गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील गराजिया गावात नुकतीच घडलेली एक विचित्र घटना केवळ व्हायरल व्हिडिओ म्हणून पाहता येणार नाही. एका सिंहिणीने गुराख्याला खाली पाडून सुमारे अर्धा तास नियंत्रणात ठेवले, पण ठार मारले नाही. वन्यजीव संवर्धन यशस्वी होत असताना मानव-वन्यजीव संघर्ष गुंतागुंतीचे व धोकादायक बनत असल्याचा हा इशारा आहे.
सिंहिणीने माणसाला ठार का मारले नाही ?
सिंहिणीने गुराख्यावर केलेला हल्ला हा शिकार करण्यासाठी नव्हता. वन्यप्राण्यांच्या एकूणच वर्तणुकीचा अभ्यास केल्यानंतर बरेचदा मार्जार कुळातील प्राणी त्यांच्या अधिवासात कुणी घुसखोरी केल्याचे दिसून आल्यास वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा धोका दूर ठेवण्यासाठी या पद्धतीचे वर्तन करतात. गुजरातमधील या घटनेत सिंहिणीने त्या गुराख्याला खाली पाडून नियंत्रणात ठेवले, पण त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला नाही. मात्र, याचा अर्थ त्या व्यक्तीला धोका नव्हता असे नाही. किंवा प्रत्येक वेळी वन्यप्राणी सोडून देतील असेही नाही. गुजरातमधील या घटनेमुळे सिंह आणि माणूस यांच्यातील अंतर अतिशय धोकादायकरित्या कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही घटना गंभीर का मानली जाते?
विश्लेषकांच्या मते ही घटना अपवादात्मक आहे. त्यात गुराख्याचा जीव वाचला ही समाधानाची बाब असली तरीही प्रत्येक वेळी तसेच होईल याची शाश्वती नाही. जंगलात राहणारे सिंह आता मोठ्या प्रमाणात जंगलाबाहेरच्या प्रदेशात स्थायिक होत आहेत. गुजरातमध्ये शेकडो गावे आता सिंहांच्या नियमित वावराच्या क्षेत्रात येऊ लागली आहेत. त्यामुळे माणूस आणि सिंह यांच्यातील आमना-सामना दररोजचा आहे. प्रत्येक भेट जीवघेणी ठरत नसली तरीही धोका वाढत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे ही चित्रफीत थरारक प्रसंग म्हणून नाही, तर भविष्यातील संभाव्य संघर्षाचा इशारा म्हणूनही पाहण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. संवर्धनाच्या नव्या टप्प्याकडे बोट दाखवणारी ही घटना आहे.
संवर्धनाच्या यशाची किंमत?
आशियाई सिंहांचे संवर्धन हे गुजरातचे मोठे यश मानले जाते. सिंहांची संख्या वाढली, त्यांचा क्षेत्रविस्तारही झाला. मात्र, त्यांच्यासाठी पर्यायी अधिवास, स्थलांतर आणि दीर्घकालीन व्यवस्थापन यावर पुरेसा भर दिला गेला नाही. त्यामुळे सिंह आता शेती, चरई क्षेत्र, गावांच्या आसपास नियमित दिसू लागले आहेत. संख्या वाढली, पण त्याच काळात अधिवासांचे तुकडे झाले, शेती आणि वसाहती जंगलाच्या अधिक जवळ पोहोचल्या. संवर्धनाचा पहिला टप्पा म्हणजे प्राण्यांची संख्या वाढवणे, पण दुसरा आणि अधिक कठीण टप्पा म्हणजे त्या वाढलेल्या संख्येसोबत संघर्ष कसा कमी करायचा हा आहे. संवर्धन यशस्वी झाले, पण त्याच्या परिणामांचे व्यवस्थापन अजूनही अपुरे आहे.
या घटनेचा सर्वात मोठा संदेश कोणता?
जंगलातील वन्यप्राण्यांमध्ये बदल झालेला नाही. गुजरातमधील सिंहिणीची ही चित्रफीत थरारक असली तरीही त्यात कठोर वास्तव दडलेले आहे. वन्यप्राणी आणि माणूस यांच्यातील सीमारेषा झपाट्याने पुसट होत आहे. या घटनेत सिंहिणीने त्या गुराख्याला सोडले, पण कधीतरी ती माणसाला मारूदेखील शकेल. माणूस आणि वन्यप्राणी एकाच जागेत जगण्यातून वाढत्या संघर्षाचा हा इशारा आहे. आता प्रश्न सिंह वाचवण्याचा नाही, तर माणूस आणि सिंह दोघेही सुरक्षित कसे राहतील याचा आहे. त्यांच्या सुरक्षित सहअस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यात यश आले नाही तर मात्र जंगलात वाढलेले आणि गावाकडे येणारे प्राणी व गावातील माणसांमध्ये वाढलेली भीती यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.
विदर्भासाठी यातून कोणता धडा?
गुजरातप्रमाणेच विदर्भात मानव-वाघ संघर्षाचा आलेख गेल्या दोन दशकात उंचावला आहे. विदर्भात आणि विशेषकरून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह ब्रह्मपुरी, सिंदेवाही, भंडारा, नागपूर परिसरात वाघांची संख्या वाढली आहे. विदर्भातील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. व्याघ्रप्रकल्पापेक्षा अधिक वाघ जंगलाबाहेर आहेत आणि तेथेच स्थायिक होत आहेत. त्यामुळे गावकरी आणि वाघ यांचा रोजच आमना-सामना होत आहे. त्यातून मानवी मृत्यूच्या घटनादेखील वाढत आहेत. वाघाच्या त्या प्रत्येक हल्ल्यामागे नरभक्षक वर्तनच असते असे नाही. मात्र, संघर्षाच्या घटना वाढत असल्याने स्थानिकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे संवर्धन हा यशाचा भाग असला तरी स्थानिक समुदाय, वनविभाग आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज आहे. अन्यथा संवर्धनाचे यश संघर्षाचे कारण ठरण्यास वेळ लागणार नाही.
rakhi.chavhan@expressindia.com
