विश्लेषण : सुपरहिरोजपेक्षा 'अवतार' का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा मॅजिकल टच कसा ठरतो यशाचा हीट फॉर्म्युला? | why james cameron avatar world is very differenct from other big budget hollywood movies | Loksatta

विश्लेषण : सुपर हिरोजपेक्षा ‘अवतार’ का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा ‘मॅजिकल टच’ कसा ठरतो यशाचा हिट फॉर्म्युला?

अवतारची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे याचं सादरीकरण आणि मोशन कॅप्चर तंत्रज्ञान

विश्लेषण : सुपर हिरोजपेक्षा ‘अवतार’ का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा ‘मॅजिकल टच’ कसा ठरतो यशाचा हिट फॉर्म्युला?
जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'अवतार' (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जेम्स कॅमेरूनच्या अविस्मरणीय अशा ‘अवतार’ला मागे टाकण्यासाठी २०१९ मध्ये मार्वलच्या चाहत्यांनी आतुरतेने वाट पाहिली होती. खरंतर अवताराबद्दल तेव्हा फारसे कोणालाच आठवत नव्हते. केवळ मार्वलच्या चाहत्यांमुळे या दोन चित्रपटातील स्पर्धा समोर आली आणि तेव्हाच ‘अवतार’ या चित्रपटाचं महत्त्व अधोरेखित झालं. अवतार २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि २०१९ उजाडेपर्यंत तो बऱ्याच लोकांच्या लक्षातही नव्हता, त्यांच्यासाठी तो केवळ एक उत्तम आणि वेगळं कथानक मांडणारा चित्रपट होता. मार्वल दरवर्षी अर्धा डझन चित्रपट प्रदर्शित करून अवतारच्या लेगसीला संपवू पाहत होता. निर्मात्यांनी आखलेल्या काही री-रिलीझ धोरणांमुळे अखेर अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमने अवतारला मागे टाकलेच.

ज्या पद्धतीने मार्वलने त्यांच्या सुपरहिरोजचं सादरीकरण आणि जाहिरात केली तशी पद्धत जेम्स कॅमेरून यांना अवतारच्या बाबतीत वापरायची कधीच गरज पडली नाही. असंख्य कारणांसाठी तेव्हा ‘अवतार’ हा एक महत्त्वाचा चित्रपट होता, त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे त्याची तांत्रिक प्रगती. अवतारमुळेच इतर चित्रपट निर्मात्यांना धाडस करून असे प्रयोग करण्याचा मार्ग मोकळा झाला.

आणखी वाचा : ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’नंतर ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजचा ट्रेलर चर्चेत; सोशल मीडियावर होतोय प्रचंड विरोध

कॅमेरून यांचा तब्बल १० वर्षांनी येणारा ‘अवतार: वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट पुन्हा चर्चेच्या आणि वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. ट्रेलर आणि पोस्टर्स अपेक्षेप्रमाणेच भव्य आणि चित्तथरारक आहेत आणि बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा हा चित्रपट अद्भुत असा इतिहास रचणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘अवतार’ मध्ये अशी कोणती विलक्षण गोष्ट आहे ज्यामुळे हा चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिसचं चित्र बदलू शकतो याबद्दल आपण जाणून घेऊया.

‘अवतार’ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे याचं सादरीकरण आणि मोशन कॅप्चर तंत्रज्ञान. अवतारपूर्वी, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’मध्येदेखील याचा वापर करण्यात आला होता. पण जेम्स कॅमेरुनने मोशन कॅप्चर या तंत्रज्ञानाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आणि त्यातही त्यांनी स्वतःचा खास टचदेखील या चित्रपटाला दिला. अशाप्रकारे अवतारने चित्रपटक्षेत्रात एक क्रांती घडवून आणली, ज्यामुळे मोशन-कॅप्चरचा वापर गेल्या दशकात अधिक झाला आणि ‘द प्लॅनेट ऑफ द एप्स ट्रायलॉजी’सारख्या इतरही बऱ्याच चित्रपटातही या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला.

अवतारने 3D चित्रपटांचे दिवस परत आणले आणि एक नवीन फॅड निर्माण केले. अवतारने एक उच्च बेंचमार्क सेट केला आणि 3D मध्ये बॉक्स-ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. यामुळेच इतर दिग्दर्शकही 3D चित्रपटांकडे पुन्हा वळले. अवतारच्या माध्यमातून कॅमेरून यांनी दोन पर्याय समोर ठेवले त्यातील पहिला म्हणजे मानवांसाठी एक भयानक भविष्य, आणि दूसरा म्हणजे निसर्गाच्या अनुषंगाने एक अद्भुत विश्व निर्माण करण्याची संधी. अर्थात या पद्धतीचे प्रयोग कॅमेरून यांनी आधीच्याची चित्रपटात केले आहेत. ‘टायटॅनिक’ आणि ‘टर्मिनेटर’ ही त्याची धडधडीत उदाहरणं आहेत. जागतिक विध्वंसाच्या कल्पनेने कॅमेरून यांना नेहमीच भुरळ घातली आहे. आता या दुसऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून कॅमेरून यांच्या दृष्टीकोनातून पुन्हा तीच जादू अनुभवायला मिळणार की नाही हे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच सांगता येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 11:50 IST
Next Story
विश्लेषण: मुंबई सुशोभीकरण प्रकल्प कसा आहे?