Mahabaleshwar Lonavala Monsoon Heavy Rain : पश्चिम घाट तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लोणावळा, महाबळेश्वर, ताम्हिणी घाट, भिरा तसेच इतर अनेक भागांत ६ ते ८ जुलैदरम्यान तब्बल ६०० मिमीपेक्षा अधिक विक्रमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, मातीचे ढिगारे वाहून जाणे, पूरस्थिती होणे, यांसारख्या आपत्तीजनक घटना घडल्याने त्याचा सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून आला. मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे या दोन प्रमुख शहरांच्या मध्यभागी असलेला लोणावळ्याचा काही तात्पुरता ठप्प झाला होता. मुळात हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला असून पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. त्याशिवाय हा भाग राज्यातील जलसंपत्तीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यांच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या या भागांत दोन डझनहून अधिक धरणे असून, येथूनच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये पश्चिम घाटात इतका विक्रमी पाऊस कशामुळे पडला? त्याविषयी…

पश्चिम घाटात झालेल्या या मुसळधार पावसामागे मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल हवामान आणि सह्याद्रीची भौगोलिक रचना ही दोन प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. भारतीय हवामान विभागाच्या निकषांनुसार, कोणत्याही भागांत २४ तासांत २०४ ते २४४.५ मिमी पाऊस पडल्यास त्याला ‘अतिमुसळधार’ असे संबोधले जाते; तर २४४.५ मिमीपेक्षा जास्त होणारा पाऊस हा विक्रमी पावसाच्या श्रेणीत मोडतो. ६ ते ८ जुलैदरम्यान पश्चिम घाटालगतच्या अनेक भागांत तब्बल १,००० मिमीपेक्षा जास्त विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली. लोणावळा, भिरा आणि महाबळेश्वर या परिसरातील पावसाने पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. या ४८ तासांच्या कालावधीत लोणावळ्यात १,२९० मिमी (+१६१ टक्के), भिरा येथे १,१२१ मिमी (+७३ टक्के), ताम्हिणी येथे १,११० मिमी (+१२५ टक्के), शिरगाव येथे ९६० मिमी (+५८ टक्के) आणि महाबळेश्वर येथे ९१६ मिमी (+१०० टक्के) पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या अतिवृष्टीमागे एकाच वेळी निर्माण झालेल्या अनेक अनुकूल हवामान प्रणाली कारणीभूत ठरल्या. गेल्या आठवड्यात मध्य भारतावर एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, जे पुढे ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकले. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला. आधीच मान्सूनच्या काळात सक्रिय असणारा कमी दाबाचा मुख्य पट्टा अत्यंत अनुकूल स्थितीत होता. त्यातच पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला आणखी एक कमी दाबाचा पट्टा अचानक सक्रिय झाला. या सर्व घटकांमुळे पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस कोसळला. पश्चिम घाटाची भौगोलिक रचना आणि पर्वतांची उंची तसेच त्याच्या आकारामुळे या भागातील मान्सूनच्या पावसावर मोठा परिणाम करतात. अरबी समुद्रात अनुकूल हवामान तयार झाल्यास पुणे, रायगड, सातारा तसेच सह्याद्रीच्या आतील घाटमाथ्यावरील भागांत पावसाचा जोर लक्षणीय वाढतो. या प्रदेशांमध्ये दरवर्षी १०० मिमी अधिक पाऊस पडतो. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम डोंगराळ भागांचा त्यामध्ये समावेश होतो.

भौगोलिकदृष्ट्या समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा प्रथम सामना करणाऱ्या पर्वतांच्या पश्चिमेकडील भागात सर्वाधिक पाऊस पडतो; तर पर्वतरांगेच्या पूर्वेकडील भागात तुलनेने कमी पाऊस होतो. सह्याद्रीच्या या भौगोलिक रचनेमुळे मध्य महाराष्ट्रातील पश्चिम आणि पूर्व भागांतील पावसाच्या प्रमाणात मोठा फरक दिसून येतो, असे पुणे येथील भारतीय हवामान विभागाच्या १९८१ मधील अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही दशकांतील हवामानाच्या अभ्यासानुसार, महाराष्ट्र हे देशातील अशा राज्यांपैकी एक आहे, जिथे पावसाचे प्रमाण सातत्याने कमी जास्त होताना दिसून येत आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. पालघर जिल्ह्यात तर मान्सून हंगामात तसेच वार्षिक पावसातही अतिमुसळधार पाऊस होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे, नैऋत्य मान्सूनच्या काळात सलग २० दिवसांपेक्षा जास्त काळ अतिवृष्टी होण्याच्या घटनांची नोंद आता महाराष्ट्रात वारंवार होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळा, महाबळेश्वर, भिरा आणि ताम्हिणी परिसरात यंदा विक्रमी पाऊस पडला असला तरी या डोंगराळ भागांत अशा प्रकारचा मुसळधार पाऊस नवीन नाही. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने महाराष्ट्रात सर्वाधिक पावसासाठी ओळखले जातात आणि या काळात पश्चिम घाटात नेहमीच पावसाचा जोर असतो. मात्र, यंदा झालेल्या पावसाने भूतकाळातील अनेक मोठे विक्रम धोक्यात आणले आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या ऐतिहासिक नोंदींवर नजर टाकल्यास पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या पावसाची तीव्रता अधिकच स्पष्ट होते. यापूर्वी लोणावळ्यात २३ जुलै १९९० रोजी २४ तासांत ५७८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी तब्बल १३० वर्षांपूर्वी म्हणजेच २० जुलै १८९६ रोजी एका दिवसात तब्बल ४५८ मिमी पाऊस पडला होता, तर रायगड जिल्ह्यातील भिरा येथे २४ जुलै १९८९ रोजी एकाच दिवसात तब्बल ७१३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. ताम्हिणी येथे नियमित हवामान निरीक्षण केंद्र नसल्यामुळे तेथील पावसाच्या अधिकृत नोंदी उपलब्ध नाहीत. मात्र, इतर उपलब्ध स्रोतांनुसार येथे १९७५ ते २०१३ या कालावधीत २४ तासांत ६९५ मिमी; तर सलग तीन दिवसांत १,०५५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ताम्हिणी घाटात जुलै महिन्यातील पावसाची सरासरी २,६५८ मिमी इतकी आहे. हा आकडा जगातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चेरापुंजीच्या (२,८७६ मिमी) सरासरी पावसाच्या अगदी जवळ आहे. विशेष म्हणजे, पश्चिम घाटाच्या याच पट्ट्यात आणखी काही ठिकाणीही जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. त्यामध्ये शिरगाव (१,९५३ मिमी), आंबवणे (२,११३ मिमी) आणि दावडी (२,२१९ मिमी) या ठिकाणांचा समावेश आहे. या भागांतील सरासरी पावसाचे प्रमाण देशातील सर्वाधिक पावसाच्या प्रदेशांशी स्पर्धा करणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील हे घाटमाथे पावसाचे मुख्य केंद्र बनले असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.