Bangladesh Shri Ram Statue Opposition : भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशात पुन्हा एकदा धार्मिक तणाव उफाळून आला. बांगलादेशच्या उत्तरेकडील गाईबांधा जिल्ह्यातील पलाशबारी येथे उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीला तेथील कट्टरपंथीयांनी तीव्र विरोध केला. त्यावरून वाद वाढतच असल्यामुळे तेथील प्रशासनाला भीतीपोटी मूर्ती उभारण्याचे काम तातडीने थांबवावे लागले. या संपूर्ण प्रकरणामुळे बांगलादेशातील धार्मिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांचे हक्क आणि हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

तारिक रहमान यांनी फेब्रुवारीमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशातील अल्पसंख्याकांना अनेक मोठमोठी आश्वासने दिली होती. कोणताही जातीय भेदभाव न करता प्रत्येकाला देशात समान वागणूक आणि संरक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच त्यांची आश्वासने हवेतच विरल्याचे दिसून आले. भारताच्या सीमेला लागून असलेल्या या देशात पुन्हा एकदा धार्मिक तणाव उफाळून आला. स्थानिक कट्टरपंथी इस्लामिक संघटनांच्या हिंसक धमक्या आणि दबावानंतर तेथील प्रशासनाला प्रभू श्रीरामाची मूर्ती उभारण्याचे अत्यंत भीतीपोटी आणि सक्तीने थांबवावे लागले आहे.

बांगलादेशात श्रीरामांच्या मूर्तीला विरोध

बांगलादेशातील उत्तरेकडील गाईबांधा जिल्ह्यातील पलाशबारी येथे भव्य मंदिर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २२० दशलक्ष टका (भारतीय चलनानुसार १५.६ कोटी रुपये) इतका खर्च केला जात आहे. त्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या ८१ फूट उंच मूर्तीसोबतच, ५० फूट उंचीची भगवान श्रीकृष्ण यांची आणि ३० फूट उंचीची भगवान शंकर यांची मूर्तीही उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ८१ फुटांची प्रभू श्रीरामाची मूर्ती संपूर्ण बांगलादेशातील सर्वात उंच मूर्ती ठरणार होती. या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या राधा गोविंद मंदिर समितीचे अध्यक्ष हरिदास चंद्र दास यांनी सांगितले की, आम्ही सनातन धर्माचे मुख्य आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या ८१ फुटांच्या मूर्तीचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही कट्टरपंथी गटांकडून प्रकल्पाशी संबंधित लोकांना धमक्या दिल्या जात असल्याने हे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. पंतप्रधान तारिक रहमान, कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आणि नागरी समाजाने आम्हाला हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा द्यावी, अशी विनंतीही हरिदास यांनी केली आहे.

कट्टरपंथीयांचा व्हिडीओ व्हायरल

मंदिर समितीचे सल्लागार श्यामलाल कुमार महंता यांनीही सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. कोणत्याही धार्मिक वादाला फोडणी देण्यासाठी आम्ही हे काम सुरू केलेले नाही. तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही हे काम थांबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका इस्लामिक कट्टरपंथीय व्यक्ती प्रभू श्रीरामाची मूर्ती पाडण्याची उघड धमकी देताना दिसून आला. “इथे रामाची मूर्ती उभारली जात असून ती बुलडोझरने उद्ध्वस्त करा, सरकारने ही मूर्ती पाडली नाही, तर सामान्य मुस्लीम नागरिक ती उद्ध्वस्त करतील, अशी धमकीही त्या व्यक्तीने दिली होती.

हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट

कट्टरपंथीयांच्या धमक्यांपुढे झुकून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे बांधकाम थांबवण्याच्या निर्णयामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दडपशाहीविरोधात आता देशातील विविध स्तरातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. श्रीरामाच्या मूर्तीचे काम करणाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्यांचा निषेध करण्यासाठी राजधानी ढाका येथील नामांकित ‘ढाका विद्यापीठाच्या’ विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढला. धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करा आणि कट्टरपंथीयांवर कारवाई करा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी या दडपशाहीचा तीव्र निषेध केला. प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून सविस्तर पोस्ट लिहून आपला तीव्र संताप व्यक्त केला.

तस्लिमा नसरीन काय म्हणाल्या?

गाईबांधा जिल्ह्यातील पलाशबारी येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिर आणि मूर्तीविरोधात दिल्या जाणाऱ्या धमक्या, चिथावणीखोर वक्तव्ये आणि द्वेषपूर्ण प्रचार अत्यंत चिंताजनक असल्याचे तस्मिमा यांनी म्हटले आहे. एखाद्या समुदायाचे उपासनेचे स्थळ केवळ ते आवडत नाही म्हणून उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला नाही. कायद्याचे राज्य असलेल्या देशात धार्मिक मतभेद हे हिंसाचार किंवा रानटीपणाने सोडवले जात नाहीत, असेही त्या म्हणाल्या. राम मूर्ती पाडण्याच्या या धमक्या म्हणजे थेट तालिबानी प्रवृत्तीच्या आहेत. २००१ मध्ये तालिबानने बामियान येथील भगवान बुद्धाचे ऐतिहासिक पुतळे केवळ यासाठी उद्ध्वस्त केले होते, कारण ते दुसऱ्या धर्माचे प्रतीक आणि वारसा सहन करू शकत नाहीत. आजही काही लोक गाईबांधा येथे बांधल्या जाणाऱ्या रामाच्या मूर्तीला नष्ट करण्याची धमकी देत असतील, तर त्यांची मानसिकता बामियान बुद्ध मूर्ती पाडणाऱ्या तालिबान्यांसारखीच आहे, असा संतापही तस्लिमा यांनी व्यक्त केला.

हिंदूंच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

राममूर्ती उभारणीच्या वादामुळे बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणामुळे देशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन युनिटी कौन्सिल’च्या माहितीनुसार, यावर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत सांप्रदायिक हिंसाचाराच्या १३३ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशातील हिंदू समुदायावरील हिंसाचारात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, त्यांच्या काळातही या परिस्थितीत फारशी सुधारणा दिसून आली नाही. यादरम्यान तारिक रहमान हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबणार अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, तेथील हिंदू मंदिराला विरोध होत असल्यामुळे अल्पसंख्याकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.