US visa rejection Indian अमेरिकेने गेल्या वर्षभरात इमिग्रेशन धोरण कडक केले आहेत, त्यामुळे अनेकांच्या शिक्षण, नोकरी आणि प्रवासाच्या नियोजनात अडथळे येत आहेत. भारतीयांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक भारतीयांना व्हिसा नाकारण्यात आले आहेत. व्यावसायिक बैठका किंवा गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेला जाणाऱ्या अनेक भारतीय व्यावसायिकांना अमेरिकेकडून व्हिसा नाकारले जात आहेत.
अलीकडेच एका व्यावसायिकाने आपल्याला आलेला अनुभव शेअर केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. दूतावासात झालेली मुलाखत आणि त्यानंतर कोणतेही स्पष्ट कारण न देता अचानक व्हिसा रद्द करण्यात आल्याचा अनुभव अनेक अर्जदारांना आला आहे. व्हिसा नाकारण्याची कारणे काय? व्यावसायिकांना नक्की काय अनुभव आला? त्याविषयी जाणून घेऊयात…
काय आहे नेमकं प्रकरण?
असाच एक अनुभव मंगळवारी धनंजय यादव या भारतीय स्टार्टअप संस्थापकाने शेअर केला आहे. गुंतवणूकदाराचे आमंत्रण असूनही आणि व्यावसायिक भेटीचे स्पष्ट असूनही त्यांना अमेरिकन व्हिसा नाकारण्यात आला. यादव म्हणाले, “मला नियोसॅपियनमधील माझे जवळचे मित्र आणि गुंतवणूकदार पिक्सिसचे सह-संस्थापक हरी वलियाथ यांनी त्यांना आणि संभाव्य भागीदारांना भेटण्यासाठी बोलावले होते.
पिक्सिस ही अमेरिकेत स्थायिक असलेली कंपनी असून त्यांनी २०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभा केला आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, त्यांनी यापूर्वी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे आणि बर्लिनमध्ये काम केले आहे, त्यामुळे अमेरिकेतच राहण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. ते म्हणाले, “जेव्हा मला भेटीच्या उद्देशाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मी ‘गुंतवणूकदारांच्या भेटी आणि B2B भागीदारी, असे कारण सांगितले.”
पगाराचा प्रश्न आणि व्हिसाला नकार
यादव यांनी सांगितले की, जेव्हा व्हिसा अधिकाऱ्याने त्यांच्या पगाराबद्दल विचारले तेव्हा मुलाखतीला वेगळे वळण मिळाले. यादव म्हणाले, “त्यानंतर पगारावर प्रश्न आला. ही भेट कंपनी पुरस्कृत असूनही, एक संस्थापक म्हणून माझा पगार कमी आहे. त्यानंतर लगेचच व्हिसा नाकारण्यात आला,” असे ते म्हणाले. व्हिसा नाकारण्याचे कोणतेही स्पष्ट कारण त्यांना देण्यात आले नाही. यादव हे भारतातील ‘नियोसॅपियन’ या वेअरेबल टेक्नॉलॉजी स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. नियोसॅपियनची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी बर्लिनमध्ये ‘झालँडो’मध्ये सात महिने आणि त्याआधी बंगळुरूमध्ये काम केले आहे.
व्हिसा मुलाखतीत पगाराला महत्त्व का असते?
अर्जदार अमेरिकेत गेल्यावर तिथेच कायमचा राहण्याची शक्यता आहे का, हे तपासण्यासाठी व्हिसा अधिकारी सहसा उत्पन्नाबद्दल विचारतात. व्यावसायिक प्रवासी अनेकदा B1/B2 व्हिसासाठी अर्ज करतात. हा व्हिसा अल्पकालीन भेटीसाठी असतो, पण त्यात नोकरी करण्याची परवानगी नसते. काही प्रवासी परवानगी असलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ देशात राहण्याचा प्रयत्न करू शकतात. या कारणामुळे अमेरिकन अधिकाऱ्यांनी अशा अर्जांची छाननी वाढवली आहे.
यादव यांच्या पोस्टला उत्तर देताना एका वापरकर्त्याने व्हिसा अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनाचे वर्णन केले. “व्हिसा अधिकारी तुमच्या क्षमतेचे मूल्यमापन करत नाहीत. तुम्ही तिथेच थांबून राहण्याच्या जोखमीचे हे मूल्यमापन असते. हे वैयक्तिक नसून केवळ एक प्रक्रिया आहे. पुढच्या वेळी तुमची कागदपत्रे आणि बोलणे हे भारताशी तुमचे असलेले घट्ट संबंध, तुमचा महसूल आणि परत येण्याची खात्री यावर आधारित ठेवा,” असे त्या वापरकर्त्याने लिहिले.
अनेक भारतीयांना व्हिसा नाकारला जाण्याची कारणे
अमेरिकन इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्टच्या कलम २१४(ब) अंतर्गत मोठ्या संख्येने भारतीय अर्जदारांचा व्हिसा नाकारला जातो. जेव्हा व्हिसा अधिकाऱ्याला असे वाटते की, अर्जदाराचे त्याच्या मायदेशाशी असलेले संबंध मजबूत नाहीत, तेव्हा या कलमाचा वापर केला जातो.
यासाठीची काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- आपल्या देशाशी कमकुवत संबंध : जसे की मर्यादित कौटुंबिक संबंध, नोकरीचे अस्थिर स्वरूप किंवा मालमत्तेचा अभाव.
- अत्यंत थोडक्यात होणाऱ्या मुलाखती : या मुलाखतींमध्ये वैयक्तिक किंवा व्यावसायिक परिस्थिती स्पष्ट करण्याची संधी कमी मिळते.
- व्हिसा अधिकाऱ्यांचे व्यक्तिगत मूल्यमापन : व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदाराचा हेतू ठरवण्याचे व्यापक अधिकार असतात.
- वर्क व्हिसा, स्टार्टअप आणि शैक्षणिक प्रोफाइलसह जास्त अर्ज असल्यासही व्हिसा नाकारला जाण्याची शक्यता वाढते.
अमेरिकन कायद्यानुसार, अर्जदाराला हे सिद्ध करावे लागते की त्याच्याकडे व्यावसायिक क्रेडेन्शियल्स किंवा पूर्वीचा आंतरराष्ट्रीय अनुभव असला तरी तो भेटीनंतर आपल्या देशात परत येण्यास बांधील आहे.
व्हिसा नाकारल्या गेलेल्या इतर व्यावसायिकांचा संताप
यादव यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. अनेक स्टार्टअप संस्थापक आणि व्यावसायिकांनी व्हिसा तपासणी प्रक्रियेवर आणि जागतिक व्यावसायिक कामांसाठी प्रवास करताना उद्योजकांना येणाऱ्या आव्हानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वापरकर्त्यांनी अमेरिकन व्हिसा मुलाखतींच्या अनिश्चित स्वरूपाबद्दलदेखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या मुलाखती तर्कावर आधारित नसून मूडवर आधारित असल्याचे म्हटले आहे.
एका वापरकर्त्याने एका परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर इमिग्रेशनमधील एका वाईट अनुभवाचा उल्लेख केला. त्यांची भेट सुट्टीसाठी असल्याचे स्पष्ट करूनही त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. दुसऱ्या एका वापरकर्त्याने सहानुभूती व्यक्त करत त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, प्रदीर्घ विमान प्रवास आणि इमिग्रेशनच्या रांगेनंतर केवळ त्यांच्या बँक खात्यातील निधीचा पुरावा दाखवल्यानंतरच त्या अधिकाऱ्याचे समाधान झाले.
