विश्लेषण : क्रेडिट सुईस – यूबीएसमधील कराराला इतके महत्त्व का?

अमेरिकेतील दोन बँकांनी आठवडाभराच्या अवधीत दिवाळखोरी जाहीर केली

Why is the Credit Suisse-UBS deal so important? Print
वाचा सविस्तर विश्लेषण

गौरव मुठे

अमेरिकेतील दोन बँकांनी आठवडाभराच्या अवधीत दिवाळखोरी जाहीर केली. त्यापाठोपाठ स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेली क्रेडिट सुईस संकटग्रस्त झाल्याने जागतिक वित्तीय क्षेत्राला धक्का बसला. या १६७ वर्ष जुन्या संस्थेचा समभाग विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने जगभरातील बँकिंग जगताला हादरा बसला आणि जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीमुळे २००८ प्रमाणेच आर्थिक अरिष्ट निर्माण होते की काय असा प्रश्न अनेकांना पडला.

या ऐतिहासिक कराराला इतके महत्त्व का?

स्वित्झर्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आणि जागतिक पातळीवर आघाडीच्या ३० वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या यूबीएसने क्रेडिट सुईस खरेदी करण्याचा करार पुढे आणला आहे. स्विस नियामकांमध्ये आपत्कालीन चर्चा झाल्यानंतर, यूबीएसने दीर्घकालीन प्रतिस्पर्धी क्रेडिट सुईला सुमारे ३२५ कोटी डॉलर म्हणजेच २६,८०५ कोटी रुपयांना खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. वित्त क्षेत्रात्रा डळमळलेला आत्मविश्वास पुनःस्थापित करण्याचा आणि अर्थव्यवस्थेशी निगडित जोखीम व्यवस्थापित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे स्विस नॅशनल बँकेने म्हटले. एका अशांत आणि अस्थिर आठवड्यानंतर पुढे आलेला निर्णय अपेक्षित दिलाशाचे वातावरण निर्माण करण्याची अपेक्षा केली जात आहे.

दिलासा मिळण्याऐवजी प्रत्यक्षात अस्वस्थता वाढल्याचे का दिसून येते?

अलिकडच्या काही वर्षांत क्रेडिट सुईसला अनेक वाद आणि घोटाळ्यांचा फटका बसला आहे, ज्यामुळे जागतिक पातळीवर तिची विश्वासार्हता प्रभावित झाली आहे. अमेरिकी बँकबुडीनंतर, भांडवली बाजारात समभागात झालेल्या लक्षणीय घसरणीने क्रेडिट सुईसवरील संकटही पटलावर आले. ते थोपवण्यासाठी आणि एकंदर अस्वस्थतेला तात्पुरते शमवण्यासाठी स्विस सरकारने यूबीएसला ही संकटग्रस्त बँक तडकाफडकी विलीन करून घेण्यास भाग पाडले असा विश्लेषक आणि गुंतवणूकदारांचा होरा आहे. या करारानुसार, यूबीएस क्रेडिट सुईसच्‍या प्रत्येक समभागासाठी त्यांचे ०.७६ टक्के समभाग देईल. ही देऊ केलेली किंमत वाजवी मूल्यांकनाला धरून नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. क्रेडिट सुईसच्या समभागांत सुरू राहिलेल्या तीव्र घसरणीनेही याचा प्रत्यय दिला.

एएफपीच्या या संस्थेच्या अहवालानुसार, या अधिग्रहणासाठी भागधारकांच्या मंजुरीची आवश्यकता भासणार नाही. शिवाय देशातील दोन सर्वात मोठ्या बँकांमधील अपवादात्मक विलीनीकरणाबद्दल स्पर्धा आयोगाचा देखील कोणताही हस्तक्षेप असणार नाही. स्विस नॅशनल बँकेने १०० अब्ज स्विस फ्रँकपर्यंत कर्ज देण्यास सहमती आणि हा करार पूर्णत्वाला नेण्यासाठी यूबीएसला आर्थिक सहाय्य देण्याचे मान्य केले. शिवाय, स्विस फायनान्शियल मार्केट सुपरवायझरी ऑथॉरिटीने (फिनमा) देखील हा करार सुलभ करण्यासाठी १७ अब्ज डॉलर मूल्याचे क्रेडिट सुईसच्या रोख्यांची जबाबदारी घेतली आहे.

बँकेच्या ग्राहकांसाठी याचा अर्थ काय?

क्रेडिट सुईसच्या सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहतील. शिवाय यामुळे ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण सुनिश्चित होईल. कारण बँक खाती आणि इतर सेवा (काउंटर, एटीएम, ई-बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड) नेहमीप्रमाणेच कार्यरत राहतील, असे फिनमाने एका निवेदनात म्हटले आहे.

करार एका बाजूने झुकलेला आहे का?

हा अधिग्रहण करार म्हणजे एका बँकेचा अंत करणारा आणि दुसऱ्याची ताकद वाढवणारा असल्याचे चित्र आहे. १८५६ मध्ये क्रेडिट सुईसची स्थापना झाली आणि स्वित्झर्लंडच्या वित्तीय क्षेत्रात एक दिग्गज संस्था बनून ती पुढे आली. यूबीएस समूह ज्याला पूर्वी बँक इन विंटरथर म्हणून ओळखले जात असे, तिची १८६२ मध्ये स्थापना करण्यात आली आणि नंतर विलीनीकरणाच्या माध्यमातून ती यूबीएस बनली. या दोन संस्था जागतिक बँकिंग जगतात दिग्गज बनल्या. २००८ च्या आर्थिक संकटात संपूर्ण बँकिंग क्षेत्रावर गंभीर परिणाम झाले. यूबीएसने संकटातून पुनरुत्थान साधले, मात्र क्रेडिट सुईसला मोठा संघर्ष करावा लागला आणि अनेक आघाड्यांवर पराभवदेखील स्वीकारावा लागला.

उभयतांच्या विलिनीकरणाचा करार घाईघाईने झालेल्या चर्चेअंती पुढे आला. हा करार पूर्णत्वास जाईल याबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत, दोन्ही बाजूंना खात्री नव्हती. सुरुवातीला यूबीएसने क्रेडिट सुईसला अंदाजे १ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, क्रेडिट सुईसच्या संचालक मंडळाने हा करार नाकारला होता आणि तिच्या गृहनिर्माण कंपनीचेच (रिअल इस्टेट होल्डिंग) मूल्य तेवढे असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र अखेर पूर्णत्वास गेलेले हे अधिग्रहण २०२३ च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यादरम्यान, यूबीएस तिचा पुनर्रचना कार्यक्रम लागू करेल.

कराराबाबत जागतिक स्तरावरील प्रतिक्रिया काय?

यूबीएसने क्रेडिट सुईस ताब्यात घेतल्याने एक बँकिंग कंपनी निर्माण होईल. यूबीएसचे अध्यक्ष कोल्म केल्हेर यांनी म्हटल्याप्रमाणे, दोन्ही बँकांच्या संयोजनामुळे बाजारपेठेत ५ लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक असलेली आघाडीची जागतिक संपत्ती व्यवस्थापक म्हणून यूबीएसचे स्थान आणखी मजबूत होईल. शिवाय स्वित्झर्लंडमधील आघाडीची ‘सर्वंकष (युनिव्हर्सल) बँक’ म्हणून यूबीएसचे स्थान मजबूत करेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्विस जागतिक बँक म्हणून ती दमदार मार्गक्रमण करेल.

दोन्हींच्या व्यवसायांच्या संमिश्रणामुळे, २०२७ पर्यंत वार्षिक ८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च कपात अपेक्षित आहे. करारानुसार, केल्हेर आणि यूबीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राल्फ हॅमर्स यांच्या एकत्रित संस्थेत भूमिका कायम असतील. क्रेडिट सुईसचे अधिग्रहण यूबीएसच्या भागधारकांसाठी आकर्षक आहे, असे केल्हेर म्हणाले. क्रेडिट सुईस केवळ स्वित्झर्लंडसाठी नव्हे तर आमच्या कंपन्यांसाठी, खासगी ग्राहकांसाठी, त्यांच्या स्वत:च्या कर्मचार्‍यांसाठीच नाही तर संपूर्ण आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेसाठी देखील निर्णायक आहे, अशी स्विस संघराज्य परिषदेचीही भावना आहे.

अर्थमंत्री कॅरिन केलर-सटर म्हणाले की, क्रेडिट सुईसच्या दिवाळखोरीमुळे मोठी आर्थिक उलथापालथ होऊ शकते. म्हणूनच स्वित्झर्लंडला स्वतःच्या सीमेपलीकडे जबाबदारी घ्यावी लागेल. क्रेडिट सुईसच्या अधिग्रहणाने स्वित्झर्लंडने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरता राखण्यास योगदान दिले आहे. तर क्रेडिट सुईसचे अध्यक्ष, एक्सेल लेहमन यांच्या मते, हा दिवस त्यांच्या बँकेसाठी ऐतिहासिक, दुःखद आणि अत्यंत आव्हानात्मक आहे. अलीकडील विलक्षण आणि अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेता विलीनीकरण हा एकमेव सर्वोत्तम मार्ग होता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

कराराचा अधिक फायदा कोणाला?

यूबीएस या कराराची सर्वात मोठी लाभार्थी निश्चितच आहे, तर क्रेडिट सुईसला नाईलाजास्तव हे पाऊल उचलावे लागले. या कराराचा क्रेडिट सुईसच्या कर्मचाऱ्यांना फटका बसेल अशी अपेक्षा आहे. यूबीएसचा क्रेडिट सुईसचा गुंतवणूक बँकिंग व्यवसाय कमी करण्याचा मानस आहे, असे केल्हेर यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच क्रेडिट सुईसच्या नोकऱ्यांमध्ये देखील कपात करण्याच्या पावलांना यूबीएसच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:28 IST
Next Story
विश्लेषण : ‘एलजीबीटीक्यू’ ओळखही युगांडात अवैध?
Exit mobile version