Thailand King Rama Title history and its deep cultural Ayodhya connection: थायलंडची प्राचीन ओळख ‘सियाम’ (Siam) अशी आहे. हा देश समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. थायलंडच्या सर्व राजांच्या नावाबरोबर राम ही उपाधी लावली जाते. राम ही देवता भारतीय असून थायलंडच्या राजांच्या नावामागे या देवतेच्या नावाची उपाधी का लावली जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी थायलंड आणि भारत यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घ्यावा लागतो.
थायलंडचे ‘रामाकियन’
थायलंड आणि भारत यांच्यातील संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नव्हते, तर धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधही दृढ होते. आग्नेय आशियातील अनेक देशांप्रमाणेच थायलंडवरही हिंदू आणि बौद्ध परंपरांचा प्रभाव दिसून येतो. थायलंडमध्ये रामायणाला ‘रामाकियन’ (Ramakien) म्हटले जाते. थायलंडमध्ये हे केवळ एक महाकाव्य नसून राष्ट्रीय अभिमानाचा विषय मानला जातो. भगवान रामांची कथा थायलंडच्या कला, नाट्य, साहित्य आणि अगदी राजकीय संरचनेतही खोलवर रुजलेली आहे.
‘राम’ ही राजकीय उपाधी का दिली जाते?
राजाच्या नावामागे राम ही उपाधी लावण्याची प्रथा १७ व्या शतकात सुरू झाली. याच कालखंडात चक्री (Chakri) वंशाची स्थापना झाली होती. या वंशातील पहिला राजा किंग फुत्थायोटफा चुलालोक हा होता. त्याला इंग्रजीत Rama I (राम पहिला) म्हणून ओळखले गेले. याच वंशातील सहावा राजा किंग वजिरावुध (Vajiravudh) यांनी राम सहावा (Rama VI) ही इंग्रजी उपाधी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली. तेव्हापासून राजांना ‘राम’ या नावाने क्रमांक देण्याची परंपरा रूढ झाली. यामुळे भारतीय पुराणातील आदर्श राजा राम यांच्या परंपरेला सातत्य आणि सन्मान मिळाला.
भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक नाते
सध्याचे थायलंडचे राजा राम दहावे (Rama X) म्हणून ओळखले जातात. त्यांना फुटबॉल प्रिन्स म्हणूनही लोकप्रियता मिळाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक मानले जातात. थोडक्यात, ‘राम’ ही उपाधी केवळ नाव नाही, तर ती भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक नात्याचे प्रतीक आहे, ज्याची मुळे रामायणातील शाश्वत मूल्यांमध्ये रुजलेली आहेत.
थायलंडच्या राजांना ‘राम’ का म्हटले जाते?
थायलंडच्या राजांना राम असे संबोधले जाते, कारण चक्री (Chakri) वंशाचे संस्थापक राजा राम पहिला (Rama I) यांनी ‘रामाथिबोदी’ (Ramathibodi) हे नाव स्वीकारले होते. हे नाव अयुथाया (Ayutthaya) साम्राज्याच्या पहिल्या शासकाच्या नावाशी साधर्म्य दर्शवते. विशेष म्हणजे, अयुथाया हे शहर भारतातील भगवान रामांच्या जन्मस्थळ असलेल्या अयोध्येच्या नावावरून प्रेरित आहे.
थायलंडमधील राजेशाहीच्या परिचयाचा महत्त्वाचा भाग
चक्री वंशाने ही परंपरा गेल्या २०० हून अधिक वर्षांपासून जपली आहे आणि आजही थायलंडमध्ये राजघराण्याला मोठा मान दिला जातो. काळानुसार राजकारण आणि समाजव्यवस्था बदलली असली, तरी ‘राम’ ही राजकीय उपाधी अजूनही थायलंडमधील राजेशाहीच्या परिचयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही. थायलंडच्या राजांना ‘राम’ म्हणण्याची परंपरा इतिहास, धर्म आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये खोलवर रुजलेली आहे. हे फक्त एक नाव नसून, थायलंडच्या राष्ट्रीय परिचयाचे आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतिबिंब आहे. जग कितीही बदलले तरी ही परंपरा आजही भारत आणि थायलंड यांच्यातील दीर्घकालीन सांस्कृतिक नात्याचे एक जिवंत प्रतीक म्हणून टिकून आहे.
थायलंडची ‘अयोध्या’–प्राचीन अयुथाया शहर
आज आपण ज्याला थायलंड म्हणतो, त्या देशाला पूर्वी ‘सियाम’ (Siam) म्हणून ओळखले जात होते. या राज्याची स्थापना साधारणतः १३व्या शतकात झाली. सध्याच्या बँकॉकपासून सुमारे ७० किलोमीटर उत्तरेला अयुथाया (Ayutthaya) हे प्राचीन शहर आहे, जे एकेकाळी सियामी साम्राज्याचे केंद्र आणि राजधानी होते.
इ.स. १३५१ साली स्थापन झालेल्या अयुथाया शहराला सियामची राजधानी बनवण्यात आले. विशेष म्हणजे ‘अयुथाया’ हे नाव संस्कृतमधील ‘अयोध्या’ या शब्दावरून आले आहे. जे वाल्मीकी रामायणात भगवान रामांच्या राज्याचे नाव आहे.
ही केवळ भाषिक साधर्म्याची बाब नाही, तर या प्रदेशात हिंदू परंपरांचा खोलवर प्रभाव असल्याचे ते दर्शवते. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे ‘रामाकियन’ (Ramakien) थायलंडमधील रामायणाचे रूपांतर. हे महाकाव्य थायलंडच्या संस्कृती, कला आणि मूल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. अयुथाया शहराचे नामकरण राजा रामाथिबोदी (Ramathibodi) यांनी केले, जे या शहराचे पहिले शासक मानले जातात. त्यांच्या नावातच ‘राम’ हा संदर्भ असल्याने रामायणाचा राजघराण्यावर किती प्रभाव होता, हे स्पष्ट होते. असेही मानले जाते की, प्राचीन थायलंडमधील अनेक राजकीय विधी हिंदू वैदिक परंपरांवर आधारित होते आणि राजसत्ता भगवान रामांसारख्या आदर्श, न्यायप्रिय आणि दिव्य राजाच्या संकल्पनेवर उभी होती.
भारत-थायलंड सांस्कृतिक नात्याचा जिवंत पुरावा
आजही अयुथाया शहराचा वारसा हा भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक नात्याचा जिवंत पुरावा आहे. जिथे भारतीय संस्कृती जपली गेली आणि स्थानिक संस्कृतीत सुंदरपणे एकरूपही झाली आहे.
