Why Monsoon is Delayed in Maharashtra : मान्सूनच्या हंगामाला अधिकृतपणे सुरुवात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरीही राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मोसमी पावसाच्या आगमनाची शेतकरी वाट पाहत असतानाच मागील चार दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत उन्हाचा कडाका पडला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. त्यातच काही ठिकाणी जाणवत असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे तहानलेल्या गावांना पाणी पुरवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊ नेमका कधी कोसळणार, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. यादरम्यान हवामान खात्याने मान्सूनबाबत नवीन अपडेट दिली आहे, त्याविषयी…
देशात आतापर्यंत किती पाऊस पडला?
गेल्या पंधरवाड्यात देशभरात सरासरीपेक्षा तब्बल ३८ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. साधारणत: जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतात वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडतो. देशात दरवर्षी मान्सूनचे आगमन केरळमार्गे होते आणि त्यानंतर तो वेगवेगळ्या टप्याटप्याने मार्गक्रमण करतो. जूनच्या अखेरीस उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशांपर्यंत मान्सून पोहोचतो आणि साधारणपणे १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापून टाकतो. मात्र, मान्सूनचे लवकर किंवा वेळेवर आगमन होणे म्हणजे देशात नेहमीच चांगला पाऊस पडेल, याची कोणतीही हमी नसते. त्याचप्रमाणे मान्सून उशिरा दाखल झाला तरी पावसाची एकूण कामगिरी खराबच राहील, असेही नसते. यंदा मान्सूनने सुरुवातीला वेगाने प्रगती केली असली, तरी जूनच्या पहिल्या पंधरवड्यानंतर त्याची गती मंदावली आहे. परिणामी देशातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, सरासरी पर्जन्यमानात मोठी तूट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा मान्सूनची वाटचाल कशी राहिली?
यंदा ४ जून रोजी केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर सलग चार दिवस मान्सूनने वेगाने प्रगती केली. कर्नाटक आणि गोव्यासह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांमध्ये त्याने लवकर प्रवेश केला. मात्र, ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले. जूनच्या सुरुवातीला केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, लक्षद्वीप तसेच संपूर्ण ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढला होता. मात्र, ही स्थिती फार काळ टिकली नाही. १० जूनपर्यंत दक्षिण-पश्चिम भारतात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. दुसरीकडे- महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा आणखीनच लांबणीवर पडली आहे. राज्यात मान्सून नेमका कधी सक्रिय होणार याचे कोणतेही स्पष्ट संकेत अद्याप मिळालेले नाहीत.
राज्यात मान्सूनची वाटचाल रखडलेलीच
८ जून रोजी मान्सूनने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हजेरी लावली होती, हीच या हंगामातील त्याची शेवटची प्रगती ठरली आहे. एकंदरीत बंगालच्या उपसागराच्या शाखेच्या तुलनेत यंदा मान्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेची प्रगती संथ गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. १७ जूनपर्यंत बंगालच्या उपसागराच्या शाखेने कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई आणि मुझफ्फरपूरपर्यंतचा भाग व्यापला होता. ८ जूननंतर मान्सूनची घोडदौड प्रामुख्याने पूर्व भारताच्या दिशेने सुरू राहिली. १५ जून रोजी मान्सूनने आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग व्यापत पुढे कूच केली. मात्र, पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, मान्सूनची पुढील वाटचाल अद्यापही रखडलेलीच आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची गती का मंदावली?
राज्यात मान्सूनची प्रगती मंदावण्यामागे अनेक हवामानविषयक कारणे जबाबदार असल्याचे सांगितले जाते. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या आगमनानंतर अरबी समुद्रातून वाहणारे मान्सूनचे वारे कमकुवत झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे आणि राज्याच्या अंतर्गत भागांकडे ओलावा वाहून नेण्याची प्रक्रियाही कमी झाली आहे. याउलट उत्तर आणि वायव्य दिशेकडून येणारे कोरडे वारे अधिक प्रभावी ठरत आहेत. हे वारे समुद्रातील बाष्प भारताच्या भूभागाकडे खेचून आणतात आणि नैऋत्य मोसमी पावसाची घोडदौड चालू ठेवण्यास मदत करतात. मात्र, सध्या ते कमकुवत झाल्याने मान्सूनचा वेग मंदावला आहे. मान्सूनचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याची प्रगती होण्यासाठी इतर पूरक हवामान प्रणालींचा पाठिंबा आवश्यक असतो. त्यामध्ये अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे, चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होणे किंवा पश्चिम किनारपट्टीला समांतर असा कमी दाबाचा पट्टा तयार होणे गरजेचे असते. या सर्व प्रणाली मान्सूनला पुढे सरकण्यास गती देतात, परंतु सध्यातरी या सर्व प्रणाली पूर्णपणे गायब असल्यामुळे मान्सूनची प्रगती ठप्प झाली आहे.
मान्सूनची पुढील प्रगती कधी होणार?
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (१८ जून) दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २४ जूनपर्यंत मान्सूनसाठी पोषक परिस्थिती कमकुवतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील काही भाग आणि ईशान्य भारत वगळता देशातील बहुतांश प्रदेशांमध्ये पुढील आठवडाभर पावसाची स्थिती सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये मात्र पावसाची स्थिती जवळपास सामान्य राहू शकते, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्यात पाऊस नेमका कधी पडणार?
हवामान विभागाने १७ जून रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, कोकणात २४ आणि २५ जूनदरम्यान काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मात्र, राज्यातील उर्वरित भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत या अंदाजात कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सूनची गती वाढण्यासाठी आवश्यक असलेले हवामान घटक अद्याप सक्रिय नसल्याने पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता २४ जूननंतरच्या हवामान परिस्थितीकडे लागले आहे.
