात आली. २०२५ मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने नतान्झ आणि फोर्डो येथे हवाई हल्ले करुन अणु प्रकल्पाच्या ठिकाणांचे नुकसान केले.
३) अयातुल्ला खामेनींचा फतवा
अण्वस्त्रांचा वापर किंवा निर्मिती इस्लामनुसार हराम (निषिद्ध) आहे, असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमात धार्मिक मान्यता हा देखील एक अडथळा आहे, असे मानले जाते.
इराणने अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न केला होता का? (Project AMAD Iran)
इराणने अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न केला होता. यासाठी इराणने १९८९ मध्ये त्यांनी अमद (AMAD) नावाचा एक गुप्त प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाचे तीन महत्वाचे टप्पे होते. यात १० किलोटन क्षमतेची पाच अण्वस्त्रे तयार करणे. यांच्या स्फोटासाठी आवश्यक हाय एक्सप्लोझिव्ह आणि डिटोनेटर्स विकसित करणे आणि इराणकडे असणाऱ्या शहाब – ३ या क्षेपणास्त्रावर त्या बसविण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करणे, असे या प्रकल्पाचे टप्पे होते, अशी माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) अहवालातून समोर आली होती.
इराणने २००३ मध्ये हा प्रकल्प थांबवला पण, २००९ पर्यंत यासाठीचे आवश्यक संशोधन सुरु होते, असे इस्रायलच्या गुप्त तपासातून उघड झाले होते. इराणने मात्र युरेनियम संवर्धनाचेच काम सुरु असल्याचे स्पष्ट केले होते. पण, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने २०१८ मध्ये तेहरानमध्ये केलेल्या एका गुप्त ऑपरशेनवेळी इराणच्या अणु कार्यक्रमाची जवळपास एक लाख कागदपत्रे हाती लागली होती. या अॅटॉमिक आर्काइव्ह म्हटले जाते. यातून इराणच्या गुप्त अमद प्रकल्पाची माहिती समोर आली होती. इराणने मात्र अण्वस्त्र निर्मितीचा दावा फेटाळून लावला.
इराणने अमद प्रकल्प खरचं बंद केला आहे? (What Happened To Project AMAD)
आंतरराष्ट्रीय स्तरावर नजरेत येऊ नये यासाठी इराणने अमद प्रकल्प बंद केल्याची घोषणा केली असली तरी तो पूर्णपणे बंद केला नसल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी इराणने प्रकल्प गुप्त ठेवत त्याची अत्यंत चलाखीने पुनर्रचना केल्याचा दावा माध्यमांतून केला जातो. २०११ मध्ये इराणने ‘ऑर्गनायझेशन ऑफ डिफेन्सिव्ह इनोव्हेशन अँड रिसर्च’ (SPND) या संस्थेची स्थापना केली. अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालीच या संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले जाते. अण्वस्त्र निर्मितीच्या गुप्त प्रकल्पाचे काम २००३ नंतर याच संस्थेकडे सोपवल्याचा दावा केला जातो.
