Why Iran Supreme Leader Ayatollah Ali Khamenei Funeral Delay : २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या घटनांमुळे संपूर्ण पश्चिम आशिया रक्तरंजित संघर्षाच्या खाईत लोटला गेला आणि जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान युद्धाला सुरुवात होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही ८६ वर्षीय खामेनी यांच्या मृतदेहाचा दफन विधी अद्याप झालेला नाही. या प्रकरणावर इराण सरकारने अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. अंत्यविधीसाठी लागणारा वेळ आणि त्याभोवती असलेले कमालीचे गुप्ततेचे वलय, यांमुळे जागतिक स्तरावर अनेक कयास बांधले जात आहेत, त्याविषयीचा हा आढावा…

अमेरिका-इस्रायलने फेब्रुवारीच्या अखेरीस इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केली होती. दोन्ही देशांनी पहिल्याच दिवशी केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केले होते. अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यांना इराणकडूनही जोरदार प्रत्त्युतर आल्याने पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला. खामेनी यांनी इराणवर जवळपास तीन दशके राज्य केले होते. निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी होत असलेल्या विलंबाने इराणी जनतेला हेलावून टाकले आहे.

खामेनी यांचा अंत्यविधी का रडखडला?

माजी सर्वोच्च नेत्याचे दफन नेमके कुठे करायचे, याची जागा अद्याप निश्चित झाली नसल्याचे इराणच्या ‘अस्तान कुड्स रझवी’ या संस्थेने शनिवारी जागतिक माध्यमांना सांगितले आहे. तुर्कमेनिस्तानच्या सीमेवर असलेले मशहद हे खामेनी यांचे मूळ गाव आहे. कुटुंबातील इतर धर्मगुरूंप्रमाणेच त्यांनीही मशहदमधील धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते पवित्र शहर कोम येथे स्थलांतरित झाले होते. खामेनी यांच्यावर अद्याप दफन विधी न होण्यामागे विविध कारणे असल्याचे समोर येत आहे. सुरक्षा धोक्यांची भीती हे त्यातील प्रमुख कारण असल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी लाखो लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच गर्दीचा गैरफायदा घेऊन काही संघटना विद्यमान सरकारविरोधी रस्त्यावर आंदोलने करू शकतात. या वर्षीच्या सुरुवातीला इराणने मोठ्या जनक्षोभाचा सामना केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, याची खबरदारी तेथील प्रशासनाकडून घेतली जात आहे.

आणखी वाचा : २२ एप्रिलनंतर पुन्हा युद्ध? अमेरिकेशी चर्चा करण्यास इराणचा नकार; पाकिस्तानची मध्यस्थी निष्फळ?

इराणला नेमकी कशाची भीती?

सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र व इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी महिनाभरापासून सार्वजनिकरीत्या दिसलेले नाहीत. वडिलांच्या अंत्यसंस्काराला ते गैरहजर राहिल्यास जगाला काय उत्तर द्यायचे, हा मोठा पेच इराणी प्रशासनासमोर असल्याचे विविध माध्यमांनी म्हटले आहे. १९८९ मध्ये अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये जगातील सर्वांत मोठा अंत्यविधी सोहळा पार पडला होता. मात्र, त्यांच्या वारसदारावर महिनाभरानंतरही अंत्यसंस्कार न होणे इराणचे मोठे अपयश मानले जात आहे. खामेनी यांच्या दफन विधीबाबत अनेक तर्क-वितर्क केले जात असल्याने ५० दिवसांपासून इराणमध्ये इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. अमेरिकेबरोबरचा युद्धविराम २२ एप्रिलला संपत असल्यामुळे अशा तणावाच्या परिस्थितीत मोठा अंत्यविधी सोहळा आयोजित करणे इराणसाठी धोकादायक बाब ठरू शकते. कारण- अंत्यसंस्काराच्या वेळी अमेरिकेसह इस्रायकडून पुन्हा हवाई हल्ले केले जाऊ शकतात, अशी भीती इराणला सतावत आहे.

खामेनी यांच्या दफन विधीला उशीर का?

जागतिक माध्यमांच्या दाव्यानुसार, इराणने खामेनी यांच्या मृतदेह मशहद येथील ‘इमाम रेझा’ या पवित्र दर्ग्याजवळ दफन करण्याची योजना आखली आहे. नवव्या शतकातील हा दर्गा शिया मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या ठिकाणी आधीच कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने खामेनी कबरीला संरक्षण देणे सोपे जाईल, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. इराणला खामेनी यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम यापूर्वीही पुढे ढकलावा लागला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच इराणने तीन दिवसांचा अधिकृत अंत्यविधी सोहळा आयोजित केला होता; परंतु अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांमुळे दफन विधी पुढे ढकलण्यात आला, असे इराण इंटरनॅशनल न्यूजने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

हेही वाचा : महिला आरक्षणाचा डाव नेमका कशासाठी होता? भाजपाला काय साधायचे होते? सुहास पळशीकर यांचे विश्लेषण

खामेनी यांचा दफन विधी कुठे?

इराणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी लाखो लोकांनी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या जनसमुदायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था तयार करण्यासाठी वेळ लागणार आहे. खामेनी यांच्यावर अंत्यविधी नेमका कधी आणि कुठे होणार हे अद्याप ठरलेले नाही. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूला ४० दिवस झाल्यानंतर इराणमध्ये ९ एप्रिल रोजी स्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लाखो इराणी नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली होती. इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील गोर्गान, वायव्येकडील उर्मिया आणि राजधानी तेहरान यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये त्यावेळी हजारो नागरिक खामेनी यांचे फोटो घेऊन रस्त्यावर उतरले होते. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमालाही इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी उपस्थित नव्हते. त्यांची प्रकृती खराब असल्याचे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.