DINK lifestyle Indian couple आज मूल जन्माला घालणे, त्यांचे संगोपन करणे म्हणजे केवळ प्रेम आणि काळजीचा भाग राहिलेले नाही. त्यासाठी जोडपी आता स्मार्ट प्लॅनिंग आणि बजेटिंगकडे लक्ष देतात. बाळ जन्माला येण्यापूर्वीच आई-बाबा आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या दैनंदिन बचतीचा विचार करू लागतात. मुलांना लहानाचे मोठे करून स्वावलंबी करण्याचा खर्च जसा वाढत चालला आहे,तशी अनेक जोडपी पालकत्वाच्या निर्णयाबद्दल विचार करू लागले आहेत. त्यामुळे डिंक कपलची (DINK — Double Income, No Kids) जीवनशैली आज अनेक जण स्वीकारताना दिसत आहेत. एकेकाळी प्रामुख्याने पाश्चात्त्य मानली जाणारी ‘डिंक’ ही संकल्पना आता भारतातही दिसू लागली आहे. तसेच, मुले न होऊ देण्याचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांची संख्या भारतातही वाढत आहे. या बदलामागे आर्थिक वास्तव, भावनिक विचार, पर्यावरणीय चिंता आदी अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हाच विषय सविस्तर समजून घेऊयात…

विवाहित जोडपी मूल जन्माला घालणं का टाळताहेत?

अनेकांकडून मुले न होण्याचा निर्णय जगातील कठोर वास्तवामुळे घेतला जातो. उद्योजक निमिष रस्तोगी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले, “हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.” दिल्लीत काम करणाऱ्या एका व्हिडीओ जर्नलिस्टनेही अशाच चिंता व्यक्त केल्या. ते म्हणाले, “नैसर्गिक संसाधने कमी होत आहेत. प्रत्येक गोष्ट महाग होत जाणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे अनेक महिने आपण नीट श्वासही घेऊ शकत नाही, अशी स्थिती आणि उरलेला काळ उष्णतेने त्रासलेलो असतो. अशा जगात तुम्ही मुलाचे संगोपन कसे करणार?”

मुले आणि काम यांचा समतोल

नोकरी करणाऱ्या अनेक जोडप्यांना मुलाचे संगोपन करणे ही एक अशक्यप्राय बाब वाटते. निमिष रस्तोगी सांगतात, “काम, घर आणि मूल यांच्यात समतोल साधणे अवघड आहे. आपल्या स्वतःच्या आवडी-निवडी आणि जीवनशैली यांच्याशी फारशी तडजोड न करता, जीवनातील सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आर्थिक सुबत्तेची गरज असते.” माध्यम व्यावसायिक अनुराग कुमार सांगतात की, वेळेचा अभाव आणि कामाचा ताण यांमुळेही हा निर्णय घेतला जातो. कारण- घर सांभाळून दैनंदिन कामं करणं हे आधीच आव्हानात्मक आहे.

कुटुंबाची भूमिका

अनेकांना कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याशिवाय मुलाचे संगोपन करणे खूप कठीण वाटते. अनुराग कुमार सांगतात, “जोपर्यंत कुटुंबाचा खंबीर पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत मुलाला एकट्यानं वाढवणं अशक्य वाटतं.” तर, काहींना सततच्या देखरेखीचा कंटाळा येतो. “कोणीतरी सतत माझ्या कामात डोकावणं माझ्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही,” असेही अनेकांचे मत आहे. ही संकल्पना त्यांच्या सध्याच्या जगण्याशी जुळणारी नाही.

वैयक्तिक पसंती

अनेक जोडप्यांसाठी वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनशैली यांचा समतोल राखणे ही मुले न होण्याच्या निर्णयातील महत्त्वाची भूमिका आहे. निमिष रस्तोगी सांगतात, “आम्हाला आमचे स्वातंत्र्य मनापासून आवडते. सध्या ही जीवनशैली आम्हाला समाधानकारक आणि संतुलित वाटते.” अनुरागने सांगितले, “मुलाला जन्म देण्याचा निर्णय शेवटी त्या जोडपे, त्यांचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन, सद्य:स्थिती आणि भविष्याकडे ते कसे पाहतात यांवर अवलंबून असतो.”

महागडी शिक्षण व्यवस्था

मुले न होण्याचा निर्णय घेण्यामागे व्यावहारिक कारणेही वाढत आहेत. मुलांचे संगोपन, शाळा, आरोग्य सेवा आणि घरांच्या वाढत्या किमतींकडे दुर्लक्ष करणेही कठीण झाले आहे. दिल्लीतील एका व्हिडीओ जर्नलिस्टने सांगितले, “मी एका कॅथॉलिक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले आणि माझी क्वार्टरली ट्यूशन फी १८०० रुपये होती. आज १८०० रुपयांत काय मिळते? कोविड-१९ दरम्यान माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर चार महिने मी नोकरीशिवाय होतो. विचार करा- जर तेव्हा माझे मूल शाळेत असते, तर तो काळ किती कठीण गेला असता.” निमिष रस्तोगी यावर म्हणाले, मुलांच्या देखभालीचा खर्च, त्याचबरोबर चांगल्या शाळा मिळविण्यासह एकंदर शिक्षण आता खूप महाग झाले आहे, तसेच आरोग्य सेवेच्या वाढत्या खर्चासह दैनंदिन खर्चदेखील वेगाने वाढत आहेत.”

मुलाचे संगोपन करण्यासाठी नेमका किती खर्च येतो?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ?मूल जन्माला आल्यापासून ते २१ वर्षांचे होईपर्यंतच्या संगोपनासाठी अंदाजे खर्च ७४.३ लाख रुपये येतो आणि विशेष बाब म्हणजे त्यात महागाईचा विचार केला गेलेला नाही. रोहित सरन यांनी त्यांच्या ‘100 Ways to See India’ या पुस्तकात स्पष्ट केले आहे की, तीन टक्के वार्षिक महागाई दर गृहीत धरल्यास हा एकूण खर्च अंदाजे १.१६ कोटी रुपये होतो. सहा टक्के महागाई दर असल्यास हा आकडा आणखी वाढून १.८३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, “मी माझ्या मुलीसाठी स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी सुरू केला आहे, जेणेकरून तिचे उच्च शिक्षण, नवीन कौशल्ये किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे जमा होतील.”

हे निर्णय केवळ मोठ्या रकमेपुरते मर्यादित नाहीत. त्यांचा दैनंदिन खर्चावरही परिणाम होतो. सध्याच्या गरजा आणि भविष्य यांचा समतोल राखण्यासाठी शिक्षण, घर, मनोरंजन, कपडे, अन्न व आरोग्यापर्यंत प्रत्येक खर्चाचा विचार करावा लागतो. पालकत्वाचा भाग म्हणून अनेकदा स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागतो. एका पालकाने सांगितले, “जेव्हा तुम्हाला माहीत असते की, तुमच्या मुलाला अभ्यासासाठी लॅपटॉपची गरज आहे, तेव्हा तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी मागे ठेवून त्या गरजेला प्राधान्य द्यावे लागते.”

  • शिक्षण : ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार मुलाच्या संगोपनाच्या एकूण खर्चापैकी निम्म्याहून अधिक खर्च केवळ शिक्षणावर होतो. एकूण खर्चाच्या किमान ५९ टक्के वाटा शिक्षणाचा असतो. शाळा प्रवेश, वार्षिक फी, गणवेश, पुस्तके, खासगी कोचिंग हे खर्च वाढतच जातात.
  • घर : संगोपनाच्या खर्चाच्या सुमारे १० टक्के वाटा घरासाठी जातो. कारण- अनेक पालक मोठ्या आणि सुरक्षित घरांमध्ये राहणे पसंत करतात.
  • मनोरंजन : एकूण खर्चाच्या सुमारे नऊ टक्के वाटा मनोरंजनावर खर्च होतो आणि किशोरवयात हा खर्च झपाट्याने वाढतो. सुरुवातीला खेळणी आणि वाढदिवसाच्या पार्ट्यांवर होणारा खर्च नंतर स्मार्टफोन, लॅपटॉप, स्पोर्ट्स कोचिंग आणि मित्रांबरोबरच्या सहलींमुळे वाढत जातो.
  • कपडे : कपड्यांवर एकूण खर्चाच्या सुमारे सहा टक्के खर्च होतो. त्यामध्ये दैनंदिन कपडे, शाळेचा गणवेश आणि बूट यांचा समावेश असतो.

शिक्षणावरील खर्चाचे सर्वेक्षण

नॅशनल सॅम्पल सर्व्हे (एनएसएस) २०२५ च्या सर्वेक्षणानुसार, भारतातील कुटुंबे शालेय शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत.

  • सरकारी आणि खासगी शाळा : भारतात आजही सर्वाधिक विद्यार्थी (५५.९%) सरकारी शाळांमध्ये शिकतात; मात्र खर्चात मोठी तफावत आहे. सरकारी शाळेत प्रति विद्यार्थी सरासरी खर्च २,८६३ रुपये आहे; तर निम-सरकारी/खासगी शाळांमध्ये हा खर्च २५,००२ रुपये आहे.
  • खासगी कोचिंग : देशभरातील सुमारे २७ टक्के विद्यार्थी खासगी कोचिंग घेतात. शहरी कुटुंबे कोचिंगवर सरासरी ३,९८८ रुपये खर्च करतात; तर ग्रामीण भागात हा खर्च १,७९३ रुपये आहे.
  • परदेशात शिक्षण : एचएसबीसीच्या ‘क्वॉलिटी ऑफ लाइफ रिपोर्ट २०२४’ नुसार, ९० टक्के भारतीय पालकांना आपल्या मुलाला परदेशात शिकवायचे आहे. मात्र, अमेरिका किंवा ब्रिटनसारख्या देशांतील तीन ते चार वर्षांच्या पदवीचा खर्च खूप जास्त आहे.

बाळांऐवजी पाळीव प्राण्यांना पसंती

अनेक जोडपी आता मुलांऐवजी पाळीव प्राण्यांना पसंती देत आहेत. या जोडप्यांसाठी ही निवड व्यावहारिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरूपाची आहे. पाळीव प्राण्यांमुळे आर्थिक ताण निर्माण होत नाही आणि त्यांचा सहवास मिळतो. दिल्लीतील व्हिडीओ जर्नलिस्टने सांगितले, “एकदा तुम्ही कुत्रा घेतला आणि तो निरोगी असेल, तर त्याच्या आयुष्याचा खर्च निश्चित असतो. पण, मुलाच्या बाबतीत खर्च वाढतच जातो आणि तो कधीच थांबत नाही.” अनुराग म्हणाला, “माझ्या बहुतेक विवाहित मित्रांनी मुलांचे नियोजन केले आहे; पण मी कुत्र्याला सांभाळण्याचा निर्णय घेणारा एकमेव आहे.” निमिष रस्तोगी म्हणाले, “आम्ही आमच्या स्वातंत्र्याला महत्त्व देतो. आम्हाला फिरणे आणि आमच्या कुत्र्यांबरोबर वेळ घालवणे आवडते, ती आमची मुलेच आहेत. आमच्यासाठी ही जीवनशैली सध्या परिपूर्ण आहे.”