रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात येऊ घातलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्यूत प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर घाला घातला जात असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे. तर हा दुसरीकडे हा पर्यावरणपूरक प्रकल्प असल्याचा दावा सरकारने केला आहे. प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंचा थोडक्यात आढावा…

झाले काय?

जैवविविधतेनी समृद्ध असलेल्या कर्जत तालुक्यातील सायडोंगर गुजरात मधील टोरंट पॉवर कंपनीकडून पंप स्टोरेज जलविदयूत प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ होणार असल्याचे सांगीतले जात आहे. या प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील वन जमिनींवरील ३२ हजार झाडांची कत्तल करण्यास वनविभागाने परवानगी दिली. अडीच हजारहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली. या वक्षतोडीवरून पर्यावरणवादी संघटना आणि स्थानिक आक्रमक झाले आहेत.

प्रकल्प नेमका काय?

गुजरातमधील टोरंट पॉवर या कंपनीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात कोतवाल खलाटी येथे सायडोंगर भागात जलविद्यूत प्रकल्प उभारला जाणार आहे. ३ हजार मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी ३७० हेक्टर जागेची आवश्यकता असून, त्यापैकी २३३ हेक्टर हे वनक्षेत्र आहे, तर १४४ हेक्टर हे बिगर वन क्षेत्रातील आहे. पेज नदीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी दोन धरणांची निर्मिती केली जाणार आहे. डोंगरमाथ्यावरील धरणाची उंची ही २७ मीटर असणार असून, खालच्या धरणाची उंची ५९ मीटर असणार आहे.

पंप स्टोरेज प्रकल्पाचे वैशिष्ट्य

राज्य सरकारच्या वतीने हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगितले जात आहे. पंप स्टोरेज प्रकल्पामुळे राज्यात ३ हजार मेगावॅट हरित ऊर्जेची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात असणार आहे. डोंगर माथ्यावर एका जलाशयाची तर पायथ्याशी दुसऱ्या जलाशयाची निर्मिती केली जाणार आहे. दिवसा विजेची मागणी कमी असतांना सौर उर्जेचा वापर करून खालच्या जलाशयातून पाणी वरच्या जलाशयात सोडले जाईल. रात्री वीजेची मागणी वाढल्यावर वरच्या जलाशयातून पाणी टर्बाईनमधून सोडून वीज निर्मिती केली जाईल. अशा पद्धतीने तेच पाणी वापरून दररोज वीज निर्मिती करणे शक्य होईल. यामुळे कुठल्याही प्रकारचे कार्बन उत्सर्जन होणार नसल्याने हा पर्यावरणपूरक प्रकल्प असल्याचा सरकारचे म्हणणे आहे.

पर्यावरणावर आघात कसा?

प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनजमीन देण्यात आली असून, त्यावरील झाडांचे कत्तल करण्यास वनविभागाने परवानगी दिली आहे. कर्जत पुर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पाली येथील बाधित होणाऱ्या ३२ हजार ४९० झाडांचे निष्कासन केले जाणार आहे. यातील अडीच हजारांहून अधिक वृक्षांची आत्तापर्यंत छाटणी करण्यात आली आहे. हा परिसर भीमाशंकर येथील अभयारण्य लगतच्या परिसरात आहे. अतिशय दुर्मिळ आणि औषधी वनस्पती या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. राज्य प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेल्या शेकरू तसेच इतर वन्यप्राणी आणि पक्षांचा अधिवास या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येते त्यामुळे प्रकल्पाच्या नावाखाली समृद्ध वनसंपदेवर आघात घातला जाणार असल्याचे पर्यावरणवादी संघटनांचे म्हणणे आहे.

पर्यायी वृक्षलागड किती व्यवहार्य?

प्रकल्पामुळे जवळपास २३३ हेक्टरवरील वनसंपत्ती नष्ट होणार आहे. ३२ हजाांरहून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. या बदल्यात कर्जत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पर्यायी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी तीनपट जागा कंपनीकडून वनविभागाला दिली जाणार असून, त्यावर वनविभाग ३० हजार तर कंपनी ६० हजार झाडे लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पण पर्यायी वृक्षलागवड म्हणजे धुळफेक असल्याचे पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. आजवर एखाद्या प्रकल्पासाठी पर्यायी वृक्षलागवड कुठेही यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पर्यायी वृक्षलागवड व्यवहार्य नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. पर्यावरणावर आघात करून विकास होऊ शकत नसल्याचे दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

प्रकल्पाबाबत पारदर्शकतेचा अभाव?

प्रकल्पामुळे स्थानिकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ज्याला कारण पारदर्शकतेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जनसुनावणीत स्थानिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची शासनाकडून उत्तरे देण्यात आलेली नाहीत. प्रकल्पाबाबत ठोस माहितीही देण्यात आली नाही. प्रकल्पासाठी हीच जागा का निवडली गेली, प्रकल्पामुळे स्थानिक जीवनावर नेमके कोणते परिणाम होतील, विस्थापित होणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काय होणार, ते कुठे होणार, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. प्रकल्पाविरोधात जनक्षोभ तयार होण्याचे हेदेखील एक कारण आहे. राज्याला स्वच्छ ऊर्जेची आणि वीज साठवणूकीची गरज आहे हे मान्य केले तरी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशावर त्यासाठी किती भार टाकायचा आणि स्थानिकांच्या हक्कांची कशी खात्री द्यायची याची उत्तरे सरकारने देणे आवश्यक असणार आहे.
harshad.kashalkar@expressindia.com