जगभरात वर्षाला फक्त ९ टक्के प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया होते, त्यामुळे प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढत्या संकटातून आपण पुनर्प्रक्रियेद्वारे बाहेर पडू ही दंतकथा वाटते. जगभरातील जवळपास ८५ टक्के वापरलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढिग हे फक्त जमीन व्यापत आहेत. ग्रीनपीस या संस्थेच्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स हा जगातला सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारा देश आहे. २०२१ साली घरगुती कचऱ्यातून निर्माण झालेल्या ५० दशलक्ष टन प्लास्टिकच्या कचऱ्यातून केवळ पाच टक्के प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. ग्रीनपीस ही पर्यावरणवादी बिगर सरकारी संस्था असून तिची स्थापना १९७१ साली कॅनडा येथे झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०६० पर्यंत जगभरातील प्लास्टिक उत्पादन हे आतापेक्षा तिप्पट होईल. कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायूपासून बनवलेले प्लास्टिक हे प्रदूषणाला चालना देणारे असून कार्बन उत्सर्जनाचा प्रमुख स्रोत आहे. जमिनीवर ज्याप्रकारे प्लास्टिकचा कचरा दिसतोय, त्याप्रमाणेच तो समुद्रातही मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. ज्यामुळे सागरी जीवनही धोक्यात आलेले आहे, असे ग्रीनपीसचे निरीक्षण आहे.

नेसले (Nestle) आणि डॅनोन (Donone) या प्लास्टिकबंद खाद्यपदार्थ विकणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. सर्वाधिक प्लास्टिक उत्पादित करणाऱ्या या कंपन्यानी पुर्नप्रक्रिया केलेले प्लास्टिक वापरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्णपणे अमलात आलेले नाही. ऑस्ट्रिया ते स्पेन देशापर्यंतची प्लास्टिक लॉबी मग यात सुपरमार्केट्स देखील आले, ही लॉबी प्लास्टिक, प्लास्टिक बाटल्या यांच्याबाबत डिपॉझिट रिटर्न स्किम (DRS) राबविण्यास टाळाटाळ करतात. (डीआरएस योजनेनुसार प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेत असताना ग्राहकाकडून अधिकची रक्कम घेतली जाते. रिकामी बाटली पुन्हा आणून दिल्यास, उरलेले पैसे ग्राहकाला परत दिले जातात.)

काही दिलासादायक गोष्टी होत आहेत. नव्या वैश्विक प्लास्टिक नियमावलीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर प्लास्टिक उत्पादनाबाबत करार करण्यात येत आहे. ज्यामुळे यापुढे प्लास्टिकचा वापर आणि पुर्नवापर यावर आधारीत गोलाकार अर्थव्यवस्थेचे मॉडेल (Circular Economy Model) उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे असले तरी गोलाकार प्लास्टिक डिझाईन हे पुन्हा पुनर्प्रक्रियेच्या दंतकथेवरच आधारीत असणार आहे. जे की सध्या वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाला कमी करण्यास उपयोगी ठरलेले नाही.

सात प्रकारच्या प्लास्टिकला वेगळे काढणे अवघड

प्लास्टिक उत्पादनाचे मुख्यत्वे सात प्रकार आहेत. एका प्रकारचे प्लास्टिक दुसऱ्या प्रकारच्या प्लास्टिकसोबत पुर्नप्रक्रिया करता येत नाही. तसेच पुर्नप्रक्रियेसाठी प्लास्टिकच्या कचऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण करणे, ही मोठी खर्चिक बाब आहे. पेट (PET) म्हणजेच पॉलिथिलीन टेरेफ्थालेट (Polyethylene terephthalate) हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे पास्टिक आहे. या प्रकारच्या प्लास्टिकवर #1 हा कोड लिहिलेला असतो. हाय डेनसिटी पॉलिथिलीन (High-Density Polyethylene – HDPE) या प्रकारच्या प्लास्टिकचा कोड #2 आहे. त्यामुळे त्याला वेगळे करणे सोपे जाते. तर इतर पाच प्रकारच्या प्लास्टिकला वेगळे करण्याचे आणि मग त्यावर पुर्नप्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी आहे, असे ग्रीनपीसच्या अभ्यासातून समोर आले.

हे वाचा >> विकत घेतलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे की विषारी कसे ओळखाल? फक्त ‘हा’ कोड लक्षात ठेवा…

पेट हे सर्वाधिक पुर्नप्रक्रिया करण्यात येणारे प्लास्टिक आहे. तसेच त्याच्या उपउत्पादनाची मोठी बाजारपेठ आहे. जसे की, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारी कटेंनर्स किंवा कपड्यांसाठी लागणारे फायबर. मात्र सात प्रकारच्या प्लास्टिकमध्ये ३ ते ७ क्रमांकावर असलेल्या प्लास्टिकची पुर्नप्रक्रिया फार होत नाही. कारण पुर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकपेक्षा नव्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल अधिक स्वस्त आहे.

ग्रीनपीसच्या प्लास्टिक विरोधी मोहीमेच्या यूसएसमधील लिझा राम्सडेन म्हणाल्या की, सर्व प्लास्टिकचे वर्गीकरण करून त्यावर पुर्नप्रक्रिया करणे हे अवघड काम आहे. मिश्र प्लास्टिक एकत्र करून पुर्नप्रक्रिया करणे म्हणजे एकूणच पुर्नप्रक्रियेची प्रक्रिया बिघडते. लिझा सांगतात की, पुर्नप्रक्रिया करणे ही समस्या नसून प्लास्टिक हीच मूळ समस्या आहे. नव्या प्रकारचे व्हर्जिन प्लास्टिक (virgin plastic) हे पुर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकपेक्षाही अधिक स्वस्त आहे. त्यामुळे प्लास्टिकची पुर्नप्रक्रिया करणे हे अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून परवडणारे नाही.

व्हर्जिन प्लास्टिक स्वस्त का आहे?

पुर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकपेक्षाही इतर प्लास्टिक अधिक स्वस्त असल्यामुळे पुर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिक वापरावर मर्यादा येत आहेत. न्यूयॉर्क मधील बाजार विश्लेषक एस अँड पी ग्लोबर यांच्या माहितीनुसार, पुर्नप्रक्रिया केलेल्या कच्च्या प्लास्टिकची मागणी कमी होत आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. जसे की, आशियातून पुर्नप्रक्रिया केलेले प्लास्टिक आणण्यासाठी लागणारा खर्च. तसेच आशिया आणि आफ्रिकेमधील देशांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना बंदी असल्यामुळे पुर्नप्रक्रिया करण्यासाठी कमी गुंतवणूक केली जाते. यामुळेच जागतिक स्तरावर पुर्नप्रक्रिया करण्याच्या दरात वाढ झालेली आहे.

हे वाचा >> धोक्याची घंटा! मानवी रक्तात मिसळतंय प्लास्टिक, ८० टक्के लोकांमध्ये दिसून आलं मायक्रोप्लास्टिक

त्या तुलनेत व्हर्जिन प्लास्टिकची किंमत ही कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीनुसार खाली-वर होत असते. जीवाश्म इंधनाला मिळणाऱ्या अनुदानामुळेही व्हर्जिन प्लास्टिकची किंमत ठरत असते. अमेरिकेत नव्या प्लास्टिक अर्थव्यवस्थेची सुरुवात करणाऱ्या ‘द एलन मॅकआर्थर फाऊंडेशन’च्या सँडर डेफ्रूट यांनी सांगितले की, जर जीवाश्म इंधनावरील अनुदान काढून टाकले तर पुर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकचा वापर अधिक स्पर्धात्मक होईल. सँडर डेफ्रूट पुढे म्हणाले की, युरोपमधील जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये निर्मात्यांची जबाबदारी निश्चित (principle of extended producer responsibility – EPR) करून पुर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकला अनुदान दिल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. घनकचरा पुर्नप्रक्रिया योजनेला सवलती दिल्यामुळे याठिकाणी पुर्नप्रक्रिया योजना यशस्वी होताना दिसत आहेत.

हलके प्लास्टिक पुर्नप्रक्रियेस सुलभ नाही

डेफ्रूट यांनी सांगितले की, चिप्स आणि चॉकलेटचे पॅकेजिंग करण्यासाठी हलके प्लास्टिक (Flexible packaging) वापरले जाते. यामुळे हे पदार्थ ताजे राहतात. जगातील प्लास्टिक पॅकेजिंगपैकी ४० टक्के वाटा या हलक्या प्लास्टिकचा आहे. एकट्या युकेमध्ये २१५ कोटी वस्तूंना गुंडळण्यासाठी या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर होतो. फक्त पाच युरोपियन देशांमध्ये या हलक्या प्रास्टिकवर पुर्नप्रक्रिया केली जाते. तर यूएसमध्ये २०२० साली फक्त दोन टक्के हलक्या प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया करण्यात आली. जर हे प्लास्टिक एकत्र केले नाही किंवा जाळून नष्ट केले नाही. तर ते पर्यावरणात मिसळण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यानंतर ते गोळा करणे अवघड आहे.

डेफ्रूट पुढे म्हणाले की, बहुस्तरीय रचना असल्यामुळे काही प्लास्टिकची पुर्नप्रक्रिया करणे खूप खर्चिक होऊन जाते. हलके प्लास्टिक ज्याला Flexible packaging म्हणतो हे देखील खाद्यपदार्थासाठी वापरल्यामुळे दुषित झालेले असते. त्यामुळे त्याचीही पुर्नप्रक्रिया करण्यास अडथळे निर्माण होतात. दुसऱ्या बाजूला पॅकेजिंग उद्योगाचे म्हणणे आहे की, फ्लेक्जिबल पॅकेजिंग हे पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. इतर कडक प्लास्टिकपेक्षा ते वजनाला हलके आहे, त्यामुळे त्याचा दळणवळणाचा खर्च कमी येतो. तसेच ते खाद्यपदार्थाला दिर्घकाळ ताजेतवाणे ठेवते. फ्लेक्जिबल पॅकेजिंग उद्योगाने गोलाकार अर्थव्यवस्थेचा अवलंब करत पुर्नप्रक्रिया वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

प्लास्टिकवर बंदी घालणे हा उपाय असू शकतो?

२०२२ साली एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये ३४ देशांतील २३ हजार लोकांचे प्लास्टिक बंदीबाबत मत जाणून घेण्यात आले. त्यापैकी ८० टक्के लोकांनी सांगितले की, जे प्लास्टिक पुर्नप्रक्रिया करण्यासाठी सुलभ नाही, त्यावर बंदी घातली पाहिजे. आंतरराष्ट्रीय संवर्धन संघटना WWF आणि ऑस्ट्रेलियातील प्लास्टिक फ्री फाऊंडेशन या दोन संस्थांनी हा सर्व्हे घेतला होता. या संस्थाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, जागतिक स्तरावरील प्लास्टिक कचऱ्याची समस्या कमी करायची असेल, तर जे अति धोकायदायक आणि संकट निर्माण करत असलेले एकदाच वापरात येणारे प्लास्टि आहे, त्यावर बंदी घातली पाहिजे. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकसोबतच मासेमारी करण्याचे साहित्य, मायक्रोप्लास्टिकचा यामध्ये समावेश आहे.

युरोपियन युनियनने याबद्दल काही पावले उचलली आहेत. त्यांनी १० प्रकारचे एकदाच वापर करता येणारे प्लास्टिक उत्पादने बंद केली आहेत. तसेच २०३० पर्यंत गोलाकार अर्थव्यवस्थेचा (circular economy model) स्वीकार करत पुर्नप्रक्रिया केलेले प्लास्टिक वापरण्याचे ध्येय निश्चित केले आहे. दरम्यान ३० आफ्रिकन देशांनी पूर्णपणे किंवा अशंतः हलक्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why most plastic cant be recycled kvg
First published on: 19-03-2023 at 12:43 IST