US Target Iran’s Kharg Island Infrastructure Amid Escalating Middle East conflict: इराण युद्धाला १५ दिवस होत आले आहेत. या १५ दिवसांत युद्धाचे चटके फक्त इराणलाच नाही तर आखाती देशांसह संपूर्ण जगाला काही प्रमाणात बसत आहेत. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. शुक्रवारी त्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने इराणचा मुकुटमणी (क्राउन ज्युल) असलेल्या खर्ग बेटावर मोठा हल्ला केला. तसेच यापुढे बेटावरील तेल प्रकल्पांना यापुढे लक्ष्य करू, असाही इशारा त्यांनी दिला. हे बेट इराणच्या तेल उत्पादन साखळीतील एक महत्त्वाचे केंद्र आहे. इराणच्या एकूण तेल निर्यातीचे व्यवस्थापन करण्यात या बेटाचा महत्त्वाचा वाटा आहे. अमेरिकेने या बेटाला लक्ष्य केल्यामुळे आता इराणकडून त्याची प्रतिक्रिया कशी उमटते? युद्धात यामुळे आणखी तेल ओतले जाणार का? हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.

अमेरिकन लष्कराने इराणच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खर्ग बेटावर शक्तीशाली बॉम्ब हल्ला केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. या बेटावरील लष्करी आस्थापनांना उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. यापुढे इराणच्या महत्त्वाच्या तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकन लष्कर आज इराणवर सर्वात शक्तीशाली हल्ले केले जातील, असे विधान केल्याच्या काही तासांनी हा हल्ला करण्यात आला आहे.

हल्ल्यांतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, हा हल्ला या भागात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली लष्करी कारवायांपैकी एक होता. “काही वेळेपूर्वी, माझ्या आदेशानुसार, युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने मध्य पूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बहल्ल्यांपैकी एक हल्ला केला असून इराणचे ‘क्राउन ज्युल’ मानल्या जाणाऱ्या खर्ग बेटावरील लष्करी सुविधा पूर्णपणे नष्ट केल्या,” असे ट्रम्प यांनी सांगितले.

us donald trump truth post about kharg attack
डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथवरील पोस्ट

“सभ्यतेच्या कारणास्तव, मी या बेटावरील तेलासंबंधी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे , मात्र, जर इराण किंवा इतर कोणी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या मुक्त आणि सुरक्षित पॅसेजमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी काहीही केले तर मी तात्काळ या निर्णयाचा फेरविचार करेन,” असे ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले.

इराणचे प्रत्युत्तर

या हल्ल्यानंतर इराणच्या सशस्त्र दलाने प्रत्युत्तर दिले आहे. तेल आणि ऊर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला झाल्यास आखाती प्रदेशातील अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या तेल कंपन्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर केले जातील, अशा इशारा इराणी सशस्त्र दलाने दिला आहे.

अमेरिकेच्या हल्ल्याचा व्हिडीओ

खर्ग बेट कुठे आहे?

होर्मुझ सामुद्रधुनीच्या वायव्येस ३०० मैल (४८३ किमी) आणि इराणाच्या किनाऱ्यापासून १६ मैल (२६ किमी) अंतरावर खर्ग बेट स्थित आहे. इराणच्या तेल निर्यातीचे ते एक्सपोर्ट टर्मिनल म्हणून ओळखले जाते. इराणची ९० टक्के तेलवाहू जहाज इथूनच जातात. लक्षद्वीपच्या एकत्रित बेटापेक्षा लहान असलेले हे बेट इराणच्या तेल उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण आहे.

इराणी हल्ल्यांच्या भीतीमुळे इतर आखाती देशांनी तेल निर्यात थांबवली असली तरी इराणने मात्र तेलाची निर्यात सुरूच ठेवली आहे. टँकरट्रकर्सने उपग्रह फोटो प्रसिद्ध केले असून त्यात खर्ग बेटावर तेलाचे अनेक टँकर भरलेले असल्याचे दिसून आले. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युद्ध सुरू झाले. तेव्हापासून बुधवारपर्यंत (दि. ११ मार्च) इराणने दररोज १.१ ते १.५ दशलक्ष बॅरल तेल निर्यात केल्याची माहिती मिळत आहे.

खर्ग बेट इराणसाठी महत्त्वाचे का?

इराणसाठी खर्ग बेट धोरणात्मकदृष्ट्या अतिमहत्त्वाचे आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने १९८४ सालच्या एका गुप्त अहवालात खर्ग बेट इराणच्या पेट्रोलियम व्यवस्थेचा कणा असल्याचे म्हटले होते. इराणची अर्थव्यवस्था आणि इराकविरोधातील युद्ध मोहिमेसाठी हे अनन्यसाधारण बेट असल्याचे अमेरिकेचे निरीक्षण आहे.

खर्ग बेटावर तेल साठविण्याची प्रचंड क्षमता आहे. या बेटाला समुद्रमार्गे पाईपलाईनद्वारे तेल आणि वायू प्रकल्पांना जोडण्यात आलेले आहे. अल जझीराने इराणच्या पेट्रोलियम मंत्रालयाचा हवाला देऊन वृत्त दिले की, खर्ग बेटावर कच्चे तेल काढण्यात येणारे अबूझर, फोरोझान आणि डोरूड हे तीन मोठे ऑफशोअर फिल्ड आहेत. येथून कच्चे तेल पाण्याखालील पाइपलाईनद्वारे बेटावरील प्रक्रिया प्रकल्पात पाठवले जाते. तिथून त्याची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होते.

इराणच्या पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे चालविल्या जाणाऱ्या तीन प्रमुख ऊर्जा सुविधाही याच बेटावर आहेत. त्यापैकी एक असलेली फलत इराण ऑइल कंपनी दररोज पाच लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करते. देशातील प्रमुख चार तेल शुद्धीकरण प्रकल्पापैकी ही एक मानली जाते, असे वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.

खर्गवरील हल्ल्याचा अर्थ काय?

अमेरिकेने खर्गला लक्ष्य केल्यामुळे जागतिक स्तरावरील तेलाच्या किंमती भडकू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या बेटावरील नागरी सुविधांवर हल्ला किंवा बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यात जागतिक पातळीवर तेलाच्या किमती वाढू शकतात, असा अंदाज आहे. सेंटर फॉर मेरीटाईम स्ट्रॅटेजीमधील नौदलतज्ज्ञ स्टीव्हन विल्स यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या माहितीनुसार, जर हे बेट नष्ट केले किंवा ताब्यात घेतले तर इराणच्या तेल निर्यातीला मोठा धक्का बसू शकतो. कारण या बेटावरच त्यांची अर्थव्यवस्था तगली आहे.