Kidney Damage Raises Heart Attack Risk: जगभरात जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसोबतच क्रॉनिक किडनी डिसीजही (Chronic Kidney Disease-CKD) सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे. जगातील सुमारे १५% ते २०% लोकांना किडनीशी संबंधित काही ना काही समस्या आढळून येत आहे. चिंतेची बाब म्हणजे हा आजार अनेकदा सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढत राहतो. त्यामुळेच किडनीचा आजार silent killer म्हणून ओळखला जातो.
…तर हृदयविकाराचा धोका
आश्चर्याची गोष्ट म्हणजे किडनीच्या आजाराचा परिणाम केवळ मूत्रपिंडांपुरता मर्यादित राहत नाही. उलट, किडनीचे आरोग्य बिघडल्यास हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. जागतिक स्तरावर किडनीचा आजार आता मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे ‘Save your kidneys to protect your heart‘ हा संदेश केवळ सुदृढ आरोग्याचा सल्ला नसून एक महत्त्वाचा वैद्यकीय इशारा आहे.
किडनी आणि हृदय यांचा घनिष्ठ संबंध
मानवी शरीरात किडनी आणि हृदय यांचे कार्य एकमेकांशी संबंधित आहे. हृदय रक्त पंप करते आणि किडनी त्या रक्तातील अपायकारक पदार्थ फिल्टर करून शरीरातील द्रव संतुलन राखते. त्यामुळे या दोन अवयवांपैकी एकावर परिणाम झाला तर दुसऱ्यावर त्याचा थेट प्रभाव पडतो.
…की, हृदयविकाराचा धोका वाढतो
वैज्ञानिक संशोधनानुसार, किडनी कमकुवत होत गेली की, हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. म्हणजेच किडनीचे कार्य जितके कमी, तितका हृदयावर ताण अधिक वाढतो. याचे कारण म्हणजे किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात मीठ, द्रव आणि विषारी पदार्थ साचू लागतात. परिणामी रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. अनेक संशोधनांमधून असेही दिसून आले आहे की, किडनीचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो तो हृदयविकार. त्यामुळे किडनीचे आरोग्य जपणे म्हणजे हृदयाचे संरक्षण करणे होय.
भारतात वाढणारा किडनीचा आजार
भारतामध्येही किडनीच्या आजाराचे प्रमाण वेगाने वाढत आहे. Indian Society of Nephrology च्या नोंदींनुसार मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार किडनीशी संबंधित विकार तसेच हृदयविकार यांसाठी जबाबदार मानले जातात. हे दोन्ही आजार मुख्यतः जीवनशैलीशी संबंधित असल्याने त्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
किडनीवर दीर्घकालीन ताण
शहरीकरण, कमी शारीरिक हालचाल, जंक फूडचे वाढते सेवन, ताणतणाव आणि झोपेची कमतरता यामुळे मधुमेह आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. परिणामी किडनीवर दीर्घकालीन ताण येतो. अनेकदा रुग्णांना किडनी खराब होत असल्याची कल्पनाही नसते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे फारशी दिसत नाहीत.
Silent killer का म्हणतात?
किडनीच्या आजाराला silent killer म्हणण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे लक्षणे उशिरा दिसणे. किडनीचे कार्य सुमारे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी झाल्यावरच अनेकांना थकवा, सूज, भूक मंदावणे किंवा लघवीतील बदल जाणवू लागतात. अनेक वेळा रुग्णांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच त्यांच्या शरीरात किडनीचा आजार असल्याचे निदान होते. म्हणजेच किडनी आणि हृदय यांच्यातील संबंधाबद्दल जागरूकतेचा मोठा अभाव अजूनही दिसून येतो.
माहितीचा अभाव आणि सोशल मीडियाचा प्रभाव
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते किडनीचा आजार आणि हृदयविकार यांच्यातील संबंधाबाबत अजूनही मोठी अज्ञानाची दरी आहे. अनेक रुग्णांना किडनीच्या आजाराची जोखीम किंवा त्याची सुरुवातीची चिन्हे माहिती नसतात.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया माहितीचा मोठा स्रोत ठरला आहे. फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर आरोग्यविषयक माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित होते. परंतु या माहितीपैकी मोठा भाग वैज्ञानिकदृष्ट्या तपासलेला किंवा विश्वसनीय नसतो.
चुकीच्या माहितीवर विश्वास घातक
अनेकदा लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा व्यावसायिक हेतूंनी अप्रमाणित उपचारपद्धतींचा प्रचार केला जातो. त्यामुळे लोक चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात आणि योग्य उपचार घेण्यास उशीर करतात. विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये अप्रमाणित उपचार देणाऱ्या भोंदू डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तज्ज्ञांच्या मते, किडनीच्या आजाराशी लढण्यासाठी विश्वसनीय माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जीवनशैलीतील बदलच हेच सर्वोत्तम संरक्षण
किडनी आणि हृदय दोन्हीचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैलीतील काही साधे पण प्रभावी बदल महत्त्वाचे ठरतात.
१. धूम्रपान टाळणे
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तदाब वाढतो. यामुळे किडनीवर ताण येतो तसेच हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे धूम्रपान सोडणे हा आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.
२. रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे
मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचे प्रमुख कारण असल्याने त्यांचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित तपासण्या करून रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी तपासणे आवश्यक असते.
३. वजन नियंत्रण
लठ्ठपणामुळे शरीरात दाह (inflammation) वाढतो आणि किडनीवर अतिरिक्त ताण पडतो. योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
४. संतुलित आहार
आरोग्यदायी आहारात ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश असावा. जास्त मीठ आणि संतृप्त चरबी (saturated fat) टाळल्यास रक्तदाब आणि किडनीवरील ताण कमी होऊ शकतो.
५. पुरेसे पाणी पिणे
शरीरात योग्य प्रमाणात पाणी असल्यास किडनीचे कार्य सुरळीत चालते. मात्र किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाण्याचे प्रमाण ठरवावे.
६. नियमित व्यायाम
दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा आठवड्यातून ४-५ वेळा व्यायाम केल्यास हृदय आणि किडनी दोन्हीचे आरोग्य सुधारते. योगासारख्या पद्धती ताण कमी करण्यासही मदत करतात.
सामाजिक पातळीवर उपायांची गरज
किडनी आणि हृदयविकाराच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावर नव्हे तर सामाजिक पातळीवरही प्रयत्न करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य मोहिमा, नियमित तपासणी कार्यक्रम आणि आरोग्य शिक्षण यामुळे या आजारांबद्दल जागरूकता वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, जर लोकांना किडनी आणि हृदय यांच्यातील संबंधाबद्दल योग्य माहिती मिळाली तर अनेक आजार टाळणे शक्य आहे. लोकांचे अज्ञान कमी करणे हेच या लढ्याचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकते.
किडनी आणि हृदय यांचे आरोग्य एकमेकांशी घट्ट जोडलेले आहे. किडनीचे कार्य कमी झाल्यास हृदयावर ताण वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे किडनीचे संरक्षण करणे म्हणजे हृदयाचेही संरक्षण होय. संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे आणि मधुमेह-रक्तदाब नियंत्रणात ठेवणे यांसारख्या साध्या सवयींमुळे किडनी आणि हृदय दोन्हीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येऊ शकते. योग्य माहिती, जागरूकता आणि वेळेवर तपासणी यामुळे silent killer मानला जाणारा किडनीचा आजारही मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.
