scorecardresearch

Premium

विश्लेषण : पन्नाशीच्या आतील व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका का वाढतोय?

जगभरात पन्नाशीच्या आतील व्यक्तींना कर्करोग होण्याचा धोका तीन दशकांत तब्बल ८० टक्क्यांनी वाढला आहे. बदलती जीवनशैली, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि स्थूलता ही यामागे प्रमुख कारणे असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

risk of cancer, cancer increasing in people under the age of 50
विश्लेषण : पन्नाशीच्या आतील व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका का वाढतोय? (संग्रहित छायाचित्र)

जगभरात पन्नाशीच्या आतील व्यक्तींना कर्करोग होण्याचा धोका तीन दशकांत तब्बल ८० टक्क्यांनी वाढला आहे. बदलती जीवनशैली, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि स्थूलता ही यामागे प्रमुख कारणे असल्याचा संशोधकांचा दावा आहे. याचबरोबर निकृष्ट आहार, मद्यसेवन आणि तंबाखूसेवन हे घटक त्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

नेमके संशोधन काय?

स्कॉटलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरो आणि चीनमधील हांगझू येथील झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन यांनी एक संशोधन केले आहे. ‘बीएमजे ऑन्कोलॉज’ या संशोधन पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. याआधी कर्करोगाचे प्रमाण वाढण्यावर संशोधन झाले होते. त्यातही पन्नाशीच्या आतील व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका वाढू लागल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. परंतु, जागतिक स्तरावर व्यापक असे संशोधन आता पहिल्यांदाच झाले आहे. विशेषत: यात तरुणांमध्ये वाढलेला कर्करोगाचा धोका तपासण्यात आला आहे. आधीचे संशोधन हे प्रादेशिक अथवा एका देशापुरते मर्यादित होते. त्याला जागतिक स्वरूप नव्हते. आताच्या संशोधनात २०४ देशांमधील २९ प्रकारच्या कर्करोगांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यात १९९० ते २०१९ या कालावधीत १४ ते ४९ वयोगटातील नवीन रुग्ण, मृत्यू, आरोग्यावरील परिणाम आणि इतर धोके यांचा अभ्यास करण्यात आला.

Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
insects pune
पुणे : नदीपात्रात घोंघावणारे कीटक नेमके कोणते? महापालिकेकडे माहितीच नाही; आरोग्य विभागाला नमुने घेण्याचाही विसर
Rajyog In Kundli
२०० वर्षांनी शशसह ३ राजयोग जुळून आल्याने मार्चमध्ये ‘या’ राशींचे गरिबीचे दिवस संपणार? शनिच्या कृपेने हातात येऊ शकतो पैसा
is womens deaths increase due to excessive drinking
अति मद्यपानामुळे स्त्रियांच्या मृत्यूत वाढ?

रुग्णसंख्येत नेमकी वाढ किती?

जागतिक पातळीवर १९९० मध्ये पन्नाशीच्या आतील कर्करोगाचे १८.२ लाख रुग्ण होते. ही संख्या तीन दशकांत ३२.६ लाखांवर पोहोचली. याच वेळी कर्करोगाने मृत्यू होणाऱ्यांमध्ये चाळिशी, तिशी आणि त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले आहे. जगात वर्षाला पन्नाशीच्या आतील सुमारे दहा लाख जण कर्करोगामुळे जीव गमावतात. जगात स्तनांच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात आणि सर्वाधिक मृत्यू होतात. जगभरात दर एक लाख लोकसंख्येमागे स्तनांच्या कर्करोगाचे १३.७ रुग्ण आहेत. श्वसननलिका आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मागील तीन दशकांत सर्वाधिक वार्षिक वाढ झाली असून, ती अनुक्रमे २.२८ आणि २.२३ टक्के आहे. याच वेळी यकृताच्या कर्करोगाचे रुग्ण दर वर्षी २.८८ टक्क्यांनी घटले आहेत. जगात २०३० पर्यंत कमी वयात कर्करोग होण्याचे प्रमाण आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अनुक्रमे ३१ आणि २१ टक्के वाढेल, असा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक धोका चाळिशीतील व्यक्तींना असेल, असा इशारा संशोधनात देण्यात आला आहे.

सर्वाधिक मृत्यू कशामुळे?

जगभरात २०१९ मध्ये पन्नाशीच्या आतील १०.६ लाख जणांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. हे प्रमाण १९९० च्या तुलनेत तब्बल २७ टक्क्यांनी जास्त आहे. स्तनांच्या कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. त्याखालोखाल श्वसननलिका, फुप्फुस आणि पोटाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत आहेत. मूत्रपिंड आणि अंडाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वांत वेगाने वाढत आहे. कमी वयात कर्करोग होण्याचे प्रमाण उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपात आहे. कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्येही हे प्रमाण वाढले आहे. पूर्व युरोप आणि मध्य आशियातील देशांमध्ये पन्नाशीच्या आतील व्यक्तींचा कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

कर्करोग वाढण्याची कारणे आणि उपाय काय?

कर्करोगाचे रुग्ण वाढण्यामागे प्रामुख्याने बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्यात निकृष्ट आहार, मद्यसेवन, तंबाखूसेवन, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि स्थूलता हे प्रमुख घटक आहेत. कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा मुद्दा संशोधकांनी मांडला आहे. त्यात सकस आहार, तंबाखू आणि मद्यसेवनावर प्रतिबंध, व्यायाम या उपायांवर भर दिल्यास कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होईल, असा संशोधकांचा दावा आहे.

संशोधनावर आक्षेप काय?

कर्करोगाचे रुग्ण वाढण्यास आनुवंशिकता हे प्रमुख कारण इतर संशोधकांनी मांडले आहे. तसेच, काही संशोधकांनी वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणाचा या संशोधनात विचार करण्यात आला नसल्याचा आक्षेप नोंदविला आहे. कारण लोकसंख्येत झालेली ४० टक्के वाढ यात गृहीत धरण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. असे असले तरी कर्करुग्णांची संख्या वाढत का आहे, याचे कोडे अद्याप संशोधकांना सुटलेले नाही. ते सोडविण्याच्या पहिल्या पायरीवर असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why is the risk of cancer increasing in people under the age of 50 print exp css

First published on: 14-09-2023 at 08:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×