Monsoon Delayed India Kerala Arrival Date IMD : दरवर्षी केरळमध्ये १ जूनपर्यंत नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन होते. यंदा मात्र जूनचा पहिला आठवडा सुरू होऊनही देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका कायम आहे. त्यातच तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून मान्सूनच्या आगमनाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. भारतीय हवामान विभागाने देशात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा भारतात मोसमी पाऊस दाखल होण्यास इतका उशीर का झाला? देशाला उकाड्यापासून दिलासा नेमका कधी मिळणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, त्याविषयी…
मान्सून नेमका कशामुळे लांबणीवर पडला?
यंदा नैऋत्य मान्सूनच्या आगमनास होत असलेल्या विलंबामागे काही महत्वाची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. हवामान स्थितीतील अडथळ्यांमुळे मान्सूनची वाटचाल काहीशी संथ झाली आहे. त्यामुळेच केरळमधील त्याच्या आगमनाला विलंब झाल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सामान्यतः हिंदी महासागराला मान्सूनसाठी आवश्यक हवामान प्रणालींचा ‘कारखाना’ मानले जाते. या महासागरातील उबदार पाण्यामुळे पावसाचे ढग आणि कमी दाबाचे पट्टे तयार होतात, उत्तरेकडे सरकल्यानंतर भारतात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. मात्र, सध्या हिंदी महासागरातील मान्सून निर्मितीची ही नैसर्गिक यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचे दिसून येत आहे. उपग्रहांच्या छायाचित्रानुसार, भारताच्या दक्षिणेकडील समुद्रात सध्या आकाश पूर्णपणे निरभ्र आहे. तिथे पावसाच्या ढगांची किंवा कमी दाबाच्या प्रणालींची अद्याप निर्मिती झालेली नाही. समुद्रात नवीन प्रणाली तयार होऊन ती उत्तरेकडे सरकल्याशिवाय मान्सूनचे वारे पूर्ण ताकदीने भारताच्या मुख्य भूभागात प्रवेश करू शकत नाहीत. सध्या नेमकी याच गोष्टीची कमतरता जाणवत आहे.
तज्ज्ञांनी नेमकी कोणकोणती कारणे सांगितली?
तज्ज्ञांच्या मते, समुद्राच्या पाण्यावर तयार होणारी ‘अभिसरण’ प्रवाहाची’ प्रक्रियाही सध्या कमकुवत आहे. पाऊस पाडणारे ढग एकत्र येण्यासाठी आणि त्यांची मोठी साखळी निर्माण होण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, समुद्रावर ही हालचाल मर्यादित असल्यामुळे पावसाचे ढग वेगाने तयार होऊ शकलेले नाहीत. परिणामी, मान्सूनच्या प्रवाहाला अंतर्गत भूभागाकडे पुढे जाण्यासाठी आवश्यक गती मिळालेली नाही. देशातील काही भागांत सध्या तुरळक ठिकाणी ‘मान्सूनपूर्व’ पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना काही काळासाठी उकाड्यापासून दिलासा मिळत असला, तरी या पावसाला मान्सूनचे अधिकृत आगमन मानता येत नाही. मान्सूनच्या अधिकृत आगमनासाठी केवळ अधूनमधून होणारा पाऊस पुरेसा नसतो. त्याऐवजी व्यापक क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि नियमित पर्जन्यवृष्टी होणे आवश्यक असते. सध्या ही सातत्यपूर्ण प्रक्रिया दिसून येत नसल्याने मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्याचे मानले जात आहे.
मान्सूनची अधिकृत घोषणा केव्हा केली जाते?
केवळ पाऊस पडणे म्हणजे मान्सून दाखल झाला असे मानले जात नाही. मान्सूनच्या अधिकृत आगमनाची घोषणा करण्यासाठी भारतीय हवामान विभागाला काही वैज्ञानिक निकषांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी सर्वप्रथम हवामान विभागाने निश्चित केलेल्या ठराविक केंद्रांवर सर्वदूर आणि सलग पाऊस पडणे आवश्यक असते. मात्र, सध्या पडणारा पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपाचा असून अधूनमधून पडत आहे. दुसरा महत्वाचा निकष म्हणजे- मान्सूनसाठी अरबी समुद्रावरून भारताच्या मुख्य भूभागाकडे वाहणारे पश्चिमी वारे अत्यंत वेगवान आणि शक्तिशाली असणे गरजेचे असते. हे वारे समुद्रातील बाष्प ओढून भारतात आणतात. मात्र, यंदा ते अपेक्षेपेक्षा खूपच कमकुवत आहेत. वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे बाष्पाचा पुरवठा कमी झाला असून, त्याचा थेट परिणाम मान्सूवर झाला आहे. तिसरा निकष म्हणजे- मान्सूनसाठी समुद्रावर दाट आणि उंच ढगांची निर्मिती होणे आवश्यक असते, ज्याची नोंद उपग्रहाद्वारे ठेवली जाते. मात्र, सध्या समुद्रावर अशी स्थिती सातत्याने दिसून आलेली नाही. या व्यतिरिक्त अरबी समुद्रावरील वाऱ्यांच्या चक्राकार गतीत अडथळे निर्माण झाल्यामुळे मान्सूनला पुढे ढकलणारी मजबूत यंत्रणा तयार होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे तिन्ही निकष एकाच वेळी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हवामान विभाग अधिकृतपणे मान्सून जाहीर करत नाही.
यंदा भारतात किती पाऊस पडणार?
भारतात मान्सून लांबण्यामागे केवळ स्थानिक हवामानच नाही, तर जागतिक पातळीवरील मोठ्या घडामोडी कारणीभूत आहेत. प्रशांत महासागरामध्ये निर्माण होत असलेली ‘अल निनो’ ही स्थिती भारतीय मान्सून कमकुवत करत असल्याचे समोर आले आहे. अल निनोमुळे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान वाढते. त्यामुळे जागतिक वातावरणीय चक्रात बदल होतात. भारताच्या बाबतीत या बदलांचा परिणाम मान्सूनच्या वाऱ्यांच्या ताकदीवर आणि पावसाच्या वितरणावर होतो. साधारणपणे अल निनोच्या काळात मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि पावसाचे प्रमाण तसेच सातत्य कमी होण्याची शक्यता असते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी आहे. याचाच अर्थ मान्सून पूर्णपणे अपयशी ठरेल असा नाही, तर देशातील विविध भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत असमान राहू शकते.
मान्सूनचे केरळमध्ये आगमन कधी?
हवामान विभागाने सुरुवातीला मान्सून २६ मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात हवामानाची स्थिती कमकुवत झाल्याने हा अंदाज खरा ठरला नाही. तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी उंचीवरील कमकुवत वारे आणि व्यापक वातावरणीय चक्रातील व्यत्यय यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली. तसेच लक्षद्वीप बेटांजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मान्सूनची प्रणाली मजबूत होण्यात अडथळे आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मान्सूनचे आगमन फार दूर नसल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या हवामानाची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत असून येत्या काही दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो टप्प्याटप्प्याने देशाच्या उत्तरेकडे सरकतो आणि साधारणतः जुलैच्या मध्यापर्यंत देशातील बहुतांश भाग व्यापतो. मात्र, हा प्रवास किती वेगाने होईल हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची स्थिती आणि ढगांची प्रणाली किती लवकर स्थिर होते यावर अवलंबून असेल. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपणार असली, तरी संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामात पाऊस कसा पडतो, यावर हवामान विभागाचे बारीक लक्ष असणार आहे.
