Mojtaba Khamenei Iran’s New Supreme Leader: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र मोजतबा यांच्याकडे इराणच्या सर्वोच्च नेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोजतबा हे अयातुल्ला अली खामेनी यांचे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ पुत्र आहेत. इराणमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी अमेरिका व इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराण विरोधात युद्ध पुकारले. अमेरिका व इस्रायलने केलेल्या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. त्यामुळे पश्चिम आशियात सध्या युद्ध पेटले आहे. दरम्यान, मोजतबा यांची पत्नी व मुलं देखील हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत.

मोजतबा यांच्या नियुक्तीला ट्रम्प यांचा कडाडून विरोध का?

इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला अमेरिकन प्रशासनाची मंजुरी घ्यावी लागेल, असे विधान काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. “जर त्याने (इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याने) आमच्याकडून मंजुरी घेतली नाही, तर तो फार काळ टिकू शकणार नाही”, असे विधान ट्रम्प यांनी केले होते. इराणच्या सर्वोच्च नेते पदासाठी मोजतबा हे “कमकुवत” व “अमान्य” आहेत, असे ट्रम्प यांनी ‘एक्झिओस’ या वृत्तसंस्थेला म्हटले होते. व्हेनेझुएलात ज्याप्रमाणे मादुरो निकोलस यांना अटक केल्यानंतर डेल्सी रॉड्रिग्ज यांची व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारच्या प्रमुख पदी नियुक्ती केली, त्याचप्रमाणे इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या नियुक्तीत माझा सहभाग हवा, असे ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी “आम्ही आमच्या देशाच्या कामकाजात कोणालाही हस्तक्षेप करू देणार नाही”, असा इशारा अमेरिकेला दिला आहे. मोजतबा अली खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्याचा युद्धावर काय परिणाम होईल? तसेच त्यांची नियुक्ती का करण्यात आली? याबाबत अधिक जाणून घेऊयात.

इराणची राजकीय व्यवस्था आणि मोजतबा खामेनी

इराणच्या राजकीय व्यवस्थेत इराणच्या अध्यक्षांना काही अधिकार देण्यात आले आहेत. तर ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (IRGC) ही इराणमधील शक्तिशाली सशस्त्र सेना आहे. इराणचे सर्वोच्च नेते या राजकीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थानी आहेत. इराणमधील राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च नेत्यांच्या हातात असते. ५६ वर्षीय मोजतबा हे आता इराणचे तिसरे सर्वोच्च नेते आहेत. याआधी अयातुल्ला रुहल्ला खामेनी (१९७९-८९) आणि अयातुल्ला अली खामेनी (१९८९-२०२६) या दोघांनी इराणच्या सर्वोच्च नेते पदाची जबाबदारी पार पाडली. दरम्यान, मोजतबा यांनी कोणतेही राजकीय पद सांभाळलेले नाही, तसेच ते वरिष्ठ धार्मिक नेते देखील नाहीत.

मोजतबा यांची सर्वोच्च नेते पदावर नियुक्ती होण्याचे कारण काय?

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील ‘पश्चिम आशिया अभ्यास केंद्रा’चे माजी प्राध्यापक एके रामकृष्णन यांनी याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली. मोजतबा यांची नियुक्ती होण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे त्यांचा ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’शी व युद्धाशी असलेला थेट संबंध होय, असे रामाकृष्णन म्हणाले. ते म्हणाले, “मोजतबा हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयातून इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या (IRGC) संबंधित कामकाज सांभाळले आहे. सध्या सुरू असलेले युद्ध व त्यांचे IRGC शी असलेले संबंध यांमुळे त्यांची सर्वोच्च नेते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.”

रामकृष्णन म्हणाले, “इराणमध्ये जर युद्ध परिस्थिती नसती तर मोजतबा यांची नियुक्ती कदाचित झाली नसती. त्याचे कारण म्हणजे अयातुल्ला अली खामेनी यांना इराणमध्ये नुकताच झालेला विरोध हे आहे. इराणमध्ये कट्टर नसलेल्या तसेच सुधारणावादी नसलेल्या एखाद्या व्यक्तीची सर्वोच्च नेते पदावर नियुक्ती झाल्याचे पाहायला मिळाले असते. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणी सैन्याच्या हल्ल्यांमुळे नुकतीच आखाती देशांची माफी मागितली. त्यानंतर IRGC ने स्पष्टीकरण देत आखाती देशांमधील फक्त अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचे ठासून सांगितले.”

मोजतबा यांचे इराणी लष्कराशी घनिष्ठ संबंध कसे?

लंडन विद्यापीठातील इस्लामिक व पश्चिम आशिया अभ्यास केंद्राचे संशोधक अली हाशेम यांनी ‘फोरेन पॉलिसी मॅग्झिन’मध्ये मोजतबा व IRGC मध्ये असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले, “मोजतबा यांचे IRGC शी संबंध हे इराण-इराक युद्धापासूनचे आहेत. मोजतबा खामेनी हे तेव्हा हबीब इब्न मजाहीर बटालियनचा हिस्सा होते. ही बटालियन त्यावेळी सशस्त्र दलाला सहकार्य करायची. नंतर ही बटालियन इरानच्या लष्करात म्हणजेच IRGC मध्ये सामाविष्ट करण्यात आली. मोजतबा यांचे त्यावेळचे अनेक सहकारी आज IRGC व इराणच्या गुप्तहेर खात्यात वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. मोजतबा यांच्या या संबंधांमुळेच ते आज इराणचे सर्वोच्च नेते झाले आहेत.”

अयातुल्ला पदवी आणि इराणचे सर्वोच्च नेतेपद

मागील काही वर्षांपासून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पुढील वारसदार कोण होणार, याबाबत चर्चा झडल्यानंतर वेळोवेळी मोजतबा यांचे नाव समोर आले होते. परंतु, अयातुल्ला अली खामेनी हे त्यांच्या वारसदारांऐवजी कुटुंबाबाहेरील अन्य व्यक्तीकडे इराणची जबाबदारी सोपवण्यासाठी इच्छुक होते. मोजतबा हे धार्मिक गुरू नाहीत. त्यांना इराणचे सर्वोच्च नेते तथा सर्वोच्च धार्मिक नेते बनण्यासाठी अयातुल्ला ही पदवी घेणे बंधनकारक नसले तरी आवश्यक मानले जाते. दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी हे ज्यावेळी १९८९ मध्ये इराणचे सर्वोच्च नेते बनले, त्यावेळी ते अयातुल्ला पदाच्या एक पायरी खाली म्हणजेच होज्जत-अल-इस्लाम या पदापर्यंत पोहोचलेले होते. त्यानंतर त्यांनी अयातुल्ला ही पदवी मिळवली होती.

अमेरिका व इस्रायलचा प्रतिकार करण्यासाठी मोजतबांची नियुक्ती?

इराणच्या सर्वोच्च नेते पदाबाबत अमेरिका व इस्रायलकडून वारंवार इराणला इशारा दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोजतबा यांची सर्वोच्च नेते पदावर नियु्क्ती करण्यात आली आहे. इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनी यांच्यासारखेच नेतृत्व कायम राहावे, यासाठी मोजतबा यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या युद्धात इराण शेवटपर्यंत लढा देईल, अशी इच्छाशक्ती असलेली व्यक्ती पाहून मोजतबा यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेते पद सोपवण्यात आल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.