– अमोल परांजपे

गेल्या रविवारी, १४ मे रोजी तुर्कस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. गेली १० वर्षे तुर्कस्तानचे अध्यक्ष आणि त्यापूर्वीची १० वर्षे पंतप्रधान, अशी जवळजवळ दोन दशके सत्तेत असलेल्या रेसेप तय्यीप एर्दोगन यांचा या निवडणुकीत पराभव होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र असे काही घडले नसून, उलट एर्दोगन यांनीच विरोधकांना मात दिल्याचे सकृद्दर्शनी दिसते. आता अध्यक्षपदाची फेरनिवडणूक होणार असून त्यानंतरच जगाचे लक्ष लागलेल्या तुर्कस्तानचे राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकेल.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
President Erdogan of Turkey
तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?
loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?

फेरनिवडणूक घेण्याची वेळ का आली?

२०१७मध्ये तेव्हा पंतप्रधान असलेल्या एर्दोगन यांनी सार्वमत घेतले आणि त्याद्वारे संसदीय लोकशाही संपुष्टात आणून अध्यक्षीय पद्धत सुरू केली. याद्वारे पंतप्रधान हे पद रद्द करण्यात आले आणि सगळी सत्ता अध्यक्षांच्या हाती एकवटली. त्याच्या दुसऱ्या वर्षी झालेल्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत एर्दोगन निवडून आले. त्यांचे दोन कार्यकाळ पूर्ण झाले असून ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तुर्कस्तानच्या राज्यघटनेनुसार अध्यक्ष होण्यासाठी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. १४ मे रोजी झालेल्या मतदानात एर्दोगन यांनी आघाडी घेतली असली, तरी ही रेषा पार करण्यात त्यांना यश आलेले नाही. एर्दोगन यांना ४९.४९ टक्के मते पडली. रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे नेते केमाल क्लुचदारोलो यांना ४४.७९ टक्के तर अतिउजव्या नॅशनलिस्ट मूव्हमेंट पार्टीचे सिनान ओगान यांना अवघ्या ५.२ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. फ्रान्ससारख्या इतर काही युरोपीय देशांप्रमाणे तुर्कस्तानमध्येही अध्यक्षपदासाठी अपेक्षित मते मिळाली नाहीत, तर फेरनिवडणूक घेण्याची तरतूद आहे. आता ओगान या स्पर्धेतून बाहेर पडले असून एर्दोगन आणि क्लुचदारोलो यांच्यामध्ये थेट लढत होईल. २८ मे रोजी ही फेरनिवडणूक होणार असून यामध्ये एर्दोगन यांचे पारडे जड मानले जात आहे.

एर्दोगन यांचे विरोधक कुठे चुकले?

काही जणांना निवडणूक प्रक्रियेत काळेबेरे असण्याची शंका आहे. कारण निवडणूकपूर्व चाचण्यांमध्ये एर्दोगन यांची पीछेहाट आणि क्लुचदारोलो यांना थेट विजयाची संधी स्पष्ट दिसत होती. निवडणुकीपूर्वी एर्दोगन यांची लोकप्रियता नीचांकी पातळीवर पोहोचलेली होती. मात्र प्रत्यक्षात एर्दोगन यांची फेरनिवड अक्षरश: थोडक्यात हुकली आहे. ओगान यांना केवळ १-२ टक्के मते मिळतील, असे भाकीत केले गेले असताना त्यांनी पाच टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली. याखेरीज एक वेगळे राजकीय कारणही आहे. क्लुचदारोलो स्वत: आणि त्यांचे बहुतांश समर्थक हे ‘केमालवादी’, म्हणजे आधुनिक तुर्कस्तानचे निर्माते मुस्तफा केमाल अतातुर्क यांची विचारसरणी मानणारे आहेत. मात्र प्रचारादरम्यान क्लुचदारोलो यांच्या एका ध्वनिचित्रफितीमध्ये काहीशी वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. ही भूमिकाही त्यांच्या पीछेहाटीला कारणीभूत असू शकते.

एर्दोगन यांना विजयाची किती संधी?

सिनान ओगान आपले मत कुणाच्या पारड्यात टाकतात आणि त्यांचे मतदार त्यानुसार वागतात का, यावर नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हे अवलंबून आहे. ओगान यांनी अद्याप कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. त्यांच्या अतिउजव्या राष्ट्रवादी पक्षाचे एर्दोगन यांच्याशी जमत नसले, तरी कुर्द विस्थापितांच्या बाजूने असलेल्या डेमोक्रेटिक पार्टीचा समावेश असलेल्या विरोधी आघाडीचे नेते क्लुचदारोलो यांना पाठिंबा देण्याबाबत ओगान साशंक आहेत. वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट या अभ्याससंस्थेतील तज्ज्ञ सोनर कागाप्ताय यांच्या मते ओगान यांनी पाठिंबा जाहीर केला नाही, तरी त्यांची बरीचशी मते आता एर्दोगन यांच्याकडे वळण्याची जास्त शक्यता आहे. याखेरीज १४ मे रोजी एर्दोगन यांच्या पक्षाने मिळविलेले दुसरे यश त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरू शकते.

हेही वाचा : विश्लेषण : दोन हजाराची नोट चलनातून बाद; आता पुढे काय?

कायदेमंडळाच्या निवडणुकीचा निकाल काय?

१४ मे रोजी अध्यक्षीय निवडणुकीबरोबरच ‘ग्रँड नॅशनल असेंब्ली ऑफ टर्की’ या केंद्रीय कायदेमंडळाचीही निवडणूक झाली. ६०० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एर्दोगन यांच्या ‘पीपल्स अलायन्स’ या आघाडीने अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त, सर्वाधिक २६८ जागा जिंकल्या. क्लुचदारोलो यांच्या नेतृत्वाखालील ‘नॅशनल अलायन्स’ आघाडीला १६९ जागा मिळाल्या. त्यामुळे कायदेमंडळात पुढील चार वर्षे एर्दोगन यांच्या आघाडीचे बहुमत असेल. अध्यक्षपदी वेगळी व्यक्ती निवडली गेली, तर कायदेमंडळ आणि अध्यक्ष यांच्यामधील मतभेदांमुळे विकास रखडण्याची भीती आहे, असे मानणारे मतदार आता एर्दोगन यांच्या पारड्यात टाकण्याची शक्यता आहे. मात्र सत्तेचा समतोल राखण्याचे जनतेने ठरविले, तर मात्र पहिल्या निवडणुकीपेक्षा वेगळे चित्र फेरमतदानात दिसू शकते.

amol.paranjpe@expressindia.com