Why Iran Reject Second Round of Talks With US : पश्चिम आशियातील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता दोन्ही देशांचे शिष्टमंडळ आज इस्लामाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्याआधीच वाटाघाटीच्या काही मुद्द्यांवरून इराणने चर्चेला नकार दिल्याचे वृत्त तेथील सरकारी माध्यमांनी दिले आहे. युद्धविराम संपण्याच्या काही तास आधीच ही घडामोड घडल्याने पश्चिम आशियात पुन्हा एकदा संघर्षाचा वणवा पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्याविषयीचा हा आढावा…
इराणबरोबरचा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने चर्चेची दुसरी फेरी पार पाडण्यासाठी अमेरिकेने आपले उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवण्याची घोषणा केली होती. या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील पथक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्यासोबत अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर हेदेखील बैठकीला हजर राहणार होते. त्याआधीच अमेरिकेने घालून दिलेल्या काही अटींवरून इराणने या चर्चेला नकार दिल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. या घडामोडीमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता असल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाकिस्तानमध्ये बैठकीची जोरदार तयारी
इराण व अमेरिका यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी फिस्कटल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले असले तरीही पाकिस्तानमध्ये मात्र या बैठकीसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेची मोठी लष्करी मालवाहू विमाने इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. या विमानातून आणण्यात आलेली विशेष वाहने अमेरिकन प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी वापरली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याआधीच्या चर्चेचे ठिकाण असलेले सेरेना हॉटेल रिकामे करण्यात आले असून परिसरात काटेरी तारांचे कुंपण उभारण्यात आले आहे. या सर्व तयारीनंतरही इराणने अद्याप चर्चेत सहभागी होण्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, अमेरिकेच्या दबावतंत्राच्या धोरणांमुळे इराणने सध्याच्या परिस्थितीत चर्चा पुन्हा सुरू करण्यास नकार दिला आहे.
आणखी वाचा : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्ध? पश्चिम आशियात ५०,००० सैनिकांचा फौजफाटा; नक्की काय घडतंय?
अमेरिकेकडून लष्कराची मोठी जमवाजमव
२२ एप्रिल रोजी अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम संपत असतानाच अमेरिकेने पश्चिम आशियात आपल्या लष्करी उपस्थितीत मोठी वाढ केल्याचे दिसून येत आहे. ८ एप्रिल रोजी युद्धविराम सुरू झाल्यापासून अमेरिकेने या भागात आपले सैन्यबळ वाढवले असून, यामुळे शांतता प्रक्रियेवर संशयाचे ढग दाटले आहेत. ‘वॉल स्ट्रीट जर्नल आणि लाईव्ह नाऊ फॉक्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेने पश्चिम आशियात ५०,००० हून अधिक सैन्याचा फौजफाटा तैनात केला आहे, त्यामध्ये जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांचाही समावेश आहे. अमेरिकेने युद्धविरामाच्या काळात इतकी मोठी लष्करी हालचाल करणे हे इराणसाठी एक प्रकारचे दडपण मानले जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केल्यामुळे दोन्ही देशांमधील विश्वास पूर्णपणे उडाला असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिका-इराणमध्ये वाद कशामुळे?
अमेरिका व इराण यांच्यातील वादाच्या केंद्रस्थानी इराणचा अणु कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे. याआधीच्या बैठकीपूर्वी इराण आपल्याकडील असलेला युरेनियमचा साठा अमेरिकेच्या स्वाधीन करण्यास तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, इराणच्या अधिकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. इराणकडे सध्या ६० टक्क्यांपर्यंत समृद्ध केलेले सुमारे ४०० किलो युरेनियम असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांची चिंता वाढली आहे. याआधीच्या चर्चांमध्ये अमेरिकेने हा साठा हस्तांतरित करण्याच्या बदल्यात इराणला आर्थिक सवलती देण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्यात इराणची गोठवलेली मालमत्ता मोकळी करण्याचाही समावेश होता.
इराणची नेमकी मागणी काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, इराणने २० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक निर्बंध सवलतीची मागणी केली आहे. मात्र, या मुद्द्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. याशिवाय, इराणने युरेनियम समृद्धीकरण किती काळ थांबवावे, हा आणखी एक वादाचा मुद्दा आहे. अमेरिकेने त्यासाठी सुमारे २० वर्षांचा दीर्घ कालावधी सुचवला आहे. त्याउलट, इराणने केवळ ५ वर्षांचा कालावधी प्रस्तावित केला असून तो अपुरा असल्याचे अमेरिकेचे मत आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे. “इराणने आपल्या अण्वस्त्र अधिकारांचा वापर करू नये असे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात; पण कोणत्या गुन्ह्यासाठी? एखाद्या राष्ट्राला त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवणारे ते कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : अमीर हमजाचा खेळ खल्लास? पाकिस्तानमध्ये घबराट… भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?
होर्मुझ सामुद्रधुनी कळीचा मुद्दा
जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दाही अमेरिका-इराण यांच्या वादातील केंद्रबिंदू ठरताना दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांत महत्त्वाच्या जलमार्गातून होणाऱ्या वाहतुकीला वारंवार अडथळे निर्माण झाले आहेत. सुरुवातीला इराणने हा मार्ग काही काळ बंद ठेवल्यानंतर तो पुन्हा खुला करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे खनिज तेलाची आयात करणाऱ्या जगभरातील अनेक देशांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अमेरिकेने इराणच्या बंदरांवर सुरू ठेवलेली नाकेबंदी पाहता, तेहरानने आपला पवित्रा बदलला आणि पुन्हा सागरी वाहतुकीवर निर्बंध लादले. जोपर्यंत अमेरिका आमच्या अटी मान्य करीत नाही, तोपर्यंत या जलमार्गावरील वाहतूक बंदच राहील, असा इशारा इराणने दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाल्याने अनेक देशांत खनिज तेलासह नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा जाणवत आहे.
अमेरिका-इराणच्या चर्चेचे पुढे काय?
अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटीच्या पहिल्या बैठकीत काही प्रमाणात प्रगती झाल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले होते, त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष आता दुसऱ्या बैठकीकडे लागून आहे. त्याआधीच अमेरिकेने घालून दिलेल्या अटी इराणने अमान्य करीत चर्चेला नकार दिल्याचे सांगितले जात आहे. युद्धविराम संपण्याच्या काही तास आधीच ही घडामोड घडल्याने पश्चिम आशियात पुन्हा एकदा संघर्षाचा वणवा पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या युरोपियन मित्रराष्ट्रांनीदेखील या चर्चेच्या दिशेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेला घाईघाईने करार करायचा आहे, परंतु तांत्रिक आणि राजकीय आव्हाने न सुटल्यास हा प्रश्न अधिक काळ रेंगाळण्याची भीती तेथील नेत्यांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात २२ एप्रिल रोजी बैठक होणार की वाटाघाटी पुन्हा फिस्कटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
