Trump focused on Venezuelan oil अमेरिकेच्या डेल्टा फोर्सच्या सैनिकांनी निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतले. त्यावेळी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाला. निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्याच्या लष्करी कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकन तेल कंपन्यांना व्हेनेझुएलामध्ये पुन्हा प्रवेश मिळवून देणे आणि तिथल्या अफाट कच्च्या तेलाच्या संसाधनांचा वापर करण्याची वॉशिंग्टनची इच्छा आहे.

व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वांत मोठ्या तेल साठ्याचा खजिना आहे आणि त्या खजिन्यावर अमेरिकेची नजर आहे. अमेरिका व्हेनेझुएलातील मोठे तेल साठे ताब्यात घेऊ शकेल का? अमेरिकेने ताबा मिळवल्यास तेलाच्या किमतींवर काय परिणाम होईल? व्हेनेझुएलाचा तेल साठा किती मोठा आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

व्हेनेझुएलाचा तेल साठा किती मोठा?

‘ओपेक’नुसार, व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वांत मोठा प्रमाणित तेल साठा आहे. हा साठा अंदाजे ३०३.२२१ अब्ज बॅरल इतका आहे. या बाबतीत व्हेनेझुएला सौदी अरेबिया (२६७.२०० अब्ज बॅरल) व इराणच्याही पुढे आहे. असे असूनही तिथले उत्पादन अत्यंत खालावलेले आहे. ‘थर्ड ब्रिज’ या जागतिक संशोधन संस्थेचे पीटर मॅकनॅली यांच्या मते, व्हेनेझुएला सध्या दररोज सुमारे १० लाख बॅरल तेलाचे उत्पादन करतो. १९९९ मध्ये जेव्हा मादुरो यांचे पूर्ववर्ती ह्युगो चावेझ सत्तेवर आले होते, तेव्हा हे उत्पादन प्रतिदिन सुमारे ३५ लाख बॅरल इतके होते.

ते म्हणतात, “दुर्लक्ष, खराब पायाभूत सुविधा, गुंतवणुकीचा अभाव आणि भ्रष्टाचार यांमुळे देशाची उत्पादन क्षमता कमी झाली आहे.” ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१९ मध्ये लादलेल्या अमेरिकन निर्बंधांमुळे ही घसरण अधिकच वाढली आहे. पुढच्याच वर्षी उत्पादन ३,५०,००० बॅरल प्रतिदिन या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचले.

व्हेनेझुएलाच्या तेलावर निर्बंध

आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचे खरेदीदार खूप कमी आहेत. अंदाजानुसार, चीन सुमारे ८० टक्के तेल खरेदी करतो आणि ही मालवाहतूक मलेशियामार्गे केली जाते. द्विपक्षीय करारांतर्गत सुमारे पाच टक्के निर्यात क्युबाला केली जाते. निर्बंध टाळण्यासाठी, काराकस ‘घोस्ट टँकर्स’वर अवलंबून आहे, जे बनावट ध्वज, बदललेला ट्रॅकिंग डेटा आणि दिशाभूल करणारे शिपिंग मार्ग यांसारख्या युक्त्या वापरतात.

गेल्या महिन्यात अमेरिकन नौदलाने ‘एम/टी स्किपर’ नावाचे असेच एक जहाज अडवले होते. हे टँकर १० लाख बॅरलहून अधिक व्हेनेझुएलाचे तेल घेऊन क्युबाच्या दिशेने जात होते. अमेरिकन दंड टाळण्यासाठी खरेदीदार क्रिप्टोकरन्सीचा वापर करून पैसे देतात, ज्यामध्ये प्रामुख्याने ‘USDT’सारख्या स्टेबल कॉइन्सचा समावेश असतो.

व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात अमेरिकेचे अस्तित्व काय?

व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनाचा एक मर्यादित वाटा अमेरिकन ऊर्जा कंपनी ‘शेवरॉन’द्वारे उत्पादित केला जातो. ‘शेवरॉन’ वॉशिंग्टनच्या एका विशेष परवान्यांतर्गत काम करते. त्यामुळे या कंपनीला व्हेनेझुएलाच्या सरकारी तेल कंपनीशी भागीदारी सुरू ठेवण्याची आणि उत्पादनाचा काही भाग, विशेषतः अमेरिकन बाजारपेठेत निर्यात करण्याची परवानगी मिळते.

परंतु, या कंपनीला व्हेनेझुएला सरकारला थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यास मनाई आहे. त्याऐवजी कंपनी कच्च्या तेलाच्या शिपमेंटद्वारे कर आणि इतर देणी पूर्ण करते. ‘एक्सॉन मोबिल’ व ‘कोनोको फिलिप्स’सारख्या २००० च्या दशकाच्या सुरुवातीस सक्रिय असलेल्या इतर प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी ह्युगो चावेझ यांनी लादलेल्या अटी फेटाळून लावत २००७ मध्ये व्हेनेझुएलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्या अटींनुसार, देशात कार्यरत असलेल्या सर्व तेल प्रकल्पांमध्ये सरकारचा बहुसंख्य वाटा असणे अनिवार्य होते.

ट्रम्प यांचे लक्ष व्हेनेझुएलाच्या तेलावर का आहे?

शनिवारी ट्रम्प म्हणाले, “आपल्या सभोवताली सुरक्षित देश असणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे ऊर्जा असणेही खूप महत्त्वाचे आहे.” जमिनीतून मोठ्या प्रमाणावर तेल बाहेर येत असल्याचे नमूद करीत त्यांनी असा दावा केला की, अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये जो काही खर्च केला आहे, तो पूर्णपणे वसूल केला जाईल. ‘साइट गेस्टियन प्रायव्हेट बँक’चे जॉन प्लासार्ड यांनी ‘एएफपी’ला सांगितले, “ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की, काराकसद्वारे निर्बंधांखाली निर्यात केलेले तेल हे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चोरलेले तेल आहे.”

ट्रम्प यांचा असा दावा आहे की, यातील बरेचसे तेल चावेझ यांच्या राष्ट्रीयीकरणापूर्वी अमेरिकन उपकरणे आणि गुंतवणुकीचा वापर करून काढले गेले होते. अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट अमेरिकन खंडातून चीनला मागे ढकलणे हेदेखील आहे. त्यामध्ये पनामा कालव्यावर चीनचा प्रभाव मर्यादित करणे समाविष्ट आहे. या कालव्यातून व्हेनेझुएलाच्या तेलाची मोठी वाहतूक होते.

ट्रम्प पूर्ण ताबा मिळवू शकतील का?

‘यूबीएस’चे जिओव्हानी स्टॉउनोवो यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, “वर्षानुवर्षांचे गैरव्यवस्थापन आणि गुंतवणुकीचा अभाव यांमुळे ढासळलेली पायाभूत सुविधा पाहता, उत्पादनात कोणतीही सुधारणा करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असेल.” तरीही सध्याची परिस्थिती पाहता, अशी गुंतवणूक होण्याची शक्यता कमी आहे. पुरवठा जास्त असल्यामुळे तेलाच्या किमती दबावाखाली आहेत.

ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर आणि रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष यांसारख्या मोठ्या अडचणींनंतरही २०२५ मध्ये किमतीत घट झाली आहे. ‘सॅक्सो बँक’चे विश्लेषक ओले हॅन्सन यांनी ‘एएफपी’ला सांगितले, “अमेरिकन तेल कंपन्यांची मुख्य जबाबदारी त्यांच्या भागधारकांप्रति आहे; सरकारप्रति नाही. हे लक्षात घेता, नजीकच्या काळात व्हेनेझुएलामध्ये या कंपन्या जातील, ही शक्यता खूप कमी आहे.”

तेलाच्या किमतींवर याचा काय परिणाम होईल?

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारपेठेत आधीच पुरेसा पुरवठा आहे. व्हेनेझुएलातील उलथापालथीचा तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. या आठवड्यात केवळ किरकोळ वाढ अपेक्षित आहे. प्लासार्ड म्हणाले, “बंदरांच्या आसपासची रसद विस्कळित होऊ शकते.” ते पुढे म्हणाले की, बाजाराला कदाचित इराणला ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यांची अधिक चिंता वाटू शकते. कारण- इराण जास्त तेलाचे उत्पादन करतो.