व्हेनेझुएलामध्ये मागील आठवड्यात बुधवारी (२४ जून) लागोपाठ आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. पाच दिवसांनंतरही ढिगाऱ्याखालून जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून तो १४५० च्या पार गेला आहे. व्हेनेझुएलातील भूकंपानंतर पुढील काही दिवसांत वेगवेगळ्या देशांना भूकंपाचे धक्के बसले. मागील पाच दिवसांत भूगर्भशास्त्रज्ञांनी जपान, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे सात भूकंपांची नोंद केली आहे. या भूकंपांचा एकमेकांशी काही संबंध आहे की हा केवळ योगायोग आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या ५ दिवसांत जगाने किती भूकंप अनुभवले?
२४ जूनच्या संध्याकाळी, ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप व्हेनेझुएलामध्ये अवघ्या ३९ सेकंदांच्या अंतराने आले. या दुर्मिळ ‘अर्थक्वेक डबलेट’मुळे (लागोपाठ आलेले दोन भूकंप) काराकास आणि ला ग्वायरा या भागांत प्रचंड पडझड झाली. इमारती कोसळल्या, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करावे लागले. यात मृतांचा आकडा १,४५० च्या पुढे गेला असून जवळजवळ २०० इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. परंतु, अजूनही ढिगाऱ्याखालून जिवंत लोकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश येत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या देशाला हादरवून सोडणाऱ्या या महाभयंकर दुर्घटनेत हे बचावकार्य आशेचा एक किरण ठरत आहे. व्हेनेझुएलातील या विनाशकारी भूकंपानंतर जगाच्या इतर भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले.
याची सुरुवात अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियातून झाली. ‘युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे’ (USGS) च्या माहितीनुसार, २४ जून रोजी कॅलिफोर्नियात ५.६ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे संपूर्ण ‘बे एरिया’मध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २५ जून रोजी जपानमध्ये ७.२ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. मुख्य बेट असलेल्या होन्शूवरील इवाते प्रांताच्या समुद्रात झालेल्या या भूकंपामुळे शेकडो किलोमीटर दूर असलेल्या टोकियो शहरातही धक्के जाणवले. दरम्यान, जपानला त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. ‘जपान मेटेओरोलॉजिक एजन्सी’ने (JMA) सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी सांगितली होती, परंतु नंतर त्यात सुधारणा करून ती ७.२ असल्याचे स्पष्ट केले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ४४ किलोमीटर खोलीवर होता.
या भूकंपामुळे फारसे मोठे नुकसान झाले नाही. जपानी दूरचित्रवाणीवरील दृश्यांमध्ये स्वयंपाकघरातील भांडी आणि दुकानांमधील सामान जमिनीवर विखुरलेले पाहायला मिळाले. काही बुलेट ट्रेन सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या, तर हाशिकामी येथील एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ‘NHK’ वृत्तसंस्थेला सांगितले की, भूकंपामुळे त्यांची शाळा तात्पुरती बंद ठेवावी लागली. २५ जून रोजीच नेपाळमध्येही ३.८ तीव्रतेचा एक सौम्य धक्का बसल्याचे ‘नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी’ने सांगितले.
त्यानंतर दोन दिवसांनी २७ जून रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाले. अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.२ होती. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, उत्तर पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील स्वात जिल्ह्यात लोक घाबरून घराबाहेर पळाले. तिथे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. त्याच दिवशी, पाकिस्तानमध्ये ३५ किलोमीटर खोलीवर ५.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. देशाच्या काही भागांत याचे धक्के जाणवले, ज्यामुळे १०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आणि जवळपास २० लोक जखमी झाले.
हे भूकंप एकमेकांशी जोडलेले आहेत का?
एकामागून एक वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या या भूकंपांमुळे हे भूकंप एकमेकांशी जोडलेले आहेत का? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. हे समजून घेण्यासाठी प्रथम भूकंपामागील विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे. पृथ्वीचे बाह्य कवच अनेक ‘टेक्टोनिक प्लेट्स’मध्ये विभागलेले आहे, या प्लेट्स दरवर्षी अवघ्या काही सेंटीमीटरच्या गतीने सरकतात, परंतु त्यांच्यातील घर्षणामुळे प्रचंड दाब निर्माण होतो. जेव्हा हा दाब पृथ्वीच्या वरील खडकाळ कवचातील भेगांवर खूप जास्त वाढतो, तेव्हा खडक तुटतात किंवा सरकतात. या अचानक होणाऱ्या हालचालीमुळे भूकंपाच्या लहरींच्या रूपात ऊर्जा बाहेर पडते व जमीन हादरते.
मागील आठवड्यात झालेले भूकंप काही दिवसांच्या अंतराने झाले आहेत. ते वेगवेगळ्या टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमांवर झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील भूकंप हे ‘इंडियन प्लेट’ आणि ‘युरेशियन प्लेट’ यांच्यातील टक्कर होणाऱ्या भागात झाले. दुसरीकडे, जिथे ‘कॅरिबियन प्लेट’ ही ‘साऊथ अमेरिकन प्लेट’च्या बाजूने सरकते त्या सीमेवर व्हेनेझुएला हा देश आहे. याचा अर्थ हे सर्व प्रदेश वेगवेगळ्या टेक्टोनिक प्लेटवर स्थित आहेत. त्यामुळे या भूकंपांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. ‘USGS’ च्या भूकंप जोखीम कार्यक्रमाचे साहाय्यक समन्वयक विल्यम बार्नहार्ट यांनी नमूद केले की, “या घटनांमध्ये एकच साम्य आहे आणि ते म्हणजे हे सर्व भूकंप उच्च भूकंप प्रवण क्षेत्र असलेल्या आणि चांगल्या परिचयाच्या प्लेट सीमांवर झाले आहेत; परंतु त्यांची वेळ निव्वळ एक योगायोग आहे.” बार्नहार्ट यांनी ‘द गार्डियन’शी बोलताना सांगितले की, “जगात दररोज सर्वत्र भूकंप होत असतात. त्यातील बहुतेक भूकंप मानवी वस्तीपासून दूर होतात. कालचा दिवस जरा वेगळा होता, कारण लोकांना जाणवतील अशा ठिकाणी एकाच वेळी काही मोठे भूकंप झाले.”
कॅलटेकच्या (Caltech) प्रख्यात भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. लुसी यांनीही ‘CNN’ शी बोलताना स्पष्ट केले की, वेगवेगळ्या देशांमध्ये एकामागून एक आलेले भूकंप हा निव्वळ एक योगायोग आहे. त्यांनी नमूद केले की हे धक्के वेगवेगळ्या फॉल्ट सिस्टीम आणि प्लेट सीमांवर झाले आहेत. हजारो मैल दूर झालेला एखादा मोठा भूकंप दुसऱ्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता वाढवत नाही.
भूकंपांचे प्रमाण वाढत आहे का?
एकामागून एक येणाऱ्या भूकंपांमुळे जगभरात भूकंपांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु शास्त्रज्ञांच्या मते, असे दर्शवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ‘USGS’ नुसार, भूकंपीय हालचालींमध्ये अल्पावधीत होणारी वाढ किंवा घट ही भूकंपाच्या दरातील सामान्य चढ-उतारांचा एक भाग आहे आणि ती भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाचे संकेत देत नाही. ‘नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर’च्या माहितीनुसार, आता जगभरात दरवर्षी सुमारे २०,००० भूकंपांची नोंद होते, म्हणजेच दिवसाला साधारण ५५ भूकंप होतात. परंतु, ‘USGS’ च्या मते, हे प्रमाण वाढण्याचे कारण प्रत्यक्ष भूकंपांची संख्या वाढणे नसून, आपली भूकंप नोंद करण्याची तंत्रज्ञान प्रणाली (डिटेक्शन सिस्टीम) अधिक प्रगत झाली आहे, हे आहे.
