-संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुखापतग्रस्त असतानाही कर्णधार रोहित शर्माने केलेली आक्रमक अर्धशतकी खेळी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला तारू शकली नाही. भारताने या मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत निराशाजनक कामगिरी केली आणि मालिकाही गमावली. भारताचे आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक पाहता संघ व्यवस्थापनासमोर या मालिका पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनुभवी खेळाडू संघात असतानाही भारताला तुलनेने दुबळ्या बांगलादेशने पराभूत केले. संघात करण्यात आलेले प्रयोगही यावेळी यशस्वी झाले नाही. भारताच्या अपयशाला कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सदोष योजनाही कारणीभूत आहे.

सलामीचा तोडगा कधी निघणार?

भारताकडे सलामीच्या फलंदाजांसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. शिखर धवन आता भारतासाठी केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळतो. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यास धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात येते, मात्र नजीकच्या काळात त्याचे सलामीचे जोडीदार बदलल्याचे पाहायला मिळते आहे. शिखर आणि रोहित शर्मा ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताची सलामीची प्रमुख जोडी म्हणून ओळखली जाते. पण गेल्या काही काळापासून दोन्ही फलंदाजांची लय ही संघासाठी चिंतेचा विषय ठरते आहे. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यातील अर्धशतक वगळल्यास रोहितला मोठ्या धावा करता आलेल्या नाहीत. सलामीवीर अपयशी ठरल्यास मधल्या फळीवर दडपण येते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंसाठी पर्याय असणे संघात गरजेचे आहे. शुभमन गिलने न्यूझीलंड दौऱ्यात धवनसह संघाला चांगली सुरुवात दिली होती, पण बांगलादेश दौऱ्यासाठी त्याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले नाही. ऋतुराज गायकवाडची लय पाहता येणाऱ्या काळात त्याचा सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो. विश्वचषकाला आता वर्षभराहूनही कमी कालावधी शिल्लक असल्याने भारताने लवकरात लवकर सलामीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

मधल्या फळीतील गर्दी संघाला घातक ठरत आहेत का?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजीला येतो. त्यासह विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरतात. अय्यरने गेल्या काही काळात आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यातही अय्यरने अर्धशतकी खेळी साकारली. विराटची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील लय चांगली आहे, पण गेल्या काही काळापासून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारसा भाग घेतलेला नाही. बांगलादेशच्या दोन्ही सामन्यांतही तो अपयशी ठरला. यासह भारताकडे सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांचा पर्यायही उपलब्ध असल्याने भारताला अंतिम संघ निश्चित करताना  बराच विचार करावा लागत आहे. पर्याय अनंत पण परिणामकारक एकही ठरत नाही, अशी भारतीय संघाची अवस्था आहे. 

यष्टीरक्षणाचे पर्याय असूनही राहुलवर जबाबदारी का?

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या मालिकेत ऋषभ पंतचाही संघात समावेश होता, पण दुखापतीमुळे त्याला मालिकेला मुकावे लागले. असे असले तरी इशान किशन संघात आहे, पण त्याला अंतिम ११मध्ये स्थान दिले जात नाही. संजू सॅमसनला या मालिकेसाठी संघात स्थानच मिळालेले नाही. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत किशन आणि सॅमसनने संघासाठी निर्णायक खेळी केल्या होत्या, मात्र त्यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने निवड समितीच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले. पंतला व्यवस्थापनाकडून अनेक संधी देण्यात आल्या, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरतो. तसेच राहुलही मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत नाही. त्याचे यष्टिरक्षणही सदोष आहे.

अष्टपैलूंकडून सातत्याने निराशा?

रवींद्र जडेजा जायबंदी झाल्यानंतर भारताला अष्टपैलूंची कमतरता जाणवली, मात्र त्याच्या अनुपस्थितीत निर्माण झालेल्या पर्यायांमुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात शाहबाझ अहमदला संधी देण्यात आली, मात्र त्याने फारसे योगदान दिले नाही. दुसऱ्या सामन्यात त्याच्याऐवजी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले. त्याने गोलंदाजीत चमक दाखवली नसली तरी फलंदाजीत अर्धशतक झळकावले. वॉशिंग्टन सुंदरने दोन्ही सामन्यांत चांगली गोलंदाजी केली, पण तो फलंदाजीत चमक दाखवू शकला नाही. या तीन पर्यायांमुळे यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचे स्थान धोक्यात आले आहे. हार्दिक पंड्या संघात नसल्याने शार्दुल ठाकूरला स्थान मिळाले आहे, पण त्याला चुणूक दाखवता आली नाही. दीपक चहरही फलंदाजीत योगदान देऊ शकतो. त्यामुळे अंतिम ११मध्ये कोणाला स्थान द्यायचे ही संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी आहे.

जलदगती गोलंदाजांमध्ये निवडीचा पेच कायम?

बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांत भारताने वेगवान गोलंदाजीचे पर्याय अजमावले. पहिल्या सामन्यात कुलदीप सेनला पदार्पणाची संधी मिळाली, त्याने दोन बळीही मिळवले, मात्र दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले. या लढतीत उमरान मलिकला अंतिम ११मध्ये स्थान मिळाले. भारताच्या या गोलंदाजी फळीचे नेतृत्व मोहम्मद सिराज करताना दिसला. दीपक चहरलाही चमक दाखवता आली नाही. अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी धावा दिल्या. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त असल्याने ते संघात नाहीत, मात्र त्यांचे पुनरागमन झाल्यानंतर इतर गोलंदाजांचा वापर कसा करायचा याची योजना संघाकडे तयार दिसत नाही.

खेळाडूंच्या कार्यभार व्यवस्थापनाचे धोरण संघासाठी अडचणीचे?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यभार व्यवस्थापन धोरणाअंतर्गत प्रमुख खेळाडूंना व्यस्त कार्यक्रमामुळे अधूनमधून विश्रांती देण्यात येते, मात्र या योजनेमुळेच संघ अडचणीत सापडताना दिसत आहे. बांगलादेश दौऱ्यात हार्दिक पंड्या, शुभमन गिल, संजू सॅमसन यांना संघात स्थान देण्यात आले नाही. काही खेळाडू याआधीच दुखापतग्रस्त असल्याने ते संघात नाही. त्यातच आता रोहित शर्माची भर पडली आहे. त्यामुळे तिघांनाही विश्रांती देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहे.

रोहितच्या नेतृत्वातील चुका महागात?

मुंबई इंडियन्सला पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली, त्यावेळी त्याच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, मात्र या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने हा सामना १० गडी राखून जिंकला होता. त्यामुळे रोहितवर बरीच टीका झाली. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही गोलंदाजांचा योग्य वापर करण्यात रोहित चुकतो आहे. तसेच संयमी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा रोहित आता क्षेत्ररक्षकाने चूक केली किंवा गोलंदाजाने अपेक्षित कामगिरी न केल्यास त्यांच्यावर ओरडताना दिसतो. त्याची देहबोली बदलते. त्यामुळे खेळाडूंना नक्कीच दडपण जाणवते. त्यामुळे आता रोहितच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करणे गरजेचे झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is team india consistently failing is rohit sharma captaincy to blame print exp scsg
First published on: 09-12-2022 at 10:12 IST